आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुण्याचीच तेवढी नाट्यसंस्कृती काय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाटक जितकं नाट्यगृहात घडतं, त्याहून अधिक ते नाट्यगृहाबाहेर घडतं. बयाचदा घडण्याआधी बिघडतंसुद्धा. या घडण्या-बिघडण्यात शासन, निर्माते, नाट्यसंस्था, पतपुरवठादार, नाट्यकर्मी, सादरीकरण, त्याला प्रतिसाद देणारा प्रेक्षक, या साऱ्यांचाच कमी-अधिक प्रमाणात वाटा असतो. त्याची प्राधान्याने दखल घेत ‘नाटक’ हा घटक केंद्रस्थानी ठेवून रंगमंचावरच्या आणि नाट्यगृहाबाहेरच्या विश्वातल्या घडामोडींचा धांडोळा घेणारे हे पाक्षिक सदर...

 

का आम्ही मुंबई-पुण्यात जायचं? का एकाच खाेपटात चार-सहा जण राहायचं? अभिव्यक्त हाेण्यासाठी माझे उंबरठे ओलांडून दुसऱ्याच्या भिंती मी का बांधायच्या? मलाही अधिकार आहे की, माझ्या शहरातच मला हव्या त्या वर्तुळात काम करण्याचा...! पण, ‘इंडस्ट्री’ हे बिरूद आमच्यापासून काेसाे दूर आहे. म्हणूनच वाढलेली घुसमट, सुरकुतलेले मुखवटे आणि पडद्याआडची अस्वस्थता एक तर एका टप्प्यावर जाऊन लोप पावते किंवा तिचा विस्फाेट तरी हाेताे. पण विस्फाेट हाेणं ही नव्याच्या शाेधाची वाटही ठरतं. ९९ वर्षे झाली, हे नाट्य साेहळे सुरूच आहेत, सुरूच राहतील..., पण पुण्या-मुंबईपल्याडचा रंगकर्मी म्हणून माझ्या स्थैर्याचं काय? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्याच उंबऱ्यात विसावलेल्या नाट्य साेहळ्यात तरी विचारणार आहात की नाही? चेहरा रंगवलेल्या तथाकथित नाटकवाल्यांना ‘मनाेरंजन’ वलयाच्या पलीकडे तुम्ही काय केलंत, हे विचारून चाैकटी माेडण्याचं नाटक सुरू करण्याची तिसरी घंटा आपण वाजवणार आहाेत की नाही?

 

ते जे रंगभूमीचे मुखवटे आहेत ते साधारणपणे प्राचीन ग्रीक नाटकातल्या "थालिया' आणि "मेल्पाेमन'चे प्रतीक आहेत. यातला एक विनाेदी, तर दुसरा संत्रस्त. त्यातून हे मुखवटे आले, रुजले आणि एवढे रुजले की, ते दाेन मुखवटे आहेत, हेच साे काॅल्ड ड्रामा इंडस्ट्री विसरून गेली. विनाेदी मुखवटा या ना त्या कारणाने रंगभूमीवर मिरवला. (विनाेद म्हणजे जाेक नव्हे, तर एकूणच आनंददायी, मजा आणणारं नाटक) पण दुसऱ्या मुखवट्याचं काय? त्याच्यावर जाे पडदा पडला ताे पडलाच. मुंबई-पुण्याच्या रंगभूमीपलीकडे ताे सरकतच नाही आणि म्हणूनच नाशिक, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, साेलापूर, अमरावती यासारख्या शहरातील धडपडणाऱ्या रंगकर्मींना मुंबई-पुण्याच्या काेलाहलात स्वत:ला घुसडून घ्यावं लागतं. ९९ वर्षं झाली नाट्य संमेलनाचे साेहळे सुरू आहेत. पण एकदाही असं का वाटलं नाही, की ही मराठी नाटक इंडस्ट्री ‘सारस्वती’ किंवा ‘अभिरुचिसंपन्न’ वगैरे शब्दांत अडकलेल्या तद्दन ‘आमच्यासारखे आम्हीच’ म्हणणाऱ्या नाटकवाल्यांमधून बाहेर काढावी आणि या माेठ्या शहरांमध्ये ती खऱ्या अर्थाने इंडस्ट्री म्हणून उभी रहावी. 


शेवटी, भाकरीचा अर्धा चंद्र मी माझ्याच गावात का नकाे कमावू? नाटक जन्माला घालणारा फायनान्सर असताेच. ते उभं करणारा तंत्रज्ञही असताेच की. जसं एखाद्या मॅन्युफॅक्चर कंपनीत भांडवल, कामगार या गाेष्टी प्राधान्याने बघितल्या जातात आणि त्यावर वर्कआऊट हाेतं, किंबहुना मुंबई-पुण्यातही नाटक व्यवसायावर यापेक्षा वेगळं वर्कआऊट ते काय असेल. मग राज्यातील इतर  शहरांमध्ये का ही इंडस्ट्री उभी राहत नाही... का तिथल्या कलाकारांंचं जगणं बदलत नाही? का अर्थकारण बदलत नाही?  या प्रश्नांवर नाट्यसाेहळ्यात बाेलणार आहात की नाही? साेहळ्यानिमित्त हीराे झालेले आणि त्या काळात हिरा हाेणारेही यांचं नाटक काही धड नाही, त्याचं नाटक असं वेगळं केलं असतं तर चाललं असतं, शासनानं हे अनुदान द्यायला हवं, शासनानं नाट्यगृहं बांधायला हवी या आणि यासारख्या मिळमिळीत, पचपचीत, चावून चाेथा झालेल्या पण कंटाळवाण्या  नमनापलीकडे आजही का जात नाहीत? आणि म्हणूनच नाटकाची इंडस्ट्री ही त्या दाेन शहरांच्या साइटवरच चमकत रहाते.


मग प्रश्न असा आहे की, साधारणत: नाटकाच्या इतिहासाची १७५ वर्षांची पाने उलटली तरी तेच हाेतं का? तर अजिबातच नाही. पश्चिम महाराष्ट्रात संगीत नाटक चांगलं चालायचं की? म्हणजे तिकडे त्यांची इंडस्ट्री हाेती. त्यावर अनेक जण जगत हाेते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात झाडीपट्टी छान सुरू हाेती, काही ठिकाणी आजही सुरू आहे. काेकणातला दशावतार कमी झाला, तरी उत्सवादरम्यान डाेकं वर काढून अस्तित्व दाखवताेच. म्हणजे, काही काळ मागे गेलं, तर तिथं-तिथं त्या-त्या भागाचं नाटक हाेतं.किंबहुना आहे. पण त्याचा उद्याेग हाेऊ शकला नाही आणि मग चांगले कलाकार रंगभूमीकडून निसटले आणि टिपिकल चाकरमाने झाले. मग त्यांच्यासाठी ‘हाैशी’, कामगार कल्याण नाट्य स्पर्धांचा पर्याय अलगद देऊन तत्कालीन सत्ताधीश - मग ते राजकारणातले असाे वा नाट्य चळवळीतील धुरीण असाेत - ते माेकळे झाले. आपण एक संस्कृतीच संपवून दुसऱ्याच एका प्रासंगिक संस्कृतीला जन्माला घातल्याचं भान नसल्याचंच हे द्याेतक नाही का? त्याच वेळी जर मग त्या-त्या भागात नाटक आणि नाटकावर अनेकांना जगवण्याची ही जबाबदारी काेणाची? आम्ही नाटकवाले असं म्हणून माना उंच करून याच साेहळ्यांमध्ये फिरणाऱ्या पिंजारलेल्या केसांच्या, ‘ज्येष्ठ’ ही पदवी घेतलेल्या रंगकर्मींची नाही का?  पुढल्या वर्षी या नाट्यसाेहळ्याचं शतक हाेईल. पण, आजही अनेक गावांमध्ये वा शहरांमधील अनेकांनी नाटकंच बघितलेलं नाही. 

 

म्हणजे, आजही आपण पांढरपेशा करंटेपणातच अडकलेलाे आहाेत. मग कशाला उगाचंच नाट्य चळवळ, नाट्य चळवळ म्हणत नाचत फिरायचं?  गावांची झपाट्यानं शहरं हाेत आहेत. उद्याेग, धरणं, दळणवळण या जशा गावांच्या, शहरांच्या गरजा आहेत, तसं मनाेरंजन हीदेखील त्या शहराची, गावाची गरज असते. या गरजांसाठी जसे प्राधान्याने प्रयत्न केले जातात, तसे प्रयत्न नाट्य उद्याेगासाठी का हाेत नाहीत? एक चांगलं नाटक म्हणजे, किमान ७०-८० जणांची ती कंपनीच असते. पण, आजही त्याकडे कंपनी म्हणून बघितलं जात नाही, आणि त्या-त्या शहरात मनाेरंजनाच्या या उद्याेगाला खीळ बसवली जाते. ही बाब अगदीच मान्य की, अनेक शहरांमध्ये जगण्याची भ्रांत आहे. पाणी नाही, शेती जळाली, उद्याेग बंद पडत आहेत, हे सगळंच मान्य आहे.

 

अशी शहरं थाेडा वेळ बाजूला ठेवली, तरी जगाला नाटक सांगणाऱ्या महाराष्ट्रातील काही शहरांत तरी अशी वेगळी नाटक इंडस्ट्री नाही का उभी राहू शकत? आजही नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, साेलापूर, अहमदनगर आदी शहरांमध्ये शासनाची एक किंवा दाेन नाट्यगृहेच आहेत. (त्यांच्या अवस्थेबद्दल तर बाेलूयाच नकाे. तिचे धिंडवडे दरदिवशी निघताहेत. अगदी बड्याबड्या कलावंतांकडून निघताहेत.) त्या नाट्यगृहांमध्ये वर्षानुवर्षे खिळे ठाेकणारा, लाइटची बटणं माहिती असणारा एखादा माणूस असताेच. ताे एखादाच का असताे? ताे जागेवर नसेल, तर सगळंच थांबतं. साधी हाताेडी वा टेकस काेणी कार्यक्रमवाला, नाटकवाला विसरला, तर पंचाईत हाेते. अशी अनेक प्रकारची अडचण मुंबई-पुण्यात अभावानेच असते. तिथे माणसालाही पर्याय आहेत. म्हणजेच नाट्य उद्याेगाने प्रगती केली आहे. काही थांबत नाही... अविरत सुरू राहतं. आता मुद्दा येताे की, नाटक चालणार कसं? तर जिथे निर्मिती हाेते, तिथे प्राॅडक्शन काॅस्ट कमी हाेते, ती कशी कमी हाेईल याचा विचार करायला हवा. ती कमी झाली की, आपाेआपच नाटकवाल्यांना आणि लाेकांनाही परवडेल आणि उद्याेग चालू शकेल. हे सगळं एकाच वेळी हाेणं थाेडं स्वप्नवत वा काल्पनिक असलं, तरी ते करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आणि रस्तेबांधणी मंत्र्यांसारख्या मातब्बर लाेकांच्या शहरात भरणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ‘नाटक इंडस्ट्री’ याबद्दल प्राधान्याने विचार व्हायला काहीच हरकत नाही. कारण, आपण सिनेमा उद्याेग जगवताे, पण नाट्यउद्याेग जगवण्याची धडपडही करत नाही. ती धडपड त्या-त्या शहरांतील नाट्यकिडे करत असतात. पण, त्यांचा प्रयत्न त्यांच्याच मुठीत गुंडाळला जाताे. आता तीच मूठ उघडण्याची वेळ आलेली आहे. नाट्यसाेहळे हाेतच राहतील, हाेतंच राहणार. भाषणं हाेणार, टीका-टिपण्णीही हाेणार. पुढेे काय?  ९९ वर्षांच्या या परंपरेत नाटकाने आयाम बदलला, पण त्याचा उद्याेग हाेऊ शकला नाही अाणि रंगभूमी ही केवळ दाेन शहरांची मक्तेदारी झाली. शासन साेहळ्यांना अनुदान देतं, स्वागताध्यक्ष पाण्यासारखा पैसा घालतात, तीन दिवसांचा मेकअप उत्तम हाेताे आणि चाैथ्या दिवशी पुन्हा एक मुखवटा रडताेच. ताे कायमच तसाच राहणार आहे, पण त्या रडवेल्या भावमुद्रेपलीकडे आशेचा किरण दाखवण्याची जबाबदारी मातृसंस्थेसह शासनाची आहे. ते काही वेगळं करत नाहीत. लाेकांच्याच पैशांतून त्यांना काम करायचे असते. त्यामुळे नाटकवाल्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, सद्सद््विवेकबुद्धीचा, अधिकारांचा वापर करत ‘आमच्या नाट्य उद्याेगाचं काय करणार?’ असा खडसावून जाब विचारला, तर आपल्यालाही काेणीतरी विचारणारे आहेत, या भावनेने एखादं पाऊल टाकलं जाईल आणि तीच खरी शतकी नाट्यसंमेलनाची नांदी ठरेल.


लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

बातम्या आणखी आहेत...