आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातले नागडे सत्य मांडणे हेच कवीचे काम, हृदयस्पर्शी शब्दांत कवी, अभिनेते पीयूष मिश्रा यांनी मांडला जीवनप्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: 'बालपणी खूप दाबला गेलो. तरुणपणी कम्युनिस्ट झालो आणि आज विपश्यनेने माझे आयुष्य बदलून टाकले. पण प्रतिक्रियावादी राहिलो म्हणून कवी म्हणून जिवंत राहिलो, आयुष्य मर्जीनुसार जगलो,' अशा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत प्रख्यात कवी, गीतकार आणि अभिनेते पीयूष मिश्रा यांनी जीवनप्रवास मांडला. कवीचं काम जगातलं नागडे सत्य मांडणं हेच आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. 'आरंभ हो प्रचंड' या त्यांच्या सत्राला तुफान गर्दी जमली होती. 

 

'जिंदा रहने में और सांस लेने में फर्क होता है.. ' ही कविता आपण दहावीत लिहिली होती, पण निम्म्या लोकांना ती समजली नाही, तर निम्म्या लोकांनी विश्वासच ठेवला नाही या प्रसंगापासून त्यांनी कलाप्रवास मांडला. त्यानंतर दिल्लीतील नाटक, मुंबईतील सिनेमा, कविता आणि आता बँड इथपर्यंतचा प्रवास उलगडला. अपनी जिंदगी अपनी शर्तो पर जी ली, बडा मजा आया,' या शब्दांत त्यांनी जीवनप्रवास मांडला. मात्र राजकारणापासून मुलींवरील बलात्कारासारख्या घटनांनी व्यथित होत आपल्या कविता जन्म घेतात असे ते म्हणाले. नाटकाने आपल्याला घडवलं. तिरकस विचार करण्यासाठी नवनवीन प्रयोग शिकवले, मात्र बरंच बेजबाबदार वागलो, पण भानावर येताच सावरलोही, या शब्दांत त्यांनी कबुली दिली.' 

विसाव्या वर्षी कम्युनिस्ट झालो, ३० व्या वर्षी कम्युनिझम सोडला, ५० व्या वर्षी ध्यान शिकलो. या प्रत्येक टप्प्यात स्वतःला शोधत राहिलो,' असे ते म्हणाले. कम्युनिझम पुढे काय, याचा विचार करताना आपल्या आयुष्यात 'ध्यान' आलं, अन् २००० मध्ये विपश्यना केली आणि त्यानंतर गुलाम ते 'गँग्ज ऑफ वासेपूर'सारख्या कलाकृती घडल्या. कवीचं काम जगातलं नग्न सत्य मांडणं हेच आहे. कपडे शिवण हे तर शिंप्याचं काम, या मार्मिक शब्दांत त्यांनी कलाकारांची भूमिका विशद केली. दैनिक भास्कर डिजिटलचे संपादक अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

 

जितेंद्र जोशी प्रेक्षकांमध्ये 
सभागृहाच्या मागच्या बाजूकडून एक प्रश्न आला, तुमचे बालपण कसे गेले आणि ध्यानानं तुमच्या जगण्यात काय बदल झाला? संपूर्ण सभागृहाच्या नजरा मागे वळल्या तेव्हा अभिनेता जितेंद्र जोशी हा प्रश्न विचारत असल्याचे लक्षात आले. 'ध्यान' हे स्वतःवर, स्वतःच्या एकटेपणावर प्रेम करायला शिकवतं. तरुणांनी आपल्या आयुष्यातील १० दिवस काढून अवश्य विपश्यना करावी, असा सल्ला पीयूषजींनी जितेंद्रच्या माध्यमातून तरुणांना दिला. 
प्रचंड गर्दी असल्याने जितेंद्र जोशी, कवी दासू वैद्य यांनीही सर्वसामान्य रसिकांप्रमाणे उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 

 

नास्तिक ते आस्तिक व्हाया विपश्यना 
२० व्या वर्षी नास्तिक होतो. आज आस्तिक बनलो आहे. जग बदलण्याचे स्वप्न कम्युनिझमने दिले. पण दुनिया बदलत नाही, उलट 'मी आज जिवंत का' या प्रश्नाचे उत्तर कम्युनिझममध्ये नाही. तरुणपणी मी नास्तिक होतो. पुढे या प्रश्नाच्या शोधात अास्तिक बनलो आहे. हे भारतीय संस्कृतीतील आश्रम स्थितीसारखं आहे. विसाव्या वर्षी कम्युनिस्ट झालो आणि तिसाव्या वर्षी आस्तिक म्हणून तुमच्यापुढे हा असा आहे, हा बदल मिश्रा यांनी मांडला. 

 

कवितांनी केली खुमासदार पेरणी 
जिंदा रहने में और सांस लेने मे फर्क होता है 
सांस लेनेवाला शख्स एक बगल में चांद होगा, एक बगल मंे रोटिया एक बगल में नींद होगी, एक बगल में लोरिया  वो काम भला क्या काम हुआ, वो इश्क भला क्या इश्क हुआ 

 

पीयूष मिश्रा म्हणाले... 
- पहिली ३० वर्षे कोणाला मी समजलो नाही  
- सिनेमाने मला मोठं केलं  
- कम्युनिझममुळे जगण्याचं ध्येय शिकलो 
- खूप काम करण्याची सवय लागली 
- 'भारत एक खोज'ने संधी दिली  
- सगळ्यांसारखाच संघर्ष केला  
- दिल्लीने नाटक दिले, मुंबईने सिनेमा 
- विपश्यनेने शांतता दिली  
- व्यसन करून लिखाण होतं हा गैरसमज  
- नाटकामुळे तिरकस विचारांची सवय जडली  
- सभोवतालावर प्रतिक्रियात्मक कविता निपजली 
- तर्काशिवाय गाणं अशक्य  
- दुनियेचं नागडे सत्य सांगणं हेच कवीचं काम 

 

बातम्या आणखी आहेत...