आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांचे चक्रव्यूह!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री-पुरुष नातेसंबंध हे मानवी संबंधांतलं एक चिरंतन गूढ आहे आणि जोवर मनुष्यप्राणी अंर्तज्ञानी होत नाही तोवर हे गूढ कायमच राहणार आहे. अर्थात ते तसं राहण्यातच माणसाच्या जगण्यातली गंमत आहे. असं काही रहस्यच उरलं नाही तर जगण्यात मौज ती काय?  लेखक व कलावंत मंडळी हे गूढ आपापल्या परीनं समजून घेण्याचा आणि आपल्याला झालेल्या आकलनातून त्याचे नानाविध कंगोरे उकलून दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात.सध्या मराठी रंगभूमीवर जी नाटकं तुफान गर्दी खेचत आहेत त्यातून तरी हेच स्पष्ट होत आहे. 

 

अनेक गाेष्टींवर विचार करायला भाग पाडणारी ही आणि अशी किती तरी नाटकं निव्वळ मनाेरंजनाच मुखवटा आहेतच, पण नाटकाच्या मुखवट्यातील एक चेहरा हसरा असला तरी एक चेहरा दु:खी आहे हे दुर्लक्षित करून कसं चालेल?

 

एखादाच सूर आळवला आणि ताे तासन‌्तास चालला, एखादा साेलाे चाललायं... चाललायं... चाललायं... कलाकार मंचावर येतात आणि अंगविक्षेपाचे विनाेद करतात टाळ्या-हशा घेतात आणि निघून जातात किंवा मग एखादी संहिता निव्वळ मनाेरंजन करते आणि रसिक पुढे सरकताे, अशा कितीतरी कथा, घटना वा नाटकं सांगता येतील. पण, सध्या रंगभूमी गाजवत आहेत ती बाेथट नात्यातली नाटकं. मुळात हे विषय त्या-त्या नाटकातल्या लेखकांना का घ्यावेसे वाटले हा जरा चर्चेचा आणि संशाेधनाचा विषय हाेईल. पण, त्या नाटकांना रसिकांचा जाे प्रतिसाद मिळताेय ताे खरंतर विचार करायला लावणारा असाच आहे. 


नात्यांची गणितं मांडणारी नाटकं काही रंगभूमीवर आलीच नाहीत असं अजिबातच नाही. अगदी नटसम्राट, वहाताे ही दुर्वांची जुडी, सखाराम बाईंडर किंवा अगदी काल-परवाचं सेलिब्रेशन नाटक घ्या. त्यात नात्यांची बेरीज-वजाबाकी मांडलेली हाेती. पण, आता रंगभूमीवर जी नाटकं आहेत ती गुणाकार-भागाकार मांडून गुणाेत्तर काढण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपल्याचं प्रकर्षाने दिसून येतं आहे. ‘तिला काही सांगायचंय’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘व्हॅक्यूम क्लिनर’, ‘एका लग्नाची पुढची गाेष्ट’ आणि नव्यानेच येऊ घातलेलं ‘कुसुम मनाेहर लेले’ ही नाटकं काय अधाेरेखित करतात हा विचार करण्याचा प्रश्न आहे. 


खरंतर नाटक म्हटलं की, विचार काय करायचा, विकेंड आहे मस्त. तिकिट काढायचं,  एसी थेट्रात बसायचं आणि नाटकाचा आनंद घेऊन बाहेर पडायचं. पुढे फार-फार तर दाेन दिवस एकमेकांत त्या नाटकाविषयी चर्चा करायची आणि विसरून जायचं. पुन्हा नवीन नाटक बघायचं. बऱ्याच रसिकांचा हा क्रम थाेड्याफार फरकाने मागे-पुढे हाेत असताे. मनाेरंजनात्मक, विनाेदी नाटक असेल तर ठीकच आहे. पण, मानवी नात्यांवर गंभीर भाष्य जर ते नाटक (एखादं नाटक विनाेदी अंगानेही गंभीर भाष्य करू शकतं.) करत असेल तर मग त्याच्यावर चर्चा हाेणार की, नाही?  मुळात अशा नाटकांचा जन्म होतो तरी कसा? त्यांची गरज काय? तर ती नाटकवाल्यांची गरज असतेच पण, ती समाजाची गरज असते, समाजातल्या बदलत्या विचारांची गरज असते आणि गरज असते ती बदलत जाणाऱ्या नात्यांची. 

नात्यांचा गुंता साेडवणारी किंवा कदाचित गुंतागुंत करणाऱ्या नाटकांनी सध्या रंगभूमीचा ताबा घ‌ेतला आहे असं म्हटलं तर ती अतिशयाेक्ती ठरणार नाही. त्यातही ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाने रसिकांची कुतुहलता वाढवली आणि नाटक आता पन्नाशी पार परत असताना ती टिकवूनही ठेवली. अभिनेत्री प्रिया बापटने या वेगळ्या विषयाची निर्मिती आपल्या खांद्यावर घेतली. एक बहिण तिच्या भावाला स्वत:च्या प्रेग्नसीची बातमी देते. असं वाक्य एेकलं तरी आपल्या डाेळ्यापुढे भावाने बहिणीला एक सणसणीत ठेऊन दिल्याचा वा काेण आहे ताे, दाखव आता त्याचा मुडदाच पाडताे वगैरेचे प्रसंग डाेळ्यापुढे उभे रहातात. याच सगळ्या विचारांना आणि प्रसंगांना हे नाटक छेद देतं आणि आपल्या बहिणीची ही कुमारी अवस्थेतली गुडन्यूज भाऊ कशी सांभाळताे, बहिणीलाही कसं सांभाळताे हे या नाटकाने अत्यंत वेगळे पणाने दाखवून दिलं आहे. अभिनेता उमेश कामतची बहिण झाली आहे ऋता दुर्गुळे. बहिण भावाच्या नात्यातली ही विण एवढी घट्ट कशी आहे...? त्यांच्यातलं बाॅण्डीग इतकं मस्त कसं आहे? असा प्रश्न पडला नाही तरच नवल. काळानुरुप बहिण-भाऊ आता मित्र म्हणून अधिक चांगले वावरताना दिसतात. त्यांना एकमेकांच्या अनेक गाेष्टी माहिती असतात. अगदी नजिकच्याच काळात थाेडं मागे गेलं तर भाऊ फक्त पाठीराखा किंवा बाॅडीगार्डच्या भूमिकेत असायचा पण, आता तसं राहिलेलं नाही. हे नातं बदलत चाललं आहे, किंबहुना बदललं आहे. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्नही या नाटकातून हाेताे आहे. बाेथट-बाेथट वाटणारं बहिण-भावाचं नातं या नाटकामुळे खूपच जवळचं वाटतं आणि सुखावून जातं. 

 

आपल्याला रंगभूमीवरचा मन्या आणि मनी माहितीच आहेत. मन्या आणि मनीला ‘त्यांच्या लग्नाची पुढची गाेष्ट’ घेऊन पुन्हा का रंगभूमीवर यावं असं वाटलं? व्यावसायिक गणिताचा भाग साेडून देऊ. पण, विनाेदी अंगाने का हाेईना त्यातून वास्तवमूल्य धूसर हाेत नाहीत. नाटक बघताना गंमत वाटते. प्रशांत दामले यांचा अभिनय, नाटकात त्यांची हाेणारी फसवणूक वगैरे सगळं ठिक आहे. पण, ताे मनीपेक्षा दुसऱ्या चार्म असलेल्या मुलीकडे आकर्षित हाेताे. मग मनी आणि त्याच्या नात्याचं काय? त्याला ठिकाणावर आणण्यासाठी मनीचाच ताे प्लॅन असताे वगैरे-वगैरे सगळं आेके. पण, नवऱ्याला बायकाेचा कंटाळा येणे आणि पुन्हा माझं कुठेतरी चुकतंय याची जाणीव करून देणारं हे नाटक त्यांच्या नात्याची बिघडलेली त्रिज्या दाखवून देतं. बरं हे बघत असताना विनाेदावर माेठ माेठे हशे वसूल हाेत असतात. पण, हेच हाेत असताना हे नाटक एका छाेट्याशा थीमलाइनमधून वास्तवाचं भान आणतं आहे. 

 

अशाेक सराफ आणि निर्मिती सावंत यांची नावं जरी घेतली तरी ती कलाकृती विनाेदी असणारं हे काही सांगावं लागत नाही. पण, त्यातील "जीस्ट' हा दाेघंही नेहमीच विचार करायला लावणारा आहे असं दाखवून देतात. ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे नाटकही त्याच पठडीतलं. नयना आणि रंजनची ही कथा. पण, व्हॅक्यूूम क्लिनर लावताना त्याला बसलेला शाॅक आणि त्याला साेडवताना तिला बसलेला शाॅक... नयनाचा रंजनमध्ये प्रवेश आणि रंजनचा नयनामध्ये प्रवेश यातील फॅन्टसी थाेडी बाजूला ठेऊ पण, त्यातून उलडगणारी नात्यांची आणि वर्तणुकीची काेडी खरंच आपल्या नात्याला व्हॅक्यूम क्लिनर लावण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारायला भाग पाडतात. वागण्यात, वर्तणुकीत, कामात पुरुषी वर्चस्व असायला हवं असं रंजनचं एकुणातच म्हणणं असतं तर नयना तीच्या मुलाला ‘परि’ म्हणत असते, नृत्याची आवड असलेला ‘परि’ काहीसा मुलींसांरखा वागू लागताे आणि मग रंजनच्या वर्तणुकीमुळे त्यांच्यातील नात्याला छेद येत जातात. असं वेगळ्या धाटणीचा विषय मांडणारं हे नाटक शेवटी एकमेकांवरच भाष्य करतं हे समजून घेण्याची गरज आहे. 

 

आज लग्न हाेतं आणि महिना-दाेन महिन्यात विभक्त हाेतात हे चित्र आता नविन नाही. कारण तिला काहीतरी सांगायचं असतं तेव्हा त्याला वेळ नसताे किंवा ताे टाळताे आणि हेच उलटही हाेऊ शकतं. एकमेकांना समजूनच घेतलं जात नाही आणि मग काेणीतरी बंडखाेरीच्या पवित्र्यात येतं हेच सांगणारं एक बंडखाेर नाटक म्हणजे 'तिला काही सांगायचं आहे'. तेजश्री प्रधानमधील मिताली आणि अस्ताद काळेमधील यश यांची ही कथा. ती स्त्रीमुक्ती चळवळीची कार्यकर्ती तर हा काॅर्पाेरेट कल्चरमध्ये वावरणारा. कालांतराने ताे तिच्यासाेबत काम करणाऱ्या राजदीपसंबंधी संशय घेताे आणि मग ती देखील, त्याच्याबराेबर काम करणाऱ्या गीतासंबंधी संशय घेते. इथे तर त्यांच्यातील नातं आता संपेल का? असा प्रश्न पडावं इथपर्यंत ते नाटक पुढे सरकत जातं. करिअरच्या दृष्टीने दाेन विरुद्ध टाेकावर उभं राहून संसारात समांतर राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवविवाहित पतीपत्नीच्या नात्याबद्दल हे नाटक प्रश्नचिन्ह निर्माण करतं. 

 

तर ‘कुसुम माेहर लेले’ हे नाटक रसिकांना काही नवीन नाही. त्याला मुल हवं असतं म्हणून त्याने केलेलं दुसरं लग्न आणि मुल झाल्यानंतर तिला घराबाहेर काढणं, ही त्याची कथा. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कथेत नाट्यमुल्य आणण्यासाठी अनेक ट्रिकही आहेत. पण, शेवटी ते नातंच अधाेरेखीत करतं. पल्लवी पाटील, संग्राम समेळ आणि शशांक केतकर यांच्या भूमिकेतून हे नाटकंही पुन्हा रंगभूमीवर येत आहे. 

 

आता मुद्दा असा येताे की, एकमेकांबद्दल आस्था, प्रेम, दया, माया वगैरे वगैरे वाटणं किंवा अगदी आकर्षण कमी झालं आहे असं वाटणं कमी झालं आहे का? एवढी ‘ती’ दाेघं एकमेकांपासून दूर जात आहेत का? की हा काळाचा महिमा आहे. धकाधकीचं जगणं, दाेघांच्या नाेकरीत वेगवेगळ्या शिफ्ट, एकमेकांना न दिलेला वेळ, त्यातून उद्भवणारे प्रश्न आणि ते साेडवण्याच्या प्रयत्नात वाढत असलेला गुंता अशी अवस्था हाेते आहे का? आणि मग त्याच अवस्थेतून नात्यांची गाेळाबेरीज करणारी नाटकं रसिकांनाही आपलीशी वाटू लागत आहेत का? की अशाच एखाद्या नाटकातील पात्रात ते स्वत:ला बघताहेत आणि म्हणूनच मग या नाटकांना रसिकाश्रय मिळताेय? अशा अनेक गाेष्टींवर विचार करायला भाग पाडणारी ही आणि अशी कितीतरी नाटकं निव्वळ मनाेरंजनाच मुखवटा आहेतच पण, नाटकाच्या मुखवट्यातील एक चेहरा हसरा असला तरी एक चेहरा दु:खी आहे हे दुर्लक्षीत करून कसं चालेल?

 

पीयूष नाशिककर
piyushnashikkar@gmail.com

लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

बातम्या आणखी आहेत...