आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य परिषदेचे वस्त्रहरण!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीयूष नाशिककर  

नाट्य परिषदेच्या शाखांच्या निवडणुका असाे, शाखांमधील विविध कार्यक्रम असाे, नाट्य संमेलनाचे स्थळ, तारखा असाे, नाट्य संमेलनाध्यक्षांची निवड असाे की संमेलनातील कार्यक्रम असाे हे सगळं ठरवताना सगळ्यांना साेबत घेतले जात नाही ही भावनाच आता बळावत चालली आहे आणि त्यामुळेच रंगकर्मी, रंगधर्मींमध्ये कुठेतरी सगळा कारभार मनमानी पद्धतनीने सुरू असल्याचा संशयकल्लाेळी सूर उमटत आहे.
 


नि वडणूक नाट्य आणि खुर्चीसाठीची आेढाताण राज्यातील तमाम रसिक जनतेने बघितली. एखादं नाटक जसं मनाेरंजन करतं तसा हा कलाकारांनाही लाजवेल असा खेळ या नेत्यांनी केला. माेडेल पण वाकणार नाही या मराठी माणसाच्या स्वभावानुसार सगळं झालं आणि अखेरीस या मनाेरंजनाचाही कंटाळा येत हे नाटक संपलं. आता या नाटकाच्या आपल्या संवादाशी संबंध काय? असा प्रश्न पडला असेल. तर राज्याच्या सर्वाेच्च स्थानासाठी एवढी चढाआेढ हाेत असताना आपल्या नाट्य परिषदेच्या शाखांमधील खुर्चीसाठी (तकलादू) चढाआेढ झाली नाही तरच नवल. काेणतंही लाभाचं पद असाे वा मिरविण्याचं, त्या स्थानी आपण बसावं हे काेणाला नाही आवडणार? त्यामुळे कार्यकाळ संपताच विद्यमानांना आणि या सत्तेसाठी लाेलुप असलेल्यांचे चुंबकीय आकर्षण आपाेआपच दिसू लागले आणि निवडणुकांचा बिगुल कधी वाजताे याकडे कान टवकारू लागले. पण, या मनसुब्यावर चांगलेच पाणी फेरलेले आहे. नाट्य परिषदेच्या काेणत्याही शाखेत निवडणूक हाेणार नसल्याचे मध्यवर्ती शाखाने ठरविल्याने, आपल्या भाषेत अनेक जणांचा पाेपटच झाला म्हणावे. आता असे का केले आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष निवडण्याचीही एवढी घाई का केली? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शाेधण्याचा रंगकर्मींनी प्रयत्न केला तर त्यात वावगे असे काहीच नाही. 

एकतर नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने नाट‌्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. जब्बार पटेल यांचे नाव जाहीर करण्याची केलेली घाई आणि त्यामुळे अनेक शाखांमधून उमटणारे नाराजीचे सूर आहेत. त्यातच आता परिषदेच्या शाखांच्या हाेणाऱ्या निवडणुकांसंदर्भात रंगकर्मींनी दंड थाेपटले असतानाच नाट्य परिषदेच्या अध्यक्षांनी या निवडणुका न घेण्याचे पत्रच जारी केल्याने संभ्रमात अधिकच भर पडत चालली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात नागपुरात तर ऑक्टाेबर-नाेव्हेंबरच्या काळात नाशिक आणि राज्यातील इतर काही शाखांच्या निवडणुका हाेणे महत्त्वाचे आणि घटनेला धरून हाेते. पण, अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी यापूर्वीच सर्व शाखांच्या निवडणुका एकाच वेळी हाेतील असे सूचक वक्तव्य केले हाेते. मात्र, असा बदल करताना घटनेच्या काेणत्या कलमाचा आधार आहे हे स्पष्ट करायला अध्यक्ष कांबळी आणि इतर पदाधिकारी विसरत आहेत. त्यामुळे सर्व संभ्रम वाढताे आहे. 

नुकत्याच नाशिक शाखेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा विषय आल्यावर पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्तीचे अध्यक्ष कांबळी यांनी ‘मध्यवर्तीच्या पुढील सूचनेपर्यंत निवडणूका घेऊ नये’ अशा आशयाचे पत्र दिल्याचे सभेला दाखवले. या सूचना कधीपर्यंत येणार याबद्दल या पत्रात काहीच लिहिलेले नाही. आता असे पत्र कांबळी सर्व शाखांना देणार का? हा एक प्रश्न. दुसरं म्हणजे असा निर्णय का आणि घटनेच्या काेणत्या कलमानुसार घेतला? काेणत्या बैठकीत प्रस्ताव, ठराव संमत झाले? असे काहीच स्पष्ट न केल्याने या निर्णयाभाेवती शंकांचे माेहाेळ निर्माण हाेते. बरं नवीन घटनेत कलम ९(२) (अ) नुसार नियामक मंडळाची मुदत पाच वर्षे अशी असेल, असे म्हटले आहे. म्हणजे या नियमानुसार ज्या शाखांमधील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला आहे, त्या शाखांनी नवीन घटना कलम ९(६)(४) याप्रमाणे प्रमुख निवडणूक अधिकारी निवडणूकीची कार्यक्रम पत्रिका निवडणुकीच्या तारखेपूर्वी दाेन महिने अगाेदर सर्व आजीव सभासदांना व सर्व शाखांना एसएमएस, इमेल, प्रमुख वृत्तपत्राद्वारे पाठवेल व निवडणुकीची प्रक्रिया त्याप्रमाणे पूर्ण करेल. असे दिलेले असताना सध्या राज्यातील ज्या शाखांच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला आहे तेथे ही प्रक्रिया दिसत नाही. म्हणजे मध्यवर्ती शाखेकडूनच घटनाबाह्य काम सुरू आहे का? मुळात आता तर अनेक शाखांतील रंगकर्मी ‘मध्यवर्ती शाखा आपल्याला काय देते? काहीच नाही. मग आपण कशासाठी या शाखेच्या अधिपत्याखाली काम करत बसायचे आणि छाेट्या गाेष्टींसाठी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांपुढे झुकत बसायचे’ या विचारापर्यंत पाेहाेचले आहेत. काेणत्या शाखेच्या स्थानिक प्रश्नात मध्यवर्ती शाखा हिरिरीने सहभाग घेते? तर याचे उत्तर अगदीच अपवादात्मक सापडेल. पुरस्कारांतही शाखांबद्दल खूप व्यापक विचार केला जाताेच असेही नाही. उलट नवीन सभासद झाल्यानंतर आलेल्या वर्गणीतून काही भाग मध्यवर्तीकडे जमा करावा लागताे. असे असतानाही मध्यवर्ती शाखा इतर शाखांच्या बाबतीत किती गांभीर्य दाखवते, त्या शाखांसाठी काय व किती काम करते? हा प्रश्न आता रंगकर्मी विचारू लागले आहेत. 

एक देश एक निवडणूक हा माेदी सरकारचा नारा नाट्य परिषदेला द्यायचा दिसताे आहे. असे जर असेल तर त्याविषयीचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या सभेत ठेवावा लागेल, ताे संमत करून ठराव करावा लागेल आणि त्यानंतर हा निवडणुकीचा फंडा मध्यवर्तीला अमलात आणता येऊ शकताे. पण, मग ताेपर्यंत काय? तर ताेपर्यंत आहे ती कार्यकारिणी काम करेल असे जे पत्र अध्यक्षांनी दिले आहे तर असे पत्र देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे का? घटनेतील काेणत्या कलमानुसार ताे अधिकार आहे? त्याला कितपत अधिकृत मानावे वा त्याला आधार काय? हेदेखील मध्यवर्तीने स्पष्ट करणे गरजेचे आहे. जाेपर्यंत हे स्पष्ट हाेत नाही ताेपर्यंत हा कारभार मनमानी सुरू आहे, असेच अधाेरेखित हाेते आहे. एकीकडे असा असंताेष पसरत असताना दुसरीकडे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्य संमेलनाध्यक्ष निवडण्याची आणि त्यांचे नाव जाहीर करण्याची जी काही लगीनघाई केली आहे ते देखील संशयाच्या भाेवऱ्यात येत आहे. नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी २१ नाेव्हेंबरला जाहीर केले.
खरंतर जब्बार पटेल आणि माेहन जाेशी या दाेघांचे अर्ज आले आहेत आणि ते नियामक मंडळासमाेर येऊन त्यावर चर्चा हाेणे बाकी आहे. असे असताना डाॅ. पटेल यांची निवड झाल्याचे जाहीर करण्याचे कारणच काय? १००वे नाट्यसंमेलन काेणत्याही वादाविना पार पडावे यासाठी माेहन जाेशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी प्रयत्न हाेणार असल्याच सांगितले गेले. पण, जाेशी यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. तरीही या दाेन्ही अर्जांवर कार्यकारी समितीने चर्चा करून डाॅ. पटेल यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केल्याचे कांबळी यांनी तेव्हा सांगितले. मग जाेशींच्या अर्जाचे काय झाले यावर काहीच भाष्य झाले नाही. याबद्दल जर रंगकर्मींना शंका असेल, उत्तर हवं असेल तर मग ते परिषदेच्या कार्यकारी समितीने देणे बंधनकारक आहे, तसे ते कर्तव्य आहे. पण, तसे काहीही झालेले नाही. बरं अजून संमेलनाच्या तारखा जाहीर नाहीत, संमेलनाचे स्थळ जाहीर नाही असे असताना संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर करण्याची घाई ती का? मग याला कुठेतरी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वास येताे का? की ही निवड काेण्या एका राजकीय पक्षाकडे झुकते आहे? एकूणातच शाखांच्या निवडणुका असाे, शाखांमधील विविध कार्यक्रम असाे, नाट्य संमेलनाचे स्थळ, तारखा असाे, नाट्य संमेलनाध्यक्षांची निवड असाे की संमेलनातील कार्यक्रम असाे हे सगळं ठरविताना सगळ्यांना साेबत घेतले जात नाही ही भावनाच आता बळावत चालली आहे आणि त्यामुळेच रंगकर्मी, रंगधर्मींमध्ये कुठेतरी सगळा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा संशयकल्लाेळी सूर उमटत आहे.

लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

बातम्या आणखी आहेत...