Home | Magazine | Madhurima | Piyush Nashikkar writes about Marathi tv serials

दोन बायका तमाशा ऐका

पीयूष नाशिककर | Update - Aug 07, 2018, 06:38 AM IST

मालिका सुधारल्यात. म्हणजे पूर्वीची सासूसुनांची भांडणं, आसवं गाळणारी सून यांची जागा आता एक नवरा आणि दोन बायकांनी घेतलीय.

 • Piyush Nashikkar writes about Marathi tv serials

  मराठी मालिका सुधारल्यात (?). म्हणजे पूर्वीची सासूसुनांची भांडणं, आसवं गाळणारी सून यांची जागा आता एक नवरा आणि दोन बायकांनी घेतलीय. विवाहबाह्य संबंधांवरच्या कथानकांचा ट्रेंड आता मराठी मालिकांमध्ये नुसताच रुळला नाहीये तर त्यानं (मठ्ठ) प्रेक्षकांच्या मनातली जागा बळकावलीय. इतरांच्या खाजगी आयुष्यात डोकावणाऱ्या विशेषत: पती, पत्नी और वो पद्धतीच्या मालिका यशस्वी का होतात, हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो.


  सखे ग सये गाऊ या अाता अानंदाची गाणी ग...
  अातल्या अात पिऊन टाकू डाेळ्यातले पाणी ग...

  असा टायटल ट्रॅक असलेली ‘अंकुर’ मालिका अाठवते का? कविता लाड-मेढेकर अाणि तुषार दळवी यांच्या उत्तम भूमिका असलेली ही मालिका प्रचंड गाजली हाेती. मर्यादित भाग, विषय अनेकांच्या जवळच्या, सामंजस्य, मालिकेत शांतता, फक्त अाणि फक्त वैचारिक मतभेद, अारडाअाेरड नाही, एकमेकांवर किंचाळणं नाही की कटकारस्थानं नाहीत. ही मालिका अाठवण्याचं कारण एवढंच की, यात ‘दाेन बायका तमाश एेका’ असं काहीच घडलं नव्हतं. अत्यंत सुखी त्रिकाेणी कुटुंब, काही कारणाने त्या दाेघांचं पटत नाही अाणि ते सामंजस्याने वेगळं हाेण्याचा निर्णय घेतात. त्यात तीदेखील स्वत:च्या पायावर उभी असते. मुलाला सांभाळते वगैरे वगैरे. पुन्हा सांगण्याचा उद्देश असा की, त्यात दाेन बायका तमाश एेका असा विषय नव्हता. अगदी गाेट्यापासून वादळवाट, असंभव यांसारख्या काही माेजक्या मालिकांचा थाेडा बारकाईने विचार केला तरी काैटुंबिकच पण, अत्यंत वेगळ्या विषयांची अत्यंत सुंदर मांडणी या मालिकांनी रसिकांना दिली अाणि रसिकांना त्या मालिका अावडल्याही.


  पण, अाताच्या मालिका ‘दाेन बायका तमाशा एेका’ यापुढे सरकत नाहीत. असे का हाेते? तर मुळातच दुसऱ्याच्या घरात चाललेली भांडणं एेकणं, पाहणं, त्यात सहभागी हाेणं हा मानवी स्वभाव अाहे. त्यामुळे अशा मालिकांमध्ये रसिक गुंतत जाताे, अाज हे दाखवलं तर उद्या असं हाेईल का, याचा विचार करत ताे राेज ती मालिका बघत टीअारपीचे अाकडे कमी-जास्त करत जाताे. मुख्य म्हणजे हा टीअारपी वाढता ठेवण्याचा अाटाेकाट प्रयत्न चॅनलवाले करत असतातच. त्यासाठी ती मालिका ते विविध ट्रॅकवर नेऊन ठेवतात. अाता हे सगळं शब्दबंबाळ हाेणं यासाठी की, सध्या सगळ्याच चॅनलवर ‘दाेन बायका तमाशा एेका’ या टॅगभाेवती मालिका फिरत अाहेत. मग त्या ‘माझ्या नवऱ्याची बायकाे’मधील राधिका-शनाया असाेत वा ‘घाडगे अॅण्ड सून’मधील अमृता-कियारा. सध्या तर जवळजवळ सगळ्याच मालिका तशाच सुरू अाहेत. अाता सांगताेच त्या मालिका काेणत्या त्या... ‘राधा प्रेमरंगी रंगली’मध्ये राधा अाणि दीपिका, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मध्ये लक्ष्मी अाणि आर्वी, ‘लागिरं झालं जी’मध्ये शितली अाणि जयडी, ‘नकळत सारे घडले’मध्ये नेहा अाणि माया. एक नायक अाणि दाेन नायिका असेच कथानक का फिरते हे कळत नाही? दुसरे विषय यांना मिळतच नाहीत का? बरं सगळेच चॅनलवाले दावा करतात की, अामच्या या मालिकेचा टीअारपी बेश्ट. असे कसे?


  बरं या मालिका इथेच थांबत नाहीत. अापली राधिका अाणि गुरू. थेट काेर्टातच गेले नं ते बाप्पा. काउन्सेलिंग-बिउन्सेलिंग कायच नाय केलं भैताडांनी. असं कसं बे हाेऊ शकते. बरं असं काही नसू शकते की, कटकारस्थानं फक्त बाईच करते. इथे सगळे ते हक्क अाणि अधिकार गुरूकडे बहाल केलेले अाहेत, तेही अत्यंत बावळट शनायाच्या साथीने. बरं त्यामुळे अापलंच नुकसान हाेतंय, अापण रसातळाला जाताे अाहे. हे कळत असतानाही हा मूर्ख तिच्या मागे लागून साेन्यासारखा संसार साेडून थेट काेर्टात स्वत:चं हसं कसं काय करून घेताे. ती शनाया काेर्ट सुरू असताना थेट जागेवरून उठून म्हणते की, ‘अरे यार, काय प्राॅब्लेम अाहे डिव्हाेर्स द्यायला, कशाला एवढी बडबड करताय, त्याला तिच्याबराेबर (राधिका) नाही राहायचंय, तिला त्याच्याबराेबर (गुरू) नाही राहायचंय, अाम्हाला (शनाया अाणि गुरू) एकमेकांबराेबर राहायचं तर काेर्टाला काय प्राॅब्लेम अाहे, देऊन टाका ना लगेच डिव्हाेर्स.’ अाता ती असं म्हटल्यावर ती भैताड नई तर काय म्हनावं बाप्पा. काही कायदे-बियदे असते का नई, काही वेळ मधी जाते का नई. पण जशी शनाया बावळट, तसे हीच मालिका नाही तर असे तथ्यहीन प्रसंग दाखवणारेही बावळट. सामान्य प्रेक्षकांची ते दिशाभूल करतात. तेच जर घटस्फोटासंबंधी महिलांच्या बाजूने कायदा काय सांगताे, पुरुषांच्या बाजूने काय सांगताे, काउन्सेलिंग काय असतं, असं थाेडं संयमानं दाखवलं तर ते अधिक अपील नसतं का झालं? पण नाही... अाम्हाला टीअारपी वाढविण्याची प्रचंड घाई झालेली असल्याने अाम्ही काहीही दाखवून रसिकांची दिशाभूल करू शकताे. एवढी साधी गाेष्ट अाहे की, ज्याला घटस्फोट घ्यायचा अाहे त्याचे अाईवडील त्याच्या बायकाेकडे का राहातात? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित हाेतात. पन, जाऊ दे न बाप्पा... अापल्याला काय त्याचं. अापण राधिकाची प्रगती पाहावी अाणि थाेडी प्रेरणा घ्यावी एवढंच.


  अाता जरा अक्षय म्हणजे अक्की अाणि अमृता तसेच कियूकडे येऊ. अत्यंत पुराेगामी विचार मांडण्याचा विचार ‘घाडगे अॅण्ड सून’ या मालिकेने केला अाहे. घरातील मुलाने जरी अविचार केला तरी त्याची बायकाे ही त्या घराची जबाबदारी अाहे किंबहुुना ती सून नव्हे तर नंतर ती त्या घराची मुलगी हाेते हा खूपच छान विचार या मालिकेने दिला अाहे. पण पुन्हा ‘दाेन बायका...’मध्ये मालिकेची कथा अडकली किंवा अडकवली. अाता जर ताे शरीराने कियूच्या घरी अाणि मनाने अमृताकडे अाहे असं दाखवतात तर हे त्यांच्या का लक्षात येत नाही. (ते लक्षात अालं तर मालिकाच बंद करावी नाही का लागणार?) हे अापल्याला माहीत अाहे. तरीही अापण ती मालिका बघतो. दाेघींचं प्रेम अक्षयवर पण, अक्षयला हेच कळत नाही की, त्याचं प्रेम नक्की काेणावर अाहे? एवढा समंजस, हुशार अक्षय या बाबतीत एवढा मठ्ठ का बरं. बरं हे दाेघेही एवढे समंजस अाणि धाडसी अाहेत की, त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय त्या दाेघांनी फक्त घेतलाच नाहीत तर थेट काेर्टातही गेले. काहीच न घडता अाता काही दिवसांत त्यांचा घटस्फोटही हाेणार अाहे. म्हणजेच एका मालिकेत थेट काेर्ट दाखवतात तर दुसऱ्या मालिकेत सामंजस्याने घटस्फोट. असं कसं काय हाेऊ शकतं बुवा. बरं असं काहीही हाेणार नाही, हे अापल्यालाही चांगलंच माहीत अाहे कारण ताे हिराे अाहे अाणि ती हिराॅइन. पण, उद्या काय दाखवणार, वसुधा काकू काय कटकारस्थान कारणार, त्यावर माई काय रिअॅक्ट हाेणार, मग अमृता भाेळेपणाचा अाव अाणून कसे ताेडीस ताेड उत्तर देणार याचा विचार करत रसिकही गुरफटत जातात. मालिकेचे असंख्य भाग बघतात. टीअारपी वाढवतात. पण, म्हणतात ना, जे खऱ्या अायुष्यात घडत नाही ते मालिकांमध्ये घडतं अाणि घराघरांमध्ये ते अापलंसं वाटू लागतं. असाे.


  इतर मालिकांमध्येही थाेड्याफार फरकाने असंच अाहे. एक नायक त्याचे एकतर अाधी लग्न झालेलं अाहे किंवा प्रेम एकीवर अाणि संसार दुसरीबरोबर, किंवा लग्न झाल्यानंतर त्याच्या अायुष्यात येणारी दुसरी बाई. अाणि मग कटकारस्थानं, मीच कसा किंवा कशी ग्रेट, तू कसा मूर्ख हा विचार अगदी विषप्रयाेग करून एखाद्याला संपविण्यापर्यंत सुरू असतो. ताे अत्यंत अावडीने बघितलाही जाताे. महिला मंडळं असाे वा किटी पार्ट्या, यातही असे विषय चर्चिले जातात अाणि ‘थांब अाता मी यांना अगदी राधिकासारखा धडाच शिकवते’ इथपर्यंत ती चर्चा हाेते.


  यात मुद्दा असा अाहे की, ताेच का टारगेट केला जाताे? खरंच पुरुष एवढा वाइट अाहे का? एवढा अन्यायकारी अाहे का? मन फक्त बाईलाच अाहे का? पुरुषांना काहीच वाटत नाही का? इ.इ. मग त्याचीच प्रतिमा महिलांच्या मनात या मालिकांमधून अशी का दाखविली जाते? बरं, वरील दाेन मालिकांच्याच बाबतीत विचार केला तर राधिकाला साथ देणारे माेठ्या संख्येने पुरुषच अाहेत की? अाणि अमृताच्याही मागे अण्णा ठामपणे उभे अाहेत. पण, त्यांच्यावर फाेकस अत्यंत कमी अाहे. राधिकाच्या बाजूने कार्टात वकील म्हणून बाई अाणि गुरूच्या बाजूनं पुरुष असं का? तर हे सगळं ठरवून असतं. ते न समजण्याएवढा रसिक मूूर्ख नक्कीच नाही. सगळ्याच मालिकांमध्ये हेच हाेत अालं अाहे, हाेत येणार अाहे. यातून अापण घ्यायचं काय, हा खरा प्रश्न अाहे.

  - पीयूष नाशिककर, नाशिक
  piyushnashikkar@gmail.com

 • Piyush Nashikkar writes about Marathi tv serials
 • Piyush Nashikkar writes about Marathi tv serials

Trending