Magazine / कीप सायलेन्स, नो नॉनसेन्स!

नाशिकलाच ‘एक शून्य तीन’ या नाटकादरम्यान असाच फाेन वाजला आणि सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर यांनी नाटक थांबवले हाेते

पीयूष नाशिककर

Jun 16,2019 12:06:00 AM IST

वेफर्स वा कुरकुरेंचे आवाज, त्याच्या रॅपर्सचे आवाज, कुठे पाेरगंच रडतं तर कुठे काेणी तरी माेठा आवाज करत आपल्या झाेपेला जवळ करतं, काेणी आपल्याला आलेल्या शिंकेचं प्रदर्शन करतं तर काेणी खुर्च्यांचा कर्र कर्र आवाज करत नाट्यगृह प्रशासनाचे वाभाडे काढण्यात मग्न असतं. काेणाला दहा वेळा तहान लागते तर काेणाला प्रेक्षागृहाच्या दरवाजाचा आवाज फारच आवडू लागताे. नाटकाच्या पार्श्वसंगीतापेक्षा हेच संगीत दिवसेंदिवस वाढू लागलं आहे.


नाशिकलाच ‘एक शून्य तीन’ या नाटकादरम्यान असाच फाेन वाजला आणि सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर यांनी नाटक थांबवले हाेते. गंमत म्हणजे त्या वेळी माेबाइलवर बाेलणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने “तुमचं चालू द्या” असं केलं आणि मी स्तब्ध झाल्याचं सुमीत सांगताे.

पडदा उघडताे... दिवाणखान्याचा सेट... काेपऱ्यातील टेबलावर किंवा नक्षीदार खांबवजा स्टँडवर असलेला माेबाइल खणाणताे. त्याच्या चार-आठ रिंग वाजतात आणि ‘ते ना ते आताच बाहेर गेलेत’ किंवा मग (एकदम धक्कादायक हावभाव) काय...? हे कसं शक्ययं... असे संवाद सुरू हाेतात. आता-आतापर्यंतच्या अनेक नाटकांची सुरुवात ही अशीच हाेत असे. बरं त्या नाटकातील फाेन इन्स्ट्रुमेंट‌्सही अगदी बघण्यासारखे असायचे. नाटकाचे ज्याने संगीत केले आहे त्याच्या हातात या फाेनची रिंग असायची, किंबहुना आताही अनेक नाटकांमध्ये माेबाइल वाजतात तेव्हाही ती रिंग संगीत संयाेजकच वाजवत असताे. आता कलाकार मंचावर जाेपर्यंत ताे फाेन उचलत नाही ताे पर्यंत ती रिंग वाजत राहणारच. मग एखाद्या प्रयाेगात ती चार वेळा वाजते तर एखाद्या प्रयाेगात ती दाेन वेळाच वाजते. त्याच्यावर नियंत्रण असतं ते म्युझिक आॅपरेटरचं. असा हा फाेन जाेपर्यंत नाटकात रंगमंचावर वाजताे ताेपर्यंत सगळं काही ठीक असतं. पण, ताेच फोन प्रेक्षागृहात सातत्याने वाजला तर मग...? (नाॅक नाॅक) सेलिब्रिटींचा पारा चढणारच की! सुमीत राघवनचा चढला त्यात नवीन ते काय? फक्त तशी घटना घडल्यावर ताे व्यक्त झाला. अनेक कलाकार दुर्लक्ष करून आपलं नाटक पुढे सुरू ठेवतात. पण, असं घडतंच का? यावर खरी चर्चा व्हायला हवी.
नाशिकला काही दिवसांपूर्वीच "नाॅक नाॅक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान असाच माेबाइलच्या रिंगचा खेळ झाला. यावर सुमीतने नक्की काय घडले तेदेखील साेशल मीडियावर सांगितले आहे. ""प्रयाेगादरम्यान बऱ्याच जणांचा माेबाइल वाजत हाेता. त्यातीलच एका गृहस्थाने माेबाइल रिसिव्ह करण्याच्या नादात दरवाजा उघडून आत-बाहेर केलं, तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही, पण सभागृहाचं दार दर वेळी आदळायचं आणि धाडकन आवाज व्हायचा, पुढे एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला "अहो हळू बोला’ असं बोलली, त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर ऐकू येत होतं आणि शेवटी पहिल्या रांगेतील एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं.'' असं सुमीत राघवनने सांगितलं आहे. कलाकार संपूर्ण नाटक बंद करताे, पण रसिक प्रेक्षक आपला माेबाइल साधा व्हायब्रेटवर टाकू शकत नाही यासारखं दुर्दैव ते काय?


बरं, हे सगळं नाशिकमध्येच घडतं या प्रश्नाचीही उकल काही केल्या हाेत नाही. मागे काही वर्षांपूर्वी (म्हणजे माेबाइलचं नुकतच पेव फुटलं हाेतं तेव्हा) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गाेखलेंनीदेखील नाटक सुरू असताना माेबाइल वाजल्यावर काही क्षण नाटक थांबवून आपल्या शब्दांत या प्रकाराचा समाचार घेतला हाेता. तर नाशिकलाच "एक शून्य तीन' या नाटकादरम्यान असाच फाेन वाजला आणि सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर यांनी नाटक थांबवले हाेते. गंमत म्हणजे त्या वेळी माेबाइलवर बाेलणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने "तुमचं चालू द्या’ असं केलं आणि मी स्तब्ध झाल्याचं सुमीत सांगताे. चिन्मय मांडलेकरलाही हा अनुभव "सुखाशी भांडताे आम्ही' नाटकादरम्यान आला हाेता. रंगमंचावर डाॅ. गिरीश ओक आणि चिन्मय यांच्यात संवाद सुरू होते, इतक्यात पहिल्याच रांगेत बसलेल्या प्रेक्षकाचा फोन वाजला. त्याबरोबर तो मोठमोठ्यानं बोलायला लागला. त्या शांततेत त्या प्रेक्षकाचाच आवाज घुमायला लागला. तसा चिन्मय हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत उभा राहिला. तेव्हा प्रेक्षकानं दोन मिनिटं थांबा, अशी खूण केली. नंतर त्याचं बोलणं संपल्यानंतर आता चालू दे, म्हणून खूणही केल्याचं चिन्मयनं नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं.


या आणि अशा अनेक घटना प्रेक्षागृहात घडत असतात. वेफर्स वा कुरकुरेंचे आवाज, त्याच्या रॅपर्सचे आवाज, कुठे पाेरगंच रडतं तर कुठे काेणी तरी माेठा आवाज करत आपल्या झाेपेला जवळ करतं, काेणी आपल्याला आलेल्या शिंकेचं प्रदर्शन करतं तर काेणी खुर्च्यांचा कर्र कर्र आवाज करत नाट्यगृह प्रशासनाचे वाभाडे काढण्यात मग्न असतं. काेणाला दहा वेळा तहान लागते तर काेणाला प्रेक्षागृहाच्या दरवाजाचा आवाज फारच आवडू लागताे. नाटकाच्या पार्श्वसंगीतापेक्षा हेच संगीत दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. याच संगीतात अनेक कलाकार एकाग्रतेने मंचावर आपली कला सादर करत असतात. दाेन-अडीच तासांचं नाटक संपलं की, निघून जातात... जात हाेते. पण, आता ते व्यक्त झाल्याशिवाय जात नाहीत. नाट्यगृहातील असुविधा असाे वा माेबाइलच्या घंटा असाे, ते बाेलू लागले आहेत आणि रसिक निरक्षरता अधाेरेखित हाेऊ लागली आली आहे. तिकीट काढले जाते म्हणजे आम्ही काही नाेकर आहाेत का? इथपासून ते हा कलाकारांचा अपमान आहे, इथपर्यंत वक्तव्य आणि वादावादीही झाली... हाेत आहे. (पण, खरंच जर रसिकांनी पुन्हा एकदा नाटकांकडे पाठ फिरवली तर...!) या सगळ्यांवर खरं तर कलाकार काहीच करू शकत नाहीत. नाट्यनिर्मिती संस्था नाटक सुरू हाेण्याच्या आधी जी अनाउन्समेंट करतात त्यात माेबाइल सायलेंट करा किंवा व्हायब्रेट अथवा बंद करा अशा सूचना देतातच. पण, प्रेक्षक त्याकडे साेेयिस्करपणे दुर्लक्ष करतात आणि नेमका एखादा गंभीर सीन सुरू असताे त्याच वेळी पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा माेबाइल वाजताे, उरलेल्या सगळ्याच प्रेक्षकांचा रसभंग हाेताे.


आता याच्यावर अनेक पर्यायही आहेत. काेणी म्हणे अशा प्रेक्षकांना थेट दंडच ठाेका. (जरा हास्यास्पदच आहे) सामान्य प्रेक्षकाला काेणीही दंड ठाेकेल, पण ती व्यक्ती त्याच शहरातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती, लाेकप्रतिनिधी, ज्येष्ठ कलाकार असेल आणि त्यांचाच फाेन वाजला तर मग दंड ठाेकण्याची नाही तर दंड थाेपटण्याची वेळ नाही आली म्हणजे मिळवलं. दुसरा एक पर्याय म्हणजे नाे स्माेकिंगचे जसे बाेर्ड लावले जातात तसेच सायलेंट झाेनचे बाेर्ड लावावे हादेखील पुढे आला आहे. पण, नेमके अशाच बाेर्डांच्या खाली सिगारेट आेढणारे वा माेबाइलवर बाेलणारे महाभाग (कल्लाकार) जास्तच सापडतील. माेबाइल जॅमरच बसवून टाका असंही काही कलाकारांकडून सांगणं आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे तर विधी समितीच्या सदस्यांनी महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यासंदर्भात पत्रही दिलं आहे.


मात्र, तब्बल तीन तास माेबाईल जॅम करणं कितपत शक्य आहे? कारण आता नाटक हे जीवनावश्यक नसून माेबाइल हा जीवनावश्यक आहे. त्यामुळे खरं तर काेणताच पर्याय इथे याेग्य नाही आणि जर तसे काही केले तर कदाचित रसिकप्रेक्षक कमी हाेण्याचीच शक्यता अधिक आहे. (आधीच अनेक नाटकांना प्रेक्षागृहातील काेपराही भरत नाही) या सगळ्यावर एकच पर्याय याेग्य आहे ताे म्हणजे रसिकांनी आपला सुज्ञपणा दाखवणे, एवढेच. कारण मराठी माणूस नाटक हे फक्त मनाेरंजन म्हणून बघत नाही तर नाटक ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, अनेकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे आणि सगळ्या महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाची आेळख आहे. एवढे जरी लक्षात ठेवले तरी अशा प्रकारांवर आपाेआपच पडदा पडेल.

लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

X
COMMENT