Home | Magazine | Rasik | Piyush Nashikkar writes about play's camp

शिबिरांची नाटकं

पीयूष नाशिककर | Update - Apr 21, 2019, 12:10 AM IST

साे काॅल्ड इंडस्ट्रीत काम करण्यासाठी नाट्य शिबिरांचा उपयाेग हाेताे का? तर त्याचं उत्तर फारसं सकारात्मक येत नाही

 • Piyush Nashikkar writes about play's camp

  साे काॅल्ड इंडस्ट्रीत काम करण्यासाठी नाट्य शिबिरांचा उपयाेग हाेताे का? तर त्याचं उत्तर फारसं सकारात्मक येत नाही. ‘शिबिरांचं नाटक’ करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात शिकणाऱ्यांची संख्याही माेठी आहे. त्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे. नाहीतर अनेक घरात चम्या आणि चिमी शिबिरं करतील, त्यांचा वेळही जाईल.


  ऑडिशनची प्रक्रिया सुरू झाली, या वर्कशाॅपचा विषय निघाला, मग हा पाेरगा सांगताे, सर मी अमूक-तमूक यांचे तीन वर्कशाॅप केलेत. त्या दिग्दर्शकाला ती शिबिर घेणारी व्यक्ती काेण, हे माहितीच नसतं. पाेरगं बिचारं विचार करत बसतं की, आपण ज्यांच्याकडे शिकलाे त्यांना तर आपल्या गावाबाहेर काेणीच ओळखत नाही.


  आता सुट्या लागल्या की सरळ त्याला एखाद्या नाट्य शिबिरात टाक, असा आदेश अनेक मध्यमवर्गीय घरांतून दिला जातो. किंवा एखादी अतीउत्साही आई मुलाची इच्छा नसतानाही त्याला आपल्या चुलत भावाच्या मित्राच्या बायकाेच्या आतेभावाच्या मैत्रिणीने सुरू केलेल्या नाट्य शिबिरात भरती करते. यात दाेन दृष्टीकाेन असतात एकतर सुट्टीत मुलांचा वेळ कसा घालवावा म्हणून पालकांनी स्वत: शाेधलेली साेय आणि दुसरं म्हणजे सध्या मालिकांचे जे पेव फुटले आहे त्यामुळे कुठल्यातरी मालिकेत वा एखाद्या नाटकात ‘झळकेल माझा चिम्या’ या दृष्टीने दाखवलेला भाेळा उत्साह. पण, याचचं भांडवल अनेक संस्था करतात आणि दरवर्षी शिबिरांतून लुटीचं नाट्य सुरूच रहातं. काही संस्था मात्र अपवाद ठरतात आणि त्यांचे अशा शिबिरांमध्ये सातत्यदेखील असते, मंचीय अविष्कार नित्याने हाेत असतात. त्यामुळे मग त्यातील कलाकारांचा उत्साहही टिकून रहाताे आणि त्यातूनच मग एखादा चांगला कलाकार खरोखरच आकार घेत असताे.

  त्यातही नाट्यशिबिर म्हणजे काैतुक साेहळाच. चिम्या नाहीतर चिमी एखाद्या नाट्य शिबिरात जाऊन आले की, घरी काेणताही कार्यक्रम असाे ‘अगं ते शिबिरात शिकवलेलं करून दाखवं नं.’ (या चिम्या आणि चिमीला त्या शिबिराचं काहीही काैतुक नसतं.) बिचारे आळाेखेे-पिळाेखे देत, दाेन्ही हाताची बाेटं एकमेकांत गुंतवत कसंतरी गाय आली, सिंह आला, टुणूक टुणूक भाेपळा म्हणाला... असं काहीतरी म्हणत आणि शेवटचा शब्द पटकन संपवत आईच्या नाहीतर आजीच्या मांडीत धावतच जाऊन बसतात. यापलिकडे शिबिरांच काही हाेतं का? पुण्या-मुंबईत जे माेठे कलाकार शिबिरे घेतात ताे भाग थाेडा बाजूला ठेवावा लागेल. कारण तिथे नाटक हे अत्यंत जवळ आहे. नाटक हा व्यवसाय आहे. पण, या दाेन शहरांच्या बाहेर हाेणाऱ्या शिबिरांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उभा रहाताे. त्या शहरातील किंवा गावातीलच काेणीतरी बरं नाटक करणारा शिबिर घेताे मग त्याच ठिकाणचे जरा नेपथ्य, दिग्दर्शन, प्रकाशयाेजना करणारे तंत्रज्ञ त्याच शिबिरात शिकवायला येतात. राेज साधारण तीन तासांच्या या शिबिरात गेल्या गेल्या आेंकार वगैरे हाेताे, त्यानंतर शरिराचा काहीतर व्यायाम, मग थाेडावेळ शांत बसणे, त्यानंतर डबा-पाणी हाेताे. चार जण जर शिबिरात शिकवायला असतील तर त्यांच्या वेगळ्या गप्पा. पुन्हा माेबाईल आहेतच. समाराेप जसजसा जवळ येऊ लागताे तसं एखादे दाेन माॅब असलेल्या संहिता शाेधल्या जातात आणि त्याचेच सादरीकरण समाराेपाला त्याच हाॅलमध्ये केले जाते. पुढे अगदीच आणखी काही करायचंच या पाेरांना घेऊन तर राज्यनाट्य स्पर्धेत एखादं नाटक सादर केलं जातं. यापलिकडे या शिबिराचं फारसं काही हाेत नाही. फार-फार तर मुलांचा वेळ जाताे, एखादा अगदीच लाजरा-बुजरा असेल तर थाेडा बाेलयाला लागताे वगैरे वगैरे... आणखी यापुढे जाऊन विचार केला तर गावातील एखादी संस्था एखाद्या कलाकाराला (शक्यताे ताे आेळखीचा वगैरे असताे, त्या गावातील पण मुंबईत दाेन-चार मालिका वा नाटक केलेला असताे किंवा त्या गावात इतर काही कार्यक्रमांमुळे येणार असताे) बाेलवून त्याचंही शिबिर घेतलं जातं. माेठं नाव असल्याने अर्थातच मग भविष्यात काही हाेईल किंवा हा कलाकारच हात देईल, त्याच्याच एखाद्या मालिकेत काम मिळेल (खरंतर ताेच बिचारा स्ट्रगल करत असताे) या विचाराने पालकही घालतात भरपूर पैसे भरून मुलांना अशा शिबिरात. दाेन हजारापासून ते वीस हजारापर्यंत या शिबिरांची फी असते हा आणखी एक भाग निराळा.


  तर महत्त्वाचा मुद्दा हा की, साे काॅल्ड इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अशा शिबिरांचा उपयाेग हाेताे का? तर त्याचं उत्तर फारसं सकारात्मक येत नाही. जुने जे कलाकार आहेत जे आजही सांगतात की, आम्ही दुबेजींचे वर्कशाॅप करायचाे, आम्ही विजयाबाईंचे वर्कशाॅप करायचाे. तो काळही वेगळा होता आणि माणसंही. सध्याच्या काळात अशी माणसं नाहीत असे नाही. पण, ती बाेटावर माेजण्याएवढी राहिली आहेत आणि बरेचजण मुंबई, पुणे फार-फार तर नाशिकपर्यंतच आवाका ठेवतात. आता काेणीही येतं आणि नाट्य शिबिर घेतं. बरं असं सगळं सुरू असताना त्या शिबिरात ज्यांची मुलं जातात त्यांनाच नंतर ते शिबिर चुकीचं वाटू लागतं. अशा पावला-पावलावर हाेणाऱ्या शिबिरांवर काेणाचेतरी काहीतरी नियंत्रण असले पाहिजे. याची फी किती असावी, त्यात काय शिकवले जावे, काेणाला प्रवेश द्यायला हवा, वेळ किती असायला हवी आणि या शिबिरार्थींचे पुढे काय? अशी शिबिरांची काहीतरी आचारसंहिता असायला हवी, त्याचे नियंत्रण काेणाकडेतरी असायला हवे. म्हणजे शिबिराला एक वळण येऊन त्याचा बाजारही हाेणार नाही. किमान गणपती उत्सव वा नवरात्र उत्सवासाठी जशी परवानगी घ्यावी लागते तसं तरी काहीतरी असायला हवं. म्हणजे आपल्याला काेणालातरी उत्तर द्यायचं आहे ही भावना जरी शिबिर भरवणाऱ्यांमध्ये आली तरी ही शिबिरं एका वळणावर येतील आणि त्याचं फुटलेलं पेव नियंत्रणात येईल.


  टीव्हीवरील एक कलकार आहे त्याची गम्मत बघा... (मुद्दाम नाव लिहित नाही, बिचाऱ्याला आताच काम मिळालंय) त्याने त्याच्या गावात अनेक नाट्य शिबिरं केली. नंतर नंतर तर ताे त्या शिबिरात येणाऱ्या नव्या मुलांना शिकवायलाही लागला. पुढे मुंबईत गेल्यावर स्ट्रगल सुरू झालं. एका नाटकाच्या आॅडिशनला त्यांने नाट्य शिबिराची काही प्रमाणपत्र, फाेटाेही दाखवले. ती बघताच त्या दिग्दर्शकाने नकार दिला. कारण काय तर या पाेराने ज्याचे शिबिर केले हाेते त्याच्याबद्दलची असूया. मीच कसा माेठा दिग्दर्शक, असं काहीतरी त्यावेळी झालं हाेतं. दुसरा एक किस्सा असा आहे की, आॅडिशनची प्रक्रिया सुरू झाली, या वर्कशाॅपचा विषय निघाला, मग हा पाेरगा सांगताे, सर मी अमूक-तमूक यांचे तीन वर्कशाॅप केलेत. त्या दिग्दर्शकाला ती शिबिर घेणारी व्यक्ती काेण, हे माहितीच नसतं. पाेरगं बिचारं विचार करत बसतं की, आपण ज्यांच्याकडे शिकलाे त्यांना तर आपल्या गावाबाहेर काेणीच आेळखत नाही. पुन्हा बिचाऱ्यांचं शुन्यापासून सगळं सुरू हाेतं. आणखी एक... म्हणजे ‘अच्छा तू त्यांचं वर्कशाॅप केलंय का? मग त्यांच्याचकडे जा नाटक करायला’ हा अविर्भाव. स्ट्रगलरकडे तर असे अनेक किस्से आहेत की, त्याचंच एक नाटक हाेईल.


  असं सगळं झाल्यावर जर त्या पाेराने त्याच्या पालकांना विचारलं की, का घातलंत मला असल्या शिबिराला तर काय उत्तर असेल? इथे घाेडं अडतं. अर्थात सगळीच शिबिरं आणि त्यात शिकवणारे कलाकार ‘फुल्या फुल्या’ नसतात. पण, ‘शिबिरांचं नाटक’ करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात शिकणाऱ्यांची संख्याही माेठी आहे. त्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे. नाहीतर अनेक घरात चम्या आणि चिमी शिबिरं करतील, त्यांचा वेळही जाईल. पण, नाटक काही हाेणार नाही, शिबिरांची नाटकं मात्र हाेत राहतील.

  पीयूष नाशिककर
  [email protected]
  लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

Trending