Magazine / "पवार'फुल्ल यदाकदाचित!

संतोष पवारचं खास वैशिष्ट्य म्हणजे काेणताही नवा, नावाजलेला चेहरा न घेता, ग्लॅमर मागे साेडून देऊन सगळं नव्याने उभं करताे आणि त्याचं नाणं खणखणीत वाजवताे

पीयूष नाशिककर

Jul 14,2019 12:06:00 AM IST

संतोष पवारचं खास वैशिष्ट्य म्हणजे काेणताही नवा, नावाजलेला चेहरा न घेता, ग्लॅमर मागे साेडून देऊन सगळं नव्याने उभं करताे आणि त्याचं नाणं खणखणीत वाजवताे. या वेळीही तेच झालं... त्यानं ‘यदाकदाचित रिटर्न्स’ रंगमंचावर आणलंय आणि ते तुफान चालतंय.


महाभारतातील पात्रे घेऊन सामाजिक घटनांवर विडंबनात्मक भाष्य करणाऱ्या संतोष पवार यांच्या "यदा कदाचित' या नाटकाविरोधात एकेकाळी प्रचंड गदारोळ उडाला होता. निदर्शने, तोडफोड, इतकंच नव्हे, तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या पार्किंग क्षेत्रात स्फोटही घडवून आणला होता.


महाभारतातील पात्रे घेऊन सामाजिक घटनांवर विडंबनात्मक भाष्य करणाऱ्या संतोष पवारच्या "यदा कदाचित' या नाटकाविरोधात एकेकाळी प्रचंड गदारोळ उडाला होता. निदर्शने, तोडफोड, इतकंच नव्हे, तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या पार्किंग क्षेत्रात स्फोटही घडवून आणला होता. नाटकाचे प्रयाेग हाेऊच द्यायचे नाहीत असा विडा उचललेले काही "तथाकथित' कार्यकर्ते... नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल सुरू असल्याने प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेला याचा फायदा आणि नाटकातील कलाकारांची मनमानी अशा अनेक गाेष्टींमुळे अखेरीस "यदा कदाचित' या नाटकाला मान टाकावीच लागली.


हे नाटक रंगमंचावर आणताना संतोष पवारने जे काही कष्ट घेतले हाेते त्यावर अनेकदा बोलून झालं आहे. त्यामुळे ते इथे सांगत नाही, पण, अशा धाटणीचं आणि माॅब असलेलं नाटक करणं, ते विश्वासानं रंगमंचावर टिकवणं आणि कितीही विराेध झाला तरी आपण त्याला ‘प्रयाेग’ म्हणताे म्हणून ते नाटक नेटानं करत राहणं संताेष पवारनं साेडलं नाही. तब्बल ४०-४२ नाटकं त्याने केली आणि करताेच आहे. आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आता पुन्हा एकदा त्याने "यदा कदाचित'मध्ये डाेकं घातलं आहे. संतोष पवारचं खास वैशिष्ट्य म्हणजे काेणताही नवा, नावाजलेला चेहरा न घेता, ग्लॅमर मागे साेडून देऊन सगळं नव्याने उभं करताे आणि त्याचं नाणं खणखणीत वाजवताे. या वेळीही तेच झालं... त्यानं ‘यदाकदाचित रिटर्न्स’ रंगमंचावर आणलं. खरं तर यावेळीही अनेकांनी भुवया उंचावल्या. सध्याचे सामाजिक वातावरण आणि त्यात हा पुन्हा जुनंच चकचकीत करून विकू बघताेय म्हटल्यावर अनेकांना शंका आली. पण, जेव्हा नाटक रंगमंचावर आलं तेव्हा जुन्या नाटकाला या नाटकानं मागे टाकलं असं म्हणावं लागतं. गण, गवळण... ती देखील एकविसाव्या शतकातली. म्हणजे डाेळ्यावर गाॅगल लावलेली गवळण येते आणि ती टीव्ही मालिकांच्या गाण्यांवर बरंच काही सांगून जाते. इतर गाणीही तशीच. नाटकाची सुरूवातच अशी भन्नाट झाली की, ते नाटक रसिकांना आवडणारंच. एकतर रसिकांना आठवडाभरातल्या डाेकेदुखीवर एखादा रामबाण उपाय म्हणून मनाेरंजन हवं असतं, त्यांना खळखळून हसायचं असतं. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच "यदा कदाचित रिटर्न्स'सारखी नाटकं मंचावर येतात आणि दाेन-अडीच महिन्यांच्या कालावधीत माेजक्याच प्रयाेगांतून रसिक त्यांना डाेक्यावरही घेतात. ही कमाल का हाेते तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे नाटकात एकही जुना चेहरा नसणं. हल्ली काेणतंही नाटकं चालवायचं असलं तर त्यातील प्रमुख भूमिकेसाठी सध्याचा रसिकांच्या मनातील, आेळखीचा चेहरा घेण्याची पद्धत आली आहे. पण, संताेष पवार याला नेहमीच फाटा देत त्याच्या अनेक नाटकांमध्ये नव्या दमाची फळीच घेताे, त्यांना उभं करताे. आपण जर हे नवीन नाटक बघितलं तर यातील १६ कलाकार अजिबातच नवे आहेत. त्याचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, असं जराही वाटत नाही. त्यांच्यातील लवचिकता, विषयाचे महत्व विनाेदी अंगानं पाेहाेचवितानाही आपल्या कलेतील गांभीर्य आणि मिळालेल्या संधीचं साेनं करताना उडवून दिलेली धम्माल हेच दाखवून देते की, बाॅस, यामागे प्रचंड कष्ट आहेत. संताेष नाटकाच्या दाेन-चार महिने आधी ते कष्ट घेताेच. पण, कलाकारही त्या दमाचे मिळाले की मगच यदाकदाचित आणि यदाकदाचित रिटर्न्स घडत असतं.


अगोदरच्या यदाकदाचित नाटकात त्यानं महाभारत आणि रामायणातील पात्रं आणि जाेडीला श्रावणबाळ, विरप्पन, देवानंद असे कॅरेक्टर घेऊन समाजातील तत्कालिन विषयावर भाष्य केले होते. रंजनाबराेबर अंजन घालणे ही त्याची धाटणी जशी त्या नाटकात हाेती तशीच या नाटकातही आहे. त्या नाटकातील महाभारत, रामायणातील पात्रांना अनेकांनी विराेध दर्शवला हाेता. पण, लेखक, साहित्यिक, नाटककार एकुणातच हुशार असताे. संताेषनेही तीच हुशारी वापरली. आेके, ठिक आहे... तुम्हाला रामायण, महाभारतातील पात्रं घेतली तर आक्षेप आहे ना? असू द्या, आपल्याकडेे उपाय आहे, असे म्हणत त्याने आता पुन्हा ताेच जुना फाॅर्म ठेवत नवी संहिता घेऊन खेळ मांडला आहे. आता या नाटकातील बिरबल, शाहिस्तेखान, बाहुबली, कटप्पा, शांताबाई, न्यायदेवता, विक्रम-वेताळ, सिम्बा, सिंघम, इम्रान, देवसेना, शिवगामिनी अशा किमान डझनभर पात्रांना काेणाचाच आक्षेप नसावा. ही कॅरॅक्टर काही काेणाच्या भावना दुखावत नाहीत. खरंतर आधीच्याही नाटकातून तसं काही फार अधाेरेखीत हाेत नव्हतंत. पण, तत्कालिन राजकारण, वातावरण, नाट्य वर्तुळातील स्पर्धा आणि कलाकारांचे पाय जमिनीवरून चार बाेटं वर येणं अशी अनेक कारणं त्या नाटकाला तिथेच ठेवून आली. या वेळी मात्र धिंगाणा, धमाल, गम्मत, जम्मत काही वेगळीच आहे. डझनभर पात्रं जेव्हा एकत्र येतात आणि दाेन भावांपैकी राजेपद काेणाला द्यायचं यासाठी क्रिकेट मॅच ठरते (आधीच्या यदाकदाचितमध्ये द्युत दाखवले हाेते.) त्यात धाकटा पराभूत हाेताे. मग कष्ट, शेती आणि शेवटी एक मेसेज देताना डाेळ्यांच्या कडा आेल्या करण्यात ही टीम यशस्वी हाेते. राज्यातील शेतकऱ्यांचं जगणं अखेरच्या प्रसंगात अधाेरेखित हाेतं. स्वत:ला पेटवून घेणे, िवष घेऊन आत्महत्या, महाराष्ट्र दिनीच पंख्याला लटकणे हे शासन व्यवस्थेचे बळी हृदय पिळवटून टाकतात. एकीकडे पाेट धरून हसताना दुसरीकडे जेव्हा विचार करायला लावणारे प्रसंग येतात तीच खरी नाटकाची जमेची बाजू म्हणावी लागेल. यदाकदाचितमध्ये रामायण-महाभारतातील पात्रं बघायला मिळाली, यदाकदाचित भाग २ मध्ये अप्पा बेलवलकर, फुलराणी, आबा टिपरे, विच्छातील हवालदार, सिंधू-तळीराम हे जसे भेटले तर या नाटकातून त्याने पात्रांचे वेगळंच काॅम्बिनेशन आणलं आहे. अनेक जुनी नाटकं रंगमंचावर येतात पण, त्याच्या संहितेत बदल नसताे, बाकी टीम बदलते. संताेषच्या यदाकदाचित सिरीजमध्ये मात्र बाज ताेच आहे पण, कलाकार आणि विशेष म्हणजे त्यानं अर्थ, आशय या ना त्या मार्गाने एकच ठेवत नवं नाटक देण्याचा फील आणला आहे.


लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९

X
COMMENT