आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पीयूष नाशिककर
चिल्ला म्हणजे चाळीस. पूर्वीचे तबलावादक साधनेचा रियाझ करण्यासाठी चाळीस दिवस सलग राेज ठराविक तास तबल्यामधील एखाद्या रचनेचा सराव करत असत. खंड न पडता व रियाझाचा वेळ कमी न करता ही साधना हाेत असे. या रियाझ परंपरेचे तबला चिल्ला असे नामकरण झाले.
तबला...या वाद्याचे बाेल कानात घुमत राहतात. त्याच्यावर सहजच ठेका धरला जाताे. पण, सतत वाजवलेला किंवा एेकलेला तबला बरेचदा एकसुरीही वाटू शकताे. या एकसुरीपणाला छेद देऊनही अखंड तबला वाजत राहताे आणि शिकणारा वा एेकणाराही त्यात तल्लीन हाेऊन जाताे ताे कार्यक्रम म्हणजे ‘तबला चिल्ला’. पद्मभूषण अहमदजान थिरकवा खाँसाहेब हे तबला वादनातील सर्व साधकांचे दैवत. संपूर्ण आणि सर्वांगीण तबला असे त्यांच्या वादनाचे वर्णन केले जाते. खाँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘साधनेचं सादरीकरण’ हा कार्यक्रम नाशिकमध्ये गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.
चिल्ला म्हणजे चाळीस. पूर्वीचे तबलावादक आपल्या साधनेचा रियाझ करण्यासाठी चाळीस दिवस सलग राेज ठराविक तास तबल्यामधील एखाद्या रचनेचा सराव करत असत. खंड न पडता व रियाझाचा वेळ कमी न करता ही साधना हाेत असे. या रियाझ परंपरेचे तबला चिल्ला असे नामकरण झाले. थिरकवाँ खाँसाहेबांनी असा चिल्ला व साधना ९ वर्षे सलग राेज १६ तास याप्रमाणे केलेली आहे. नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते. १९६४ आणि १९६७ या दाेन वर्षी थिरकवाँ खाँसाहेब नाशिकला कार्यक्रमासाठी आले हाेते. ज्येष्ठ तबलावादक पं. भानुदास पवार, पं. विजय हिंगणे आणि पं. कमलाकर वारे या ‘भा. वि. क.’ त्रयीने हे कार्यक्रम घडवून आणले. १९६७ च्या कार्यक्रमावेळी खाँसाहेब ८७-८८ वर्षांचे असताना त्यांनी सलग साडेतीन तास तबलावादन केले हाेते. प्रकृती बिघडल्याने त्यांचा नाशिकमधील मुक्काम वाढला आणि तबलावादकांना साक्षात तबलावादनातील ईश्वराकडूनच धडे घेण्याची संधी मिळाली. त्याच ठिकाणी या तबला चिल्लाची नाळ जाेडली गेली. फक्त तबलावादन असे कार्यक्रम तसे कमी हाेतात आणि जे हाेतात ते अत्यंत दिग्गज लाेकांचे; तेही दुर्मिळात दुर्मिळ. पण, खाँसाहेबांचा तबला त्यांचे शिष्य पं. नारायणराव जाेशी यांच्या रूपाने पुन्हा अनेकांना शिकता आला, अनुभवता आला. म्हणूनच या महान लाेकांपुढे नतमस्तक हाेण्याच्या भावनेने आदिताल तबला अकादमीच्या माध्यमातून नितीन वारे यांनी ‘तबला चिल्ला अखंड नादसंकीर्तन’ सुरू केले. हा कार्यक्रम म्हणजे फेस्टिव्हल नाही तर हे आहे साधनेचं सादरीकरणच. या ठिकाणी जे अनेक दिग्गज तबलावादनासाठी येतात त्यांची शस्त्रं-अस्त्रं या संकल्पनेपुढे गळून पडतात हे स्पष्ट दिसतं. कारण समाेर बसणारे सगळे दिग्गज आणि वाजवणारेही दिग्गज. त्यात ८ ते ८० वर्षांपर्यंतचे तबलावादक असल्याने शिक्षणाचे, विचारांचे आदानप्रदान हाेते. नाशिकच्या या कार्यक्रमात पं. किरण देशपांडे हे ८२ वर्षांचे ज्येष्ठ गुरू वादनासाठी आले हाेते. तबला चिल्लाचा धागा धरत तरुणांनाही लाजवेल असे वादन करत त्यांनी या साधनेवर कळस चढविला. थिरकवाँ खाँसाहेबांच्या स्मृतिनिमित्त जरी हा कार्यक्रम हाेत असला तरी संपूर्ण भारतातील तबल्याचा एक ‘फ्लेवर’ या ठिकाणी एेकायला आणि बघायला मिळताे. बनारस, दिल्ली, अजमेर, भाेपाळ, इंदूर येथील तबलासाधनेचं आदानप्रदान यानिमित्ताने हाेतं. अनेक जण त्रितालात सादरीकरण करतात, त्यामुळे ते एकसुरी हाेण्याची शक्यता असते. कारण चिल्ला म्हणजेच अखंड वादन. पण, म्हणूनच त्या सादरीकरणातील वैविध्य हेच तबला चिल्लाचं वैशिष्ट्य ठरतं. या तबला चिल्लासाठी नाशिकच नव्हे तर मुंबई, पुणे, सातारा, काेल्हापूर, जळगाव, धुळे, साेलापूर, ठाणे, आैरंगाबाद, लातूर अशा राज्यातील आणि राज्याबाहेरील शहरांमधूनही फक्त एेकण्यासाठी रसिक येत आहेत. बरं, फक्त रसिक वा शिष्यांनी तबला एेकायचाच का? तर असे नाही. दिग्गज वादक तीन दिवस थांबतात, एकाच ठिकाणी राहतात. मग अधेमध्ये गप्पा रंगतात. जेवताना, चहा घेताना अनेकजण एकमेकांना भेटतात आणि तबलावादनाचे मंत्र देतात. या तबला चिल्लामुळे समस्त वादकांसाठी आता ते एक संमेलन हाेऊ लागलं आहे. त्यामुळेच सगळे तबलावादक या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत असतात; कारण हा फक्त कार्यक्रम नाही तर ते आहे साधनेचं सादरीकरण.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.