आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Piyush Nashikkar Writes About Two Greatest Personality Of Theater Piyush Nashikkar Writes About Two Greatest Personality Of Theater

खुर्ची एक... दिग्गज दोन!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीयूष नाशिककर  

शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यानिमित्ताने समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीचे समर्थक आमने-सामने आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही नियामक मंडळाचे सदस्य बहुमताने करतात. शंभरावे नाट्यसंमेलन हे ऐतिहासिक नाट्य संमेलन असल्यामुळे डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांच्यामधून कोणाची निवड होणार याकडे नाट्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
 
एखादा मतदारसंघ असताे आणि तिथे अमक्या-तमक्याला तिकीट देण्यापेक्षा अमुक-ढमुकाला तिकीट दिले तर पक्षाचा फायदा हाेईल हा विचार करताना त्या अमुक-ढमुकचे काम, त्याला असलेला लाेकांचा पाठिंबा, कार्यकर्त्यांची फळी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताे काेणत्या समाजातून येताे त्याचबराेबर ताे पक्षश्रेष्ठींच्या मनात आहे की नाही अशा सगळ्याच बाबींचा विचार त्या पक्षातील तथाकथित वरिष्ठ करत असतात. या सगळ्या पातळ्या त्याने पार पाडल्या की, मग आर्थिक भाग बघून त्याला तिकीट दिले जाते. आता हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. पुन्हा सांगायचं कारण म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष पदासाठीची हाेऊ घातलेली रस्सीखेच. नाट्य परिषद मध्यवर्तीच्या काही धुरिणांनी डाॅ. जब्बार पटेलांचे नाव लावून धरले आहे तर परिषदेच्याच काही शाखांनी माेहन जाेशींचे नाव पुढे केले आहे. जाेशींनी तसा अर्जही दाखल केला आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने घेतले जाणारे यंदाचे १०० वे संमेलन आहे. अर्थातच त्याचा थाटही तसाच असणार. किंबहुना ताे थाट कसा वाढेल यासाठी साहजिकच प्रयत्न हाेणार. नागपूरच्या संमेलनासारखा एखादा मातब्बर स्वागताध्यक्ष मिळाला तर मग बघायलाच नकाे.  सांगलीपासून हे संमेलन सुरू करू आणि राज्यातील विविध ठिकाणी विविध प्रकारे वर्षभर संमेलन सुरू कसे राहील असे काहीतरी नियाेजन करू अशी चर्चा नागपूरच्या संमेलनावेळीच रंगली हाेती. पण त्याआधी नावाचा गणपती बसवावा लागताे, तसे संमेलनाध्यक्ष हे पद. बरं हे पद काही मानाने-बिनाने बहाल केले जाते वगैरे असे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वाटत असते. पण तसं काही नसतं. पदाधिकाऱ्यांचं एेकणारा, ते सांगतील तसं वागणारा, थाेडक्यात काय तर ‘मम’ म्हणणारा आणि एेनवेळी काही वाद झालेच तर पदाधिकाऱ्यांच्याच बाजूने राहणारा असा एक चेहरा त्यांना हवा असताे. बरं पद मानाचं... मग ते मिरवण्यासाठी या सगळ्या गाेष्टी केल्या तर काय बिघडलं? तसंही ज्यांची ‘एसटी’ बंद पडली असेच अनेक जण  संमेलनाध्यक्षपदी का विराजमान हाेतात? तर ज्येष्ठ म्हणून... त्यांचं काम माेठं-बिठं म्हणून ताेंडदेखले त्यांच्याबद्दल किती आदर-बिदर आहे हे दाखवायचं आणि त्यांना त्या खुर्चीत नेऊन बसवायचं. या लाेकांना एखादा तरुण किंवा मधल्या फळीतला चांगला रंगकर्मी म्हणजे ऋषिकेश जाेशी, अतुल पेठे, संताेष पवार, अरविंद जगताप अशी काही वेगळी नावं संमेलनाध्यक्षपदासाठी का चालत नाही ते एक वेगळंच नाटक. ‘तुम्ही किती नाटकं केली यापेक्षा काेणत्या आशयाची नाटकं केली. त्याचा समाजाला काय फायदा झाला हे महत्त्वाचे’ असं बाेथट वाक्य अनेक रंगकर्मी म्हणत असतात. पण मानधनाच्या पाकिटासाठी अनेक जण मिळेल ते नाटक करून आपला खिसा भरून घेत असतात. अर्थातच त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन असल्याने त्याला काही काेणी नावं ठेवू नये. पण मग उगा आपण वेगळ्या ट्रॅकवरचे कलाकार म्हणून मिरवूही नये. तर असाे... विषय पटेल की, जाेशी असा आहे.

आता येत्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डाॅ. जब्बार पटेल यांना परिषदेने पुढे केलं आहे, तर दुसरीकडे माेहन जाेशी यांनी अर्ज दाखल केल्याने गंमत वाढली आहे. (याला गंमतच म्हणावं. सामान्य माणूस आता याकडेही मनाेरंजन म्हणूनच पाहू लागला आहे.) दाेन्ही उमेदवार तसे ताेडीस ताेड आहेत. पण डाॅ. पटेलांचे नाटकापेक्षा चित्रपट अधिक आठवतात. नाटक तसं कमीच, पण माेहन जाेशी अजूनही स्क्रीनवर या ना त्या मालिकेत दिसतात. नुकतंच त्यांनी ‘नटसम्राट’ही केलं. तर त्यांचं ‘गाढवाचं लग्न’ही चांगलंच फेमस झालं हाेतं. आता जर सामान्य माणसाला वा रसिकाला विचारलं की, बाबा रे तुला संमेलनाध्यक्षपदी काेणाला बघायला आवडेल? तर बहुतेच सगळेच माेहन जाेशी यांचंच नाव घेतील यात फार काही शंका नसावी. त्याची कारणंही तशीच आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गाैरीचे बाबा म्हणून त्यांनी अनेकांच्या मनात घर केलं. तर सध्या सुरू असलेली ‘जीव झाला येडापिसा’ किंवा ‘ती फुलराणी’ मालिका असाे यातून ते वेगळ्या पद्धतीने रसिकांना भेटतात. किंबहुना ते राेज सामान्य रसिकांना दिसतात. अजूनही नाटक करतात. त्यामुळे सामान्य रसिक त्यांचं नाव पटकन घेणं साहजिकच आहे. 

तसं डॉक्टरांचे नाव पटकन घेतलं जाणार नाही. काही जणांना ते आठवावंही लागेल. कारण दिग्दर्शक तसा पडद्याआडचा कलाकार. म्हणूनच नाटक संपल्यावरही त्याच्याभाेवती गर्दी हाेत नसते. पटेलांच्या ‘घाशीराम काेतवाल’ नाटकाने जरी रंगभूमीवर धुमाकूळ घातला असला तरी आताच्या पिढीला "घाशीराम'मागचे अनेक सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पदर माहीत नाहीत. पटेलांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर ते चित्रपटांमध्ये अधिक रमलेले दिसतात. सामना, सिंहासन, उंबरठा, जैत रे जैत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, मुक्ता अशी काही त्यांच्या चित्रपटांची नावे घेता येतात. त्यांनी अनेक लघुपटही बनवले आहेत. मग तसं बघितलं तर माेहन जाेशींची ही यादी माेठी हाेती. अनेक हिंदी-मराठी चित्रपट, मालिका, नाटक अशी सगळीकडेच त्यांची मुशाफिरी आहे. मुळात ते सध्या रसिकांना दिसतात. त्यामुळे खरंतर शंभरावे संमेलन, नटाची प्रसिद्धी, सध्या त्याचं स्क्रीनवर दिसणं, यामुळे संमेलनाला हाेणारी अपेक्षित गर्दी असा सगळा विचार केला तर जाेशी वरचढ ठरतात. पण नाट्य परिषदेने डाॅ. जब्बार पटेल यांचे नाव धरून ठेवले आहे. पटेलही तसे स्पष्टवक्ते आणि जाेशीही. पण जाेशी त्यांना न पटणारी गाेष्ट करत नाही. परिषदेचं म्हणजे त्यांचं एेकणारा माणूस त्यांना हवा असताे. (खरंतर पटेलांचं नाव याबाबतीत घेता येणार नाही. तेही अभ्यासू आणि आपलं मत स्पष्टपणे मांडणारेच आहे.) पण तरीही परिषदेने त्यांचेच नाव पुढे केले. याची कारणं काही वेगळीच आहेत. एकतर परिषदेच्या गेल्या निवडणुकीत माेहन जाेशी यांचं पॅनल सध्याचे अध्यक्ष प्रसाद कांबळी याच्याविराेधात उभं हाेतं आणि दुसरं म्हणजे मोहन जोशींच्या परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात नाट्य परिषदेचा अंतर्गत कारभार बऱ्यापैकी चव्हाट्यावर आला होता. या कारणांमुळेही माेहन जाेशी यांना चर्चा करून आता थांबायला लावण्याचा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कदाचित विचार दिसताे. 

नवीन कार्यकारिणी आल्यानंतरचे पहिले संमेलन झाले मुलुंडला. त्या वेळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्ती शिलेदार नाट्य संमेलनाध्यक्ष हाेत्या. त्याला कारणही वेगळं हाेतं. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे ‘संगीत देवबाभळी’ जाेरात हाेते. संगीत नाटक रंगभूमीवर उत्तम चालत असल्याने आणि कीर्तीताईंचे श्रेष्ठत्व म्हणून त्यांना संमेलनाध्यक्ष केले. नंतर नागपूरच्या संमेलनात थेट प्रेमानंद गज्वी यांना बसवले. लिखाणातून गज्वी जसे व्यक्त हाेतात तसे संमेलनाध्यक्षपदावरून व्यक्त झाले नाहीत हे त्या-त्या वेळी सगळ्यांनीच पाहिलं, एेकलं. त्यामागे परिषद असल्याचंही माध्यमांमधून लपून राहिलं नाही. आता या वेळी पटेलांना या खुर्चीत पदाधिकारी बसवू पाहत आहेत. त्यासाठी सर्व वादविवाद टाळून संमेलन निर्विघ्नपणे व्हावं आणि संमेलनाध्यक्षांची निवड ही अविराेध व्हावी यासाठी प्रयत्न हाेणं साहजिकच आहे.

एकमताने निवड व्हावी हे वाक्य उत्तम आहे. पण हे एकमत सगळ्यांचं असलं पाहिजे याचाही विचार व्हायला हवा. आता जर काही जणांना डाॅ. पटेल अध्यक्ष व्हावे असं वाटत असेल आणि काही जणांना माेहन जाेशी अध्यक्ष व्हावे असं वाटत असेल तर मग निवडणूक घ्यायला काय हरकत आहेत आणि तसे दाेघेही ज्येष्ठ, विचारी, अभ्यासू आणि समंजस आहेत. एखादवेळी त्यांनाच समाेर बसवावं आणि तुम्ही दाेघंही ठरवूच शकतात की? असाही एक पर्याय पुढे येऊ शकताे. आता पदाधिकारी सांगतात की, जाेशी चर्चेला तयार आहेत. त्यांच्याशी चर्चा करू. म्हणजे हा पदाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार आहे. मग यातून त्यांना जाेशी अध्यक्षपदी नकाेच असाच अर्थ ध्वनित हाेत नाही का? काही शाखांना पटेल हवेत तर काहींना जाेशी. अशा वेळी निवडणूक हा सरळ मार्ग आहे किंवा एकाने या वर्षी, एकाने पुढल्या वर्षी असा सामंजस्य करार करायला हवा. 

शेवटी काय तर संमेलन १०० वे. त्यामुळे त्याचे अध्यक्ष हाेणं हे पण मानाचं पान. म्हणूनही हे लाॅबिंग चालेलच. पण अध्यक्ष काेणीही हाेवाे. ते पुढील वर्षभर काय करतात हे सर्वश्रुतच आहे आणि मुख्य म्हणजे या अध्यक्षपदाशी सामान्य माणसाला, रसिकाला काही देणेघेणे नसते. हे उगीचच त्या वर्तुळात वावरणाऱ्यांना एक वेगळंच काैतुक असतं. या काैतुकाचाही हंगाम येताे आणि निघून जाताे. त्यापैकीच आता हे एक हंगामी नाटक. दुसरं काय? आपण सामान्य रसिकाने आपलं छान नाटक बघावं. नाट्यसंमेलनासाठी घडणाऱ्या या गाेष्टींतून मनाेरंजन करून घ्यावं आणि गप्प बसावं. (हसलं तरी चालतं.)

लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९