आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोग पावसाचा : विमान अजून अमेरिकेतच, कृत्रिम पाऊस लांबणार! औरंगाबाद परिसरात ढगांचा अभ्यास न करताच होणार बीजारोपण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर  - औरंगाबाद परिसरात होऊ घातलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. कारण औरंगाबादेत ढगांमध्ये पाण्याचे बीजारोपण करण्यासाठी वापरले जाणारे “बिच क्राफ्ट सी ९०’ हे विमान अजूनही अमेरिकेतच आहे. औरंगाबाद परिसरात कृत्रिम पावसासाठी एक विमान व एका रडारची आवश्यकता आहे. हे दोन्ही अजून अमेरिकेतच असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते भारतात येण्याची शक्यता आहे. यानंतरच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होऊ शकेल.


महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यासाठीची आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया उशिराने सुरू करण्यात आली. जुलै महिन्यात याची निविदा काढण्यात आली. बंगळुरू येथील कॅथिक क्लायमेट माॅडिफिकेशन संस्थेला हे काम मिळाले, तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने फेब्रुवारी महिन्यातच या कंपनीला कंत्राट दिले आहे. कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने मात्र कृत्रिम पावसाच्या तयारीबाबत दिरंगाई केली. 
 

 

कृत्रिम पाऊस पाडण्यापूर्वी ढगांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आयआयटीएम पुणे येथील शास्त्रज्ञांच्या मते, पाऊस पाडण्यापूर्वी ढगांचे २०० सॅम्पल मिळवणे गरजेचे आहे. मात्र औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आधीच खूप उशीर झाल्याने अभ्यास न करताच थेट ढगांचे बीजारोपण केले जाणार आहे.

 

२०० किमीच्या परिसरात होणार ढगांचे बीजारोपण
> {औरंगाबाद शहरापासून जवळपास २०० किमी परिसरात पसरलेल्या ढगांमध्ये पाण्याचे बीजारोपण केले जाणार आहे. 
> यासाठी रडार यंत्रणेचा वापर केला जाईल. दर १० मिनिटाला ढगांचे फोटो संगणकीय प्रणालीवर अपडेट होतील. 
> त्याचा अभ्यास करून विमान उड्डाण करेल. अमेरिकेहून येणारे हे विमान सुमारे चाळीस कोटी रुपये किमतीचे आहे. 
> हे विमान जमिनीपासून दीड किमी ते नऊ किमी  किमी उंचीवर उडेल. 

 

कॅल्शियम क्लोराइडची फवारणी करणार
बिच क्राफट सी ९० विमानाचा वापर बीजारोपणासाठी केला जाईल. हे विमान २०० किमी अंतरावर पसरलेल्या ढगांचा अभ्यास करेल. यासाठी जमिनीपासून सुमारे दीड किमी ते ९ किमी उंचीवरून विमान उडेल. ढगाच्या खालच्या बाजूस विमान पंखाजवळ बसवलेल्या शॉवरसारख्या छिद्रातून कॅल्शियम क्लोराइड फवारेल. यानंतर ते ढगांत झिगझॅग पद्दतीने उडेल. याच वेळी ते ढगाचे आकार, ढगातील पाण्याचे द्रवकण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. ढगांमध्ये पाण्याचे कण असतातच. कॅल्शियम क्लोराइडमुळे ढगांतील पाण्याच्या कणात वाढ होईल. यालाच ढगांचे बीजारोपण म्हणतात. ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले की पाऊस पडण्यास सुरुवात होते.

 

साेलापुरातही आजपासून होणार ढगांचे बीजारोपण
सोलापूर । पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने सोलापूर व परिसरात असणाऱ्या ढगांच्या अभ्यासासाठी सोमवारपासून ढगांमध्ये विमानाद्वारे ढगांचे बीजारोपण केले जाणार आहे. यासाठी विशेष दोन विमाने सोलापुरात दाखल झाली आहेत. ढगांचा अभ्यास जवळपास १२० दिवस चालणार असल्याची माहिती डॉ. तारा प्रभाकरण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ढगांचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथील आयटीएम या संस्थेला नियुक्त केले. या संस्थेच्या वतीने सोलापूर व परिसरातील ढगांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी अमेरिकेत डिझाइन केलेल्या खास विमानांचा वापर होणार आहे. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट येथे बसवण्यात आलेल्या रडार प्रणालीचाही वापर केला जाणार आहे. 
 

 

कृत्रिम पाऊस पाडण्यापूर्वी २०० सॅम्पलचा अभ्यास :

सध्या भारतासह जगात ५६ देशांत ढगांचा अभ्यास सुरू आहे. साधारणत: कृत्रिम पाऊस पाडण्यापूर्वी ढगांच्या दोनशे सॅम्पलचा अभ्यास करावा लागतो. सोलापूरमध्येही हा प्रयोग करण्यात येणार असल्याने या भागांत गेल्या वर्षीपासून  ढगांचा अभ्यास सुरू आहे. यासाठी ८३ सॅपल्स जमा करण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...