आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक देशांत बाेइंग 737 वर बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - इथिओपिया एअरलाइन्सचे बोइंग ७३७ मॅक्स-८ विमान रविवारी क्रॅश झाले होते. यामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांसह सर्व १५७ प्रवासी मारले गेले. त्यानंतर इथिओपियाने देशातील सर्व बोइंग ७३७ मॅक्स-८ विमानाच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. चीननेदेखील त्यांच्या देशातील या मॉडेलची सर्व विमाने उभी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात मात्र यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसून सार्वजनिक हवाई वाहतूक मंत्रालयाने हवाई वाहतूक नियामक डीजीसीएसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. 

 
मागील पाच महिन्यांत बोइंग ७३७ मॅक्स-८ विमान क्रॅश होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी आॅक्टोबर २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये लायन एअरचे बोइंग ७३७ मॅक्स-८ विमान पडले होते, त्या वेळी १८० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.  


भारतात जेट एअरवेज आणि स्पाइसजेटकडे बोइंग ७३७ मॅक्स विमाने आहेत. डीजीसीएने या कंपन्यांव्यतिरिक्त या विमानांची निर्माता कंपनी बोइंग यांच्याकडेही या मॉडेलच्या विमानांची माहिती मागितली आहे. जेट एअरवेजने २२५ मॅक्स विमानांची ऑर्डर दिलेली आहे. यामधील आठ विमाने आली आहेत, तर स्पाइसजेटचा बाेइंगसोबत २०५ विमानांचा करार झाला आहे. यातील १५५ विमाने मॅक्स मॉडेलची आहेत. सध्या स्पाइसकडे ७३७ मॅक्स मॉडेलची १३ विमाने आहेत. या दोन्ही कंपन्यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  


इंडोनेशिया अपघातानंतर अहवाल  
ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियामध्ये बाेइंग ७३७ मॅक्स विमान क्रॅश झाल्यानंतर डीजीसीएने जेट एअरवेज आणि स्पाइसजेट यांच्याकडे या मॉडेलच्या विमानांची माहिती मागितली होती. त्या वेळी डीजीसीएने दोन्ही कंपन्यांना विमानात असलेल्या सध्याच्या समस्या तपासून त्या दूर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर या मॉडेलच्या विमानांमध्ये एमसीएएस सिस्टिमसंदर्भातील अडचणी असू शकतात, असे वृत्त आले होते. एमसीएएस एक प्रकारची स्टॉल रिकव्हरी प्रणाली असून ही प्रणाली पायलटला हवेत विमान थांबणे किंवा विमानाची गती कमी झाल्यास इशारा देते.  


बोइंगचे तपासात सहकार्य  
बोइंगने इथिओपियामध्ये विमान क्रॅश झाल्याबद्दल खेद व्यक्त करत तपासामध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बोइंगची तांत्रिक समिती अपघात झालेल्या ठिकाणी जाणार असून इथिओपियातील अपघात तपास विभाग आणि अमेरिकी आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळासोबत या अपघाताचा तपास करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...