आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक काळात भाई, दादा, नाना, आप्पा, अण्णा, भाऊ, बॉस एकतर तुरुंगाची हवा खाणार किंवा तडिपार होणार  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अंबड पोलिसांनी नियोजन सुरू केले असून गुन्हेगार रडारवर आले आहेत. तब्बल २४ गुन्हेगारांवर तडिपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शिवाय काही गुन्हेगारांना अभय देणाऱ्या काही राजकीय नेत्यांचीही चौकशी केली जाणार असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. 

 

येत्या लाेकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर अंबड पाेलिसांनी कंबर कसली अाहे. ही निवडणूक शांततेत पार पाडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. त्यात अंबड पोलिस स्टेशन संवेदनशील म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पोलिसांनी आतापासून नियोजन सुरू केले असून अनेक गुंड पोलिसांच्या रडारवर आहेत. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, छोट्या-मोठ्या गुंड प्रवृत्तीतून भाईगिरी करणारे अशा सर्वांवरच कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांची संपूर्ण टीम ही कारवाई करीत आहेत. त्यामुळे ऐन निवडणूककाळात भाई, दादा, नाना, अाप्पा, अण्णा, भाऊ, बॉस यांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा जिल्ह्यातून हद्दपार व्हावे लागेल. या सर्व कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. 

 

रात्री रस्त्यावर दिसाल तर जेलमध्ये जाल : 
सिडकोत अनेक भागात रात्रीच्या वेळी गुन्हेगार, टवाळखोर रस्त्यावर फिरत असतात. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बिनकामाचे रस्त्यावर फिरत असाल तर तुम्हाला पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

 

दररोज ८० ते ९० जणांवर कारवाई : 
अंबड पोलिसांनी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली असून तब्बल ८० ते ९० जणांवर दररोज कारवाई होत आहे. यात संशयितांची चौकशी केली जात आहे. तर रस्त्यावर, चौकाचौकात, कट्ट्यांवर बसणाऱ्या टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. 


टिप्पर गँगची हालचाल बंद : 
टिप्पर गँगचे अनेक गुंड वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असतात. नुकतेच अंबड पोलिसांनी टिप्परच्या चार गुंडांना बेड्या ठोकल्या. तर यातील अनेकांवर कारवाई सुरू आहे. तर कारवाईच्या भीतीने अनेकांनी शहरातूनच पळ काढल्याचेही बोलले जात आहे. 


नगरसेविकेच्या पतीची होणार चौकशी 
पोलिसांनी नुकतीच टिप्परच्या गुंडांवर कारवाई केली. यावेळी या गुंडाना भेटण्यासाठी सिडकोतील विद्यमान नगरसेविका किरण गामणे-दराडे यांचे पती बाळा (योगेश) दराडे यांची चौकशी केली जाणार असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


तर कडक कारवाई केली जाईल 
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न काेणी निर्माण करीत असेल तरत्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. शांतता राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांनी एक दक्ष नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करावे. योग्य ती माहिती द्यावी. - सोमनाथ तांबे, वरिष्ठ निरीक्षक, अंबड 

 

बातम्या आणखी आहेत...