Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Planting 5 acres of lemon garden produces 185 tons of wheat annually

रोस्टर पद्धतीमुळे शिक्षकाची नोकरी गेली, जिद्दीने ५ एकरवर लिंबाची बाग फुलवत वर्षाकाठी १८५ टन उत्पादन घेतले

अनंत वैद्य | Update - Apr 22, 2019, 09:57 AM IST

नोज घुमरेंची दुष्काळावर मात, पारगावचे लिंबू दिल्ली सुरतच्या बाजारात, २० जणांना मिळाला रोजगार

 • Planting 5 acres of lemon garden produces 185 tons of wheat annually

  बीड - पाच वर्षे सहशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर रोस्टर पद्धतीमुळे नोकरी सोडावी लागली. या संकटाने खचून न जाता गावी असलेल्या शेतीत झोकून देत त्यांनी लिंबाचे उत्पादन घेतले. जल नियोजन व नवतंत्रज्ञानाच्या साथीने वर्षाकाठी १८५ टनांपर्यंत उत्पादन घेत आर्थिक उन्नती साधली. विशेष म्हणजे आज दुष्काळातही घुमरे यांची लिंबू बाग बहरलेली आहे.


  अवर्षणग्रस्त भाग असलेल्या पारगाव घुमरा (ता.पाटोदा) येथील युवा शेतकरी मनोज शिवराम घुमरे यांची ही कथा. मनोज यांचे वडील शिवराम घुमरे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक. ज्ञानदानाचा हा वारसा चालवण्यासाठी मनोज यांनी यवतमाळ येथून बी.एड्. केले. सन २००७ मध्ये पिंपरखेड (ता.जामखेड) येथील संस्थेत सहशिक्षकपदी नोकरी सुरू केली. झोकून देत ज्ञानदान सुरू केल्याने विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ख्याती झाली. गावातील लोकांशी संपर्क आला. पिंपरखेड परिसर हा लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध. या गावात लिंबू शेतीने समृद्धी आलेली. मनोज यांनाही शेतीची आवड असल्याने ते लिंबू शेतीतील बारकावे जाणून घेत होते. अध्यापन कार्य तर सुरूच होते. परंतु दुर्दैवाने सन २०१२ मध्ये रोस्टर पद्धतीमुळे नोकरी गमवावी लागली. मोडून जाण्यासारखी परिस्थिती. भोवतालचे लोक करिअरबाबत प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडत. मात्र मनोज यांनी खचून न जाता लिंबू शेतीचा आधार घेण्याचे ठरवले. अनेक अडचणीनंतर निर्णय पक्का केला अन् ५ एकर क्षेत्रात सरबती लिंबाचे ५४० रोपटी लावली. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ठिबक केले. एकत्र कुटुंब असल्याने सर्वांचे सहकार्य मिळाले अन् १८ महिन्यातच लिंबाला फळ लागले. गेल्या पाच वर्षांच्या काळात मनोज यांनी प्रतिवर्षी सरासरी १७० टन उत्पादन घेतले. दिल्ली, सुरतचे व्यापारी माल घेऊन जात असल्याने विक्रीचा प्रश्न सुटला. ६५ रुपये किलोपर्यंत भाव मिळाल्याने कष्टाचे चीज झाले. ही शेती मनोज यांना समृद्धी व समाधान, २० ते २५ मजुरांना रोजगार देणारी ठरलीच आहे शिवाय परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारीही.

  साडेतीन कोटी लिटरचे शेततळे
  आधुनिक शेतीचे विचार असणाऱ्या मनोज यांना पाण्याचेही महत्व उमजले आहे. अवर्षणग्रस्त भाग असल्याने पावसाच्या थेंब न थेंबाची साठवणूक झाली पाहिजे, यासाठी मनोज यांनी २० लाख रुपये खर्चून ६२ बाय ६२ मीटर आणि ३९ मीटर खोली असलेले शेततळे नुकतेच उभारले. यात साडेतीन कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो व हे पाणी मनोज यांना ३० एकर क्षेत्रासाठी ठिबकने २ वर्षे पुरू शकते.

  असे केले व्यवस्थापन
  घुमरे यांनी १८ बाय १८ अंतरावर लिंबाची झाडे पाच एकरमध्ये लावली. दर महिन्याआड ते छाटणी करतात. आठवड्याला दोन तास, तेही ठिबकने पाणी देण्यात येते. शिवाय झाडांच्या वाढीसाठी सेंद्रिय खताचा वापर केला.

  ऊसतोडी थांबली
  रोजगारासाठी दरवर्षी उसतोडणीचे काम करणाऱ्या वस्ती व गावा शेजारील २० जणांना शेतकरी मनोज घुमरे यांच्यामुळे आज गावातच रोजगार मिळत आहे. लिंबू वेचणी, प्रतवारी करणे, छाटणी करणे अशी कामे हे मजूर करतात.

  शेतीतून परिवर्तन शक्य
  शेतीत नवतंत्राचा वापर, नियोजनबद्ध कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यातून आज यश दिसत आहे. आज आपण अनुदानापुढे काळ्या आईची किंमत शून्य करत आहोत. तसे न करता उपलब्ध तंत्राचा वापर करत शेतीत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे.
  - मनोज घुमरे, शेतकरी, पारगाव घुमरा.

Trending