आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचा वापर; कृषी, आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुखांना सभेमध्येच दहा हजारांचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -'प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही घडी पुस्तिकेला प्लास्टिकचे वेष्टन लावणाऱ्या कृषी आणि आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुखांना सभेमध्येच दंड ठोठावण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील बैठकीत ही घटना घडली. प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून सरकारी कार्यालयात झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही यंत्रणांच्या प्रभारी प्रमुखांना भान राखण्याचा सल्ला या वेळी दिला. 

 

राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा कचेरीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कृषी खात्याशी निगडित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) या कार्यक्रमाची आखणी केली होती. या कार्यक्रमापूर्वी तिथेच आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यामुळे या कार्यक्रमाला दोन्ही यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी आणि 'आत्मा'द्वारे निमंत्रित केलेले नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही विभागाच्या घडीपुस्तिकांचे (फोल्डर) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे करीत असताना ही घडी पुस्तिका ही बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दोन्ही प्रभारी विभागप्रमुखांना नियमांचे भान राखण्याचा सल्ला देत दंड ठोठावला. 


दंडित झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम आणि जिल्हा स्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांचा समावेश आहे. निकम यांच्याकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालकाचा तर डॉ. कुलवाल यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पदाचा पदभार आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना प्रभारी असतानाच हा दंड भरावा लागला. या कारवाईनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देत भविष्यात अशी नामुष्की ओढवणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. 


या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ हेही उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच त्यांच्याकडे इशारा करीत मनपाच्या संबंधित यंत्रणा प्रमुखांमार्फत कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर आणि स्वच्छता निरीक्षक (एसआय) किरण खंडारे यांनी तेथे पोहोचून दोन्ही यंत्रणा प्रमुखांकडून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लास्टिकचा वापर केला म्हणून एखाद्या सरकारी सभा-बैठकीत दंड ठोठावला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

केलेला प्लास्टिकचा वापर भोवला, अशी प्रतिक्रिया त्यांच्यात उमटली होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सीईओ कैलास पगारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, बाळापूरचे एसडीओ तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांसमक्ष ही कारवाई झाल्यामुळे दंडित झालेल्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी खजील झाले होते. 


सरकारी कार्यालयातील सभेदरम्यान झालेली जिल्ह्यातील पहिलीच कारवाई 
जिल्हा कचेरीतील बैठकीत कृषी, आरोग्य विभागाच्या घडी पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवर. या होत्या त्या दोन विभागांच्या जनजागृतीसाठीच्या घडी पुस्तिका 
आरोग्य विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेली घडी पुस्तिका ही प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान नियंत्रण कायद्याच्या 'हेल्पलाइन'ची होती. तर 'आत्मा'च्या वतीने 'पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्त्व' या विषयावर एक घडी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


आता पुढे काय होणार ? 
जिल्हाधिकाऱ्यांनी भर सभेत आरोग्य व कृषी विभागाला दंड ठोठावला ही माहिती लगेच जिल्हा कचेरीच्या सर्व विभागांत पोहोचली. त्यामुळे यापुढे कुणीही अशी चूक करणार नाही. विशेष असे की प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिक आवरणातील बुके केव्हाच जिल्हा कचेरीतून हद्दपार झालेले आहेत. आता इतर विभागही याची आठवण ठेवतील. 
'ज्याच्या आधारे आपली नोकरी... ' 


ज्याच्या आधारे आपली नोकरी आहे. त्या विभागासाठी खिशातून दहा रुपये जास्त खर्च झाले तर काय वावगे आहे? प्लास्टिक ऐवजी दुसरा कागद वापरून वेष्टन करायला पाहिजे होते, अशा भावनिक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी झालेली चूक संबंधितांच्या लक्षात आणून देत त्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान करुन दिले. 


जिल्हा कचेरीत जाऊन दंड केला वसूल 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका कार्यक्रमामध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात आल्याची माहिती त्या कार्यालयातर्फे कळवण्यात आली होती. त्यानुसार मी स्वत: तेथे पोहोचून मनपाच्या आरोग्य विभागातर्फे संबधित अधिकाऱ्यांकडून दंड वसूल केला. दंडाची रक्कम रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे. प्रशांत राजुरकर, आरोग्य विभागप्रमुख, मनपा. अकोला

बातम्या आणखी आहेत...