Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | 'Plus' Grade to Solapur ART Center

उत्तम उपचारांमुळे सोलापूर एआरटी सेंटरला 'प्लस'चा दर्जा, उस्मानाबादच्याही HIV रुग्णांंना सेकंड लाइनची सोय

यशवंत पोपळे | Update - Aug 20, 2018, 11:02 AM IST

शहरासह जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स संसर्गित रुग्णांना शासन स्तरावरील औषधोपचार सेवासुविधा चांगल्या पध्दतीने पुरवून रुग्णां

 • 'Plus' Grade to Solapur ART Center

  सोलापूर- शहरासह जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स संसर्गित रुग्णांना शासन स्तरावरील औषधोपचार सेवासुविधा चांगल्या पध्दतीने पुरवून रुग्णांमध्ये जगण्याची उमेद वाढवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) एआरटी सेंटरला शासनाकडून प्लस दर्जा मिळाला आहे, अशी माहिती एआरटी सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस यांनी 'दैनिक दिव्य मराठी'शी बोलताना दिली. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सेकंड लाइन एआरटी औषधोपचारांची सुविधा सोलापूरच्या एआरटी सेंटरमध्ये उपलब्ध झाली आहे.


  डॉ. वरेरकर म्हणाल्या, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्र सरकारची राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या अधिपत्याखाली सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये दहा वर्षांपूर्वी एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरेपी) सेंटर्स सुरू करण्यात आले. एचआयव्ही एड्स संसर्गितासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचाराची सुविधा सन २००७ पासून सुरू करण्यात आली.


  उपचाराच्या पहिल्या टप्प्यात सीडी-४ टेस्टमध्ये ज्या रुग्णांच्या शरीरात पांढऱ्या पेशींचे प्रमाण ५०० पेक्षा खाली आहे, अशा रुग्णांना एआरटी दिली जात होती. नंतर औषध प्रणालीत बदल करून जून २०१७ पासून ज्यांचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्या सर्व रुग्णांना एआरटी औषधोपचार सुरू करण्यात आले. विशिष्ट कालावधीनंतर पहिल्या टप्प्यातील एआरटी औषधांना काही रुग्णांच्या शरीरातील एचआयव्हीचे विषाणू जुमानत नाहीत. परिणामी पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झाल्याने अशा रुग्णांची प्रकृती खालावते. त्या रुग्णांची व्हायरल लोड रक्त तपासणी करून शारिरीक क्षमता तपासली जाते. मग आवश्यकतेनुसार दुसऱ्या टप्प्यातील सेकंड लाइन औषधोपचारांसाठी रेफर केले जाते. पूर्वी सेकंड लाइन उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये किंवा मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णांना जावे लागत होते. अनेक वेळा औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक पातळीवर हेळसांड होत होती. आता मात्र रुग्णांना सेकंड लाइन सुरू करण्यापूर्वी केवळ एक वेळच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये जावे लागते. नंतर दरमहा सिव्हिल हॉस्पिटलच्या 'एआरटी प्लस' सेंटरमध्ये मौफत औषधोपचार केले जात आहेत, असे डॉ. वरेरकर म्हणाल्या.


  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष कार्यक्रमाधिकारी भगवान भुसारी म्हणाले, २०१७ मध्ये जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार ३८१ नागरिकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यापैकी ००.५५ टक्के नागरिकांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. २०१८ मध्ये १ लाख ६ हजार ३७७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ००.४८ लोकांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.


  केंद्र आणि राज्य शासनाचे एचआयव्ही संसर्गितांसाठी असे आहे धोरण

  २०३० पर्यंत एचआयव्ही प्रसार शून्यावर आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ९०.९०.९० धोरण आखले. जिल्हा लोकसंख्येच्या ९० टक्के लोकांची पहिल्या टप्प्यात एचआयव्ही चाचणी, दुसऱ्या टप्प्यात निष्पन्न ९० टक्के रुग्णांना एआरटी औषधोपचार आणि तिसऱ्या टप्प्यात ९० टक्क रुग्णांची व्हायरल लोड चाचणी करणे असा कार्यक्रम आहे.
  - भगवान भुसारी, कार्यक्रमाधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, उस्मानाबाद

  रोगप्रतिकारक शक्तीनुसार गरजू एचआयव्ही रुग्णांची व्हायरल लोड चाचणी केली जाते. नंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना सेकंड लाइन एआरटी उपचारासाठी रेफर केले जाते. पहिल्या टप्प्यात नियमित एआरटी उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती सामान्य असेल, अशा रुग्णांना एकाच वेळी तीन महिन्यांचे एआरटी औषधे दिली जात आहेत.
  - डॉ. अग्रजा चिटणीस-वरेरकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर,

Trending