आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरुवनंतपुरम - या शतकातील सर्वात मोठा जलप्रलय अनुभवणाऱ्या केरळमध्ये शनिवारीही गंभीर पूरस्थिती होती. राज्यात अनेक भागांत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी मुसळधार पावसामुळे यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, शनिवारी आणखी १६ जणांना मृत्यू झाल्याने राज्यातील पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १९४ झाली आहे. या पुरात ३६ हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अजूनही राज्यात पावसाचा जोर ओसरलेला नाही. राज्यातील १४ पैकी ११ जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता पाहता रेड अलर्ट जारी केला होता.
पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून मदत छावण्यांमध्ये सुमारे सव्वातीन लाख लोकांना आश्रय देण्यात आला आहे. मदत व बचाव पथकांनी गेल्या चोवीस तासांत ८२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यात २२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
१९ हजार कोटींचे नुकसान; २ हजार कोटींची मागणी
- प्राथमिक अंदाजानुसार, पुरामुळे १९ हजार कोटींचे नुकसान झाले. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केंद्राकडे २ हजार कोटींची मागणी केली. पंतप्रधान मोदी यांनी राज्याच्या मागणीनुसार धान्य, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करणार, अशी हमी दिली.
- पुरात ग्रामीण भागात अनेकांचे संसार उघड्यावर आले. जे लोक या आपत्तीत बेघर झाले अशांना पंतप्रधान गृह योजनेअंतर्गत (ग्रामीण) घरे दिली जातील. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी उपचारांसाठी नियोजित अमेरिका दौराही रद्द केला आहे.
महामार्गाची तातडीने दुरुस्ती : केरळमध्ये जलप्रलयामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदत पोहोचवण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातून जाणाऱ्या महामार्गांची दुरुस्ती करण्याचे आदेश एनएचएआयला देण्यात आले आहेत.
सर्वात मोठी आणि वेगवान बचाव मोहीम
केरळमध्ये मदतकार्यात एनडीआरएफने देशातील सर्वात मोठी व वेगवान मोहीम राबवली. यासाठी ५८ पथके तैनात असून २००६ मध्ये या विभागाची स्थापना झाल्यानंतरची ही पहिली मोठी मोहीम आहे. प्रत्येक पथकात सुमारे ४० सदस्य आहेत.
५०० कोटी रुपयांची तातडीची मदत
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ५०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.
पुरामुळे पश्चिम घाटातील पर्यावरणाची झाली हानी
केरळमध्ये पुरामुळे पर्यटनावर वाईट परिणाम झाला असून मुन्नारमध्ये तो प्रभाव दिसून आला. येथे निलकुरंजीची फुले फुलली आहेत. त्याचे ताटवे पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ लागली होती. त्याशिवाय पश्चिम घाटातील पर्यावरणाचीही हानी झाली.
छतावर हेलिकॉप्टर नेत २६ जणांचे प्राण वाचले
शौर्यचक्र विजेते कॅप्टन पी. राजकुमार यांनी एका घराच्या छतावर सी. किंग ४२ बी हेलिकॉप्टर उतरवले होते. त्यामुळे २६ जणांचे प्राण वाचवता येऊ शकले. २०१७ मध्ये राजकुमार यांनी वादळातील २१८ जणांना सुखरूप बाहेर काढले होते.
वृक्षतोड हेच पुरामागचे कारण, तज्ज्ञांचे मत
केरळमध्ये मान्सूनदरम्यान इतर राज्यांच्या तुलनेत जास्त पाऊस होणे समजण्यासारखे आहे. हवामान विभागाच्या मते, केरळमध्ये सरासरीपेक्षा ३७ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला. दुसरीकडे, राज्यात वेगाने झालेली वृक्षतोड हेच या नैसर्गिक संकटामागील कारण असल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यात भौगोलिकदृष्ट्या नाजूक पर्वतरांगाचे संरक्षण करण्यात राज्य सरकारला आलेले अपयश हे देखील मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
शेजारील राज्ये जबाबदार, मुख्यमंत्र्यांचा आरोप
केरळची परिस्थिती इतकी वाईट होण्यासाठी शेजारील राज्ये जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. अलीकडेच विजयन व तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यात जलप्रकल्पातून जलविसर्ग करण्यावरून जाहीर पातळीवर वादंगही झाले होते. केरळमध्ये छोट्या-मोठ्या ४१ नद्या आहेत. त्या सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात. या नद्यांवर ८० प्रकल्प आहेत. या धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. पुराने विध्वंसक रुप धारण करण्यामागे हे देखील एक कारण आहे. केरळमधील यंदाच्या पुराने राज्यातील जनतेला १९६१ च्या पूराची आठवण करून दिली आहे. त्या पुराची ही पुनरावृत्ती आहे, असे राज्याचे जल विभागाचे विशेष अधिकारी जेम्स विल्सन यांनी सांगितले. राज्यातील मुसळधार पावसामुळे आम्हाला नाईलाजाने ३६ धरणांची दारे उघडावी लागली.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.