आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विरोधीपक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहायचेच नाही का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांचा राज्यात कार्यक्रम असेल, तर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सहभागी होणे हा राजशिष्टाचार मानला जातो. केंद्रात एनडीएचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विविध राज्यांमध्ये उद्घाटन आणि भूमीपूजन समारंभ करीत आहेत. यावेळी संबंधीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर अवमान होण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितच राहायचे नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याला काश्मिरपासून सुरवात झाली. हरियाणामध्ये मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री हुड्डा यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी यापुढे मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर करुन टाकले. आज (गुरुवार) झारखंडमध्येही हरियाणाच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन भाषणासाठी उभे राहिले असताना उपस्थित जनसमुदायांतून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि मोदी-मोदीचे नारे देण्यात आले. झारखंडनंतर मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. विदर्भात त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्याचे कारण वेगळे आहे. मात्र, येथे प्रश्न उपस्थित होतो, की पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक कार्यक्रमात विरोधीपक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहायचेच नाही का?
कारण, मोदी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्र्याच्या जाहीर अवमानाबद्दल चकार शब्दानेही बोलत नाहीत. त्यांचे मौन हे समर्थकांना प्रोत्साहन देण्यासाठीच असते का? असा प्रश्नही त्यातून उपस्थित होत आहे.
केंद्रात भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी आता आगामी विधानसभांवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे मोदींच्या दौर्‍यावरुन स्पष्ट होत आहे. आगामी काळात जम्मू व काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी यूपीएच्या काळात घोषणा झालेल्या किंवा काम पूर्ण झालेल्या योजनांचे एक तर भूमीपूजन करत आहेत किंवा उदघाटन करत आहेत. यावर काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे, की बारशाचा कार्यक्रम कोणाच्याही हस्ते झाला तरी, बाळ कोणाचे आहे आणि त्याला नाव कोणाचे लावले जाणार हे जनतेला माहित असते.
मोदींच्या कार्यक्रमावर विरोधीपक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिष्कारावर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोदींच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात असतात, ते मोदींचा जयघोष करतात यात काहीही वावगे नाही. मुख्यमंत्र्यांनीही गर्दी जमवावी आणि आपल्या भाषणात टाळ्या घ्यावे. तावडेंचे हे विधान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भर सभेत एकमेकांची कॉलर पकडण्याची चिथावणी देणारे नाही का? भाजपची सत्ता केंद्रात आली म्हणून त्यांनी राज्यात मुख्यमंत्र्यांचा अवमान करणे योग्य आहे का? पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री ही घटनात्मक पदे आहेत, त्याचा राजकारणासाठी उपयोग करुन भाजप ज्या पद्धतीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे या पदांचा मान यापुढे खरोखर राखला जाईल की नाही? आणि असेच होणार असेल, तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहयचेच नाही का?

(छायाचित्र - झारखंडची राजधानी रांची येथे सहा योजनांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरुवारी भूमीपूजन झाले.)