आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफालवरून जेवढी चिखलफेक कराल, तितके कमळ फुलेल; पंतप्रधान मोदींचा राहुल यांना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- विकासासारखे मुद्दे मांडण्यापेक्षा वाद घडवून चिखलफेक करणे सोपे काम आहे. सरकारवर जेवढी चिखलफेक कराल, तितके कमळ उगवेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रफालप्रकरणी नामोल्लेख न करता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. 


मध्य प्रदेशात मंगळवारी आयोजित कार्यकर्ता महाकुंभ कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस निवडणूक असलेल्या देशातील एकाही राज्यात साधी आघाडीदेखील स्थापन करण्यात यश मिळवता आलेले नाही. त्यांना छोट्या-छोट्या पक्षांकडे आघाडीसाठी आर्जव करावे लागत आहे. त्यांची आघाडी जुळून आली तरी त्यांना यश मिळणार नाही. त्यावरून काँग्रेसने आपला घटलेला पाठिंबा लक्षात घेतला पाहिजे. मग देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान होण्यासाठी इतर देशांच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा आधार घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले. 'जेट गेट' (रफाल करार) योग्य पद्धतीने हाताळल्यास राहुल गांधी भारताचे पुढील पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी करणारे पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहेमान मलिक यांच्या वक्तव्याचा त्यांनी असा समाचार घेतला. काँग्रेसमध्ये प्रचंड मुजोरी होती. त्यामुळे पक्षाची लोकसभेत ४४० हून ४४ अशी वाताहत झाली आहे. १२५ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसमध्ये आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. सध्या तुम्हाला काँग्रेस पाहायची असल्यास सूक्ष्मदर्शिकेची मदत घ्यावी लागेल. ते (काँग्रेस) सातत्याने चिखलफेक करू लागले आहेत. पण मला त्यांना एकच सांगायचे आहे. तुम्ही जेवढी अधिक चिखलफेक कराल तेवढे अधिक कमळ फुलेल, असे मोदींनी सांगितले.


विकासावर चर्चा करण्याचे विरोधी पक्षांना केले आवाहन 
मी तुम्हाला (काँग्रेस) विकासाच्या मुद्द्यावर जाहीर चर्चा, वाद करण्याचे आवाहन करतो. पण ते या गोष्टी करणार नाहीत. कारण त्यांना आरोप करण्याचा सोपा मार्ग सापडला आहे. काँग्रेस सध्या देशावरील बोजा बनले आहे. म्हणूनच आता देशातील लोकशाहीला वाचवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे. व्होट बँकेच्या राजकारणातून देशाला मुक्त करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे मोदी यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना सांगितले. 


ही तर फक्त सुरुवात आहे..आणखी वास्तव समोर येईल ; राहुल गांधी यांनी केला दावा 
अमेठी : रफाल करारासंबंधीचे आणखी वास्तव समोर येईल. ही तर फक्त सुरुवात आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ३६ लढाऊ विमाने खरेदीचा करार करून देशातील तरुणांचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. विजय मल्ल्यास भारताबाहेर जाण्यासाठी मदत करणारे लोकही उजेडात येतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दुसरीकडे रिलायन्सने फ्रान्ससोबतच्या करारातील सहभागाचा दावा फेटाळला आहे. 

बातम्या आणखी आहेत...