आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसं काय! घर कसे आहे..घरात मिठाई केली का.. ई गृहप्रवेशादरम्यान नरेंद्र मोदींचा लाभार्थ्यांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदत करेल, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिर्डीत दिली. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची सांगता पंतप्रधानांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाली. यानंतर आयोजित जाहीर सभेत मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तत्पूर्वी पंतप्रधान अावास याेजनेअंतर्गत राज्यातील अडीच लाख लाेकांच्या ई-गृहप्रवेश सोहळा झाला. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या निवडक लाभार्थींशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला, तर काही लाभार्थींना समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सोपवल्या. 

 

प्रलंबित सिंचन योजना लवकर पूर्ण करणार : प्रधानमंत्री किसान सिंचन याेजनेच्या माध्यमातून प्रलंबित याेजना पूर्ण करण्यावर भर असून महाराष्ट्र सरकारनेही जलयुक्त शिवार अभियानात जनसहभागातून तब्बल १६ हजार गावे दुष्काळमुक्त केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. 

 

काय, बरं अाहे ना? घर मिळालं का तुम्हाला... यंदाचा दसरा जाेरात झाला असेल 

 

घरकुल प्रवेशाच्या चाव्या, कलश प्रदान 
पंतप्रधानांच्या हस्ते घरकुल प्रवेशाचा कलश व चाव्या इंदुबाई खवळे, सूर्यभान बरडे (जि.अहमदनगर), अनिता विटकर (जि. औरंगाबाद), नंदा बोंबले, शिवराम वाघमारे, रत्ना दुमसे, सखुबाई मेंगाळ (जि. नाशिक), सोनाली कांबळे, लंकाबाई जगताप (जि. बीड), मंदा मोरे (जि. पुणे) या लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला. 

 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने लाभार्थींसोबत संवाद 
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेतील विविध ठिकाणच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत ई-गृहप्रवेशाचा शुभारंभ केला. मोदींनी मराठीतून संभाषणाची सुरुवात केली. त्यांनी नंदुरबार, अमरावती, सोलापूर, सातारा, ठाणे येथील

लाभार्थींंच्या समूहांशी गप्पा मारल्या. 

 

ठाणे : लाभार्थी : साहेब. पहिले आमची घरं मातीची होती. कौलं नव्हती. जंगलातून वस्तू आणाव्या लागत. आता स्वप्न पूर्ण झालं. घरात पाहुणे येतात. 

 

नंदुरबार : मग मला कधी मिठाई देणार... 
मोदी : कसं काय? बरं आहे ना? घर मिळालं, आता तुम्ही प्रसन्न आहात ना? (टाळ्या) नवीन घर मिळालं त्याची मिठाई वाटली का? 
लाभार्थी : साहेब, आम्ही खुश आहोत. आम्हाला नवे घर मिळाले. या घरात आम्ही भजन केले. गावात पेढे वाटले. 
मोदी : मग मला कधी मिठाई देणार... (हशा) 

नंदुरबार : लाभार्थी : साहेब आम्ही तुमच्यापर्यंत पोहाेचू शकत नाही. तुम्हाला आजवर टीव्हीवरच बघत होतो. आज आम्हाला प्रत्यक्षात तुमच्याशी बोलायला मिळत आहे, याचा खूप आनंद होतोय. घरपण खूप छान आहे साहेब. 
मोदी : तुमच्या घराच्या वास्तूत आता पंतप्रधान आलेच आहेत. (हशा) पण मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून तुमच्या घरापयत पोहाेचलो आहे. (टाळ्या) पण मला सांगा तुमच्या पक्क्या घरामुळे आता पाहुणे वाढतील. मग त्यांचा पाहुणचार करावा लागणार, मिठाई द्यावी लागणार. मग तुम्ही मलाच शिव्या द्याल की, मोदीने काय काम वाढवून ठेवले (हशा). तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. याच घरात पुढची पिढी शिकून तुमची उर्वरित स्वप्ने पूर्ण करतील. 

 

मोदींनी दिला ठिकठिकाणच्या आठवणींना उजाळा 
- नंदुरबारच्या चौधरीच्या चहाची मला खूप आठवण येते. रेल्वेतून जाताना नंदुरबार आले की चौधरीचा चहा हमखास मिळायचा. 
मुख्यमंत्री असताना सोलापूरहून जॅकेट यायचं.. त्याची आठवण आहे. 
- साताऱ्याशी विशेष नाते आहे. सुरुवातीच्या आयुष्यात लक्ष्मणराव इनामदारांनी मला शिकवले. त्यांना आम्ही वकीलसाहेब म्हणायचो. ते साताऱ्याचेच होते. तिथलं कोणीही भेटलं तरी त्यांची आठवण येते. 
मोदी : तुमच्यापैकी किती महिला शिकलेल्या आहेत...(दोघीच हात वर करतात). तुमची मुले निरक्षर राहिली तर तीही अशीच लाजतील ना! मुलं शिकली म्हणजे गरिबीविरोधातील लढाईला बळकटी मिळेल. हां... आता मराठीत गाणे म्हणा बघू, पण लावणी सोडून. 


अमरावती : मोदी : तुम्ही खरं बोलाल का माझ्याशी. मी तुमचा भाऊ आहे, माझ्यावर भरवसा कराल का? खरं सांगा घरासाठी सुरुवातीला अर्ज केला असेल, मग पैसे भरले असतील, कोणालाही एक रुपयाची तरी लाच द्यावी लागली का तुम्हाला? 
लाभार्थी : नाही सर. 
मोदी : मला खूप आनंद झाला. एरवी काय होतं की कोणीही फालतू माणूस पोहाेचतो आणि घर देण्यासाठी दोन-पाचशे रुपयांची मागणी करतो. पण, मला आनंद होतोय की देशात असे वातावरण आहे की फसवे लोक संपून गेले. मला सांगा नवे घर झाले, आता मुलांच्या शिक्षणाचे काय? 
लाभार्थी : घर झाले. आता मुले विनाअडथळा शिकू शकतील. विजेची जोडणी, गॅस मिळाला. त्यामुळे अडचणी येणार नाहीत. तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात. पूर्वी घर नव्हते. गरिबीमुळे लोक आमच्यावर हसत होते. आता मात्र घर मिळाल्याने परिस्थिती बदलली आहे. (लाभार्थी महिला अश्रू पुसते अन‌् सभास्थळी काही क्षण शांतता पसरते)

 
सोलापूर : मोदी : घर महिलेच्या नावाने केले गेले. मग तुमच्या घरातील पुरुष नाराज झाले असतील. आजवर काही नवीन वस्तू घ्यायची असो, जमीन घ्यायची असो वा घर घ्यायचे असो, सारे पुरुषाच्याच नावाने व्हायचे. महिलांना कोठे स्थानच नव्हते. आता मात्र आम्ही ही पद्धत बदलली आहे. महिलांची ताकद वाढली. (टाळ्या) 
लाभार्थी : सगळ्याच महिला आनंदी आहेत. आमच्या नावाने घर झाले. त्यामुळे आम्हाला आता घराबाहेर जाण्याविषयी कोणी बोलणार नाही. 


नागपूर : मोदी : यंदाची विजयादशमी तुम्ही तर खूप उल्हासात साजरी केली असेल. यंदाचा दसरा विशेष आहे तुमचा. गृहप्रवेश आणि पूजा केली का? 
लाभार्थी : हो, पूजा केली. यावर्षी आमची दिवाळी नव्या घरामुळे जोरात असेल. पहिल्यांदाच पक्क्या घरात दिवाळी होणार असल्याने खूप समाधान वाटते. 
मोदी : आयुष्यमान आरोग्य योजनेची तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही गरीब कुुंबातील व्यक्तीला गंभीर आजार झाला असेल आणि ऑपरेशनसाठी पैसा नसेल, अशावेळी सरकार संबंधितांना ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये देणार आहे. 


...तर घर मिळायला २० वर्षं लागली असती 
पूर्वीच्या सरकारने ४ वर्षांत फक्त २५ लाख घरे बांधली. गेल्या चार वर्षांत अामच्या सरकारने गरिबांसाठी १ काेटी २५ लाख घरे उभी केली. म्हणजे पूर्वीचेच सरकार असते तर इतकी घरे बांधण्यासाठी अाणि तुम्हाला ती मिळण्यासाठी वीस वर्षे वाट पाहावी लागली असती, अशी टीका पंतप्रधान मोदींनी थेट काँग्रेसचे नाव न घेता केली. 

 

नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोलले : अशाेक चव्हाण 
मुंबई | खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही. साईबाबांच्या शिर्डीत ते खोटे बोलले याचे दुःख झाले. यूपीए सरकारने ४ वर्षांच्या काळात २५ लाख नव्हे, २००४ ते २०१३ दरम्यान दरवर्षी २५ लाख घरे बांधून पूर्ण केली, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदींनी केलेल्या दाव्यावर टीका केली. 

बातम्या आणखी आहेत...