आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीजी आपणच पाहा, आपल्या स्वप्नांचं काय झालं! स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ.. सोलापुरात होतेय अशी विचारणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्रात सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले अन् विकासाची गोड स्वप्ने रंगवू लागले. त्यांच्या 'अच्छे दिन'मधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी. देशातील निवडक 100 शहरे त्यासाठी निवडली. या निवडीसाठी संबंधित शहरांतील नागरिकांची एक परीक्षाच घेण्यात आली. नागरी सहभागातून हा प्रकल्प यशस्वी होईल म्हणून नागरिकांकडून कामाच्या अपेक्षा मागवण्यात आल्या.

 

सोलापूर महापालिकेने त्यासाठी विशेष प्रयत्न केले. नागरी संवाद साधला. शहरभर बैठका घेतल्या. अखेर स्मार्ट सिटीची यादी जाहीर झाली अन् पहिल्याच यादीत सोलापूरचे नाव झळकले. परंतु प्रत्यक्ष कामांसाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली.

 

स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ..?
स्मार्ट सिटीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात कामेच नसल्याने नागरिकांमध्ये 'स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ...' अशी विचारणा होऊ लागली. कुणालाच कल्पना नाही. कागदावरील संकल्पित चित्रे घेऊन विशिष्ट समूह चर्चा करू लागला. त्याच्या बातम्या आल्या. परंतु कामे नाहीत. अखेर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्याच्या अध्यक्षपदी नगरविकास सचिव मिलिंद म्हैसकर आले. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तत्कालीन उपायुक्त अमिता दगडे-पाटील आल्या. त्यांची बदली झाली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी संजय तेली आले. तेही गेले. उपायुक्त श्रीकांत म्याकलवारांकडे जबाबदारी दिली. ती काढून घेतली. शेवटी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे या पदावर आले अन् केंद्राकडून 312 कोटी रुपये येऊन पडले. कामांना सुरुवात झाली. त्याच्या कासवगतीत आतापर्यंत फक्त 35 कोटी रुपये खर्ची पडले.

 

होम मैदान अन् गड्डा यात्रा
होम मैदानाच्या बाजूने आपत्कालीन मार्ग केल्यानंतर सिद्धेश्वर मंदिर समितीने त्याला प्रचंड विरोध करून लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले होते. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हटवादी भूमिकेपुढे कुणाचेच चालले नाही. त्यानंतर तीन वर्षांनी या रस्त्याकडे आणि होम मैदानाकडे पाहिल्यास तो रस्ता आवश्यक का होता, हे लक्षात येते. आज स्मार्ट सिटीच्या पैशांतून होम मैदानाचे रूपच पालटून गेले. संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत बांधण्यात आली. एलईडी दिवे झळकले अन् यंदाची गड्डा यात्रा आली. यंदाच्या यात्रेत सोलापूरकरांना आगळा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

 

स्वप्नांना पाय फुटावे, भरभर उरकून घ्यावे
स्वप्नवत वाटणारी स्मार्ट सिटी दृष्टिपथात आली. परंतु त्याच्या कामात आणखी किती वेळ जाणार, याचे उत्तर नाही. 396 कोटींमधून केवळ 35 कोटी रुपये खर्ची पडावेत. त्यालाही दोन वर्षे लागावीत, ही कासवगती परवडणारी नाही. त्याने प्रकल्प खर्च वाढत जाईल. आणखी साडेतीनशे कोटींमधून भुईकोट किल्ला, समांतर जलवाहिनी अशी महत्त्वाची कामे आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकांचे आहे. कुणाचे सरकार येणार माहीत नाही. त्याने स्मार्ट सिटीच्या स्वप्नांचे काय होईल? मोदीजी, तुमच्या समोर हा लेखाजोखा मांडलाय. अपेक्षा एवढीच की, या स्मार्ट स्वप्नांना पाय फुटावेत अन् कामे भरभर उरकून घ्यावीत.

 

मित्रों.... ये सही है क्या?
1- मोदी सरकारने स्मार्ट सिटीची योजना जाहीर करताना, देशस्तरावर निवडलेल्या पहिल्याच यादीत सोलापूर नवव्या स्थानावर हाेते. कामासाठी सुरुवातीला पैसे नव्हते. खुल्या बाजारातून पैसे उभारण्यासाठी सोलापूर महापालिकेची पत नव्हती. पहिल्या यादीत नाव असलेल्या सोलापूर शहरास केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर आजही कामे संथगतीने होत आहेत. निवड यादीत नवव्या स्थानावर असलेले सोलापूर अंमलबजावणीच्या बाबतीत देशात ३२ व्या क्रमांकावर आहे. नंतर जाहीर झालेली शहरे मागून पुढे गेली. पण सोलापूर अजूनही रांगते आहे.
2- स्मार्ट सिटी योजना ही खरं तर भाजपची. पण स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक असलेली भाजपची नेतेमंडळीच अंमलबजावणीच्या कामात अडथळे निर्माण करत आहेत. या संचालकांच्या स्वार्थी दृष्टिकाेनामुळे अगोदरच संथगतीने चालू असलेली कामे आणखी मंदावत आहेत.
3- लोकअपेक्षा विचारात घेऊन स्मार्ट सिटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करताना सोलापूरकरांनी पाण्यापेक्षा कचऱ्यांचे संकलन व प्रक्रियेच्या कामाला अधिक प्राधान्य दिले होते. पण, पावणे दोन वर्षानंतरही घंटागाड्याद्वारे कचरा संकलन प्रारंभानंतरही सोलापूर शहर स्वच्छ दिसण्यापासून अजून लांबच आहे.
4- शहराची चकाकी म्हणजे स्मार्ट सिटी म्हणायचे की, माणसाचे जगणे सुकर, आनंदी आणि राेजगार मिळालेल्या तरुणांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून

सोलापूरला स्मार्ट म्हणायचे?
5- स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पहिले भाषण केल्यानंतर लगेचच पंतप्रधान सोलापुरात आले होते. ते म्हणाले, "वस्त्रोद्योग सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. पण सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला वाव मिळाला नाही. यात नवनवीन प्रयोग करून उद्योग वाढवण्याची व तरुणांना रोजगार देण्याची गरज आहे." पण मोदींच्या कारकीर्दीत ना सोलापूरचा वस्त्रोद्योग वाढला ना त्यातला रोजगार. उलट पीछेहाटच चालू आहे.
6- प्रत्येक खासदाराने दत्तक गाव घेऊन विकासकामे करण्याची पंतप्रधानांची योजना होती. सोलापूरचे खासदार भाजपचे शरद बनसोडे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती गाव दत्तक घेतले होते. परंतु तेथे विकासकामे होण्यासाठी त्यांनी धडपड बिलकुल केली नाही. खासदार विजयसिंह मोहिते यांनी दत्तक घेतलेल्या माढा तालुक्यातील तुळशीची अवस्थाही अशीच आहे.

 

लेखाजोखा स्मार्ट सिटीचा
- केंद्र सरकारकडून आलेल्या 312 कोटी रुपयांपैकी फक्त ३५ कोटीच खर्च...
- कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही गती नाही, स्मार्ट रूप कधी येणार...
- स्मार्ट सिटी अंतर्गत हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे.

 

खासदार दत्तक गाव योजनेचा बोजवारा
ग्रामीण विकासाचे रोल मॉडेल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी दत्तक गाव योजना जाहीर केली. जिल्ह्यातील खासदार शरद बनसोडे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती तर खासदार विजयसिंह मोहिते यांनी माढा तालुक्यातील तुळशी हे गाव दत्तक घेतले. दोन्ही गावांत विकासकामांना अद्याप वेग आलेला नाही.

 

येवती : पुरेशी कामे नाहीत
येवती गाव दत्तक घेण्यापूर्वी या गावाला नऊ पुरस्कार मिळाले आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये पुरेसे काम झाले नसल्याची तक्रार सरपंच विक्रमसिंह पाटील यांची आहे. पाच हायमास्ट दिवे मागितले होते, मात्र प्रत्यक्षात दोनच मिळाले, असे त्यांचे म्हणणे आहे.

पब्लिक प्लाझाने कळले... 'स्मार्ट म्हणजे काय?' अशी विचारणा करणाऱ्यांना रंगभवन चौकातील 'पब्लिक प्लाझा'ने दिपवून टाकले. त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने चाचणी सुरू झाली अन् रंगभवन चौकाचे रूपडेच पालटून गेले. त्या वेळी स्मार्टचा अर्थ कळला. परंतु त्याच्या पुढून हरिभाई देवकरण प्रशालेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेमके काय चालले हे अद्यापही कळले नाही. त्याच्या पुढचा रस्ता तर बंदच झाला. नॉर्थकोट प्रशालेच्या समोरील रस्ता बंद करून वर्ष होत आहे. त्याचेही स्मार्टरूप अद्याप दिसत नाही. पैसे असूनही कामाला गती नाही, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

 

महापालिकेकडे पैसाच नाही केंद्राच्या निधीत महापालिकेने 50 कोटी रुपयांचा हिस्सा देणे आवश्यक होते. त्याची जुळवाजुळव अद्यापही झालीच नाही. गावठाण भाग स्मार्ट करण्याच्या कामात हद्दवाढ भागाला वेठीस धरण्यात आले. आयुक्तांनी नया पैसाही उपलब्ध करून दिला नाही. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना प्रभाग विकासासाठीचा त्यांचा निधी स्मार्ट सिटीकडे वळवला जातोय, हे लक्षात आले. महापालिका भाजपच्या ताब्यात असल्याने बाेभाटाही झाला नाही. निधी उभारण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्याचवेळी पुणे महापालिकेने रोखे विक्रीस काढले होते, ही बाब लक्षात घेण्यासारखे आहे.

 

तुळशी : भीषण पाणीटंचाई
तुळशी गावामध्ये आजही भीषण पाणीटंचाई आहे. सध्या बेंबळे बंधाऱ्यातून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पेयजल योजनेतून सहा कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. पाणी योजनेची प्रक्रियाही सुरू आहे. प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी ग्रामस्थांना आशा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...