Lok Sabha / ज्यांना जामीन मिळाला त्यांनी एन्जॉय करावे, ही काही आणीबाणी नाही; संसदेत मोदींकडून विरोधकांना फ्रीस्टाईल

आणीबाणी आणि विरोधकांच्या प्रश्नांवर मोदींची सडेतोड उत्तरे

वृत्तसंस्था

Jun 25,2019 07:16:15 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यावर लोकसभेत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरे दिली. यावेळी मोदींनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. मोदी म्हणाले, "काही लोक जेलमध्ये पोहोचले नाहीत त्यासाठी आम्हाला दोष दिला जात आहे. ही काही आणीबाणी नाही की सरकार कुणालाही तुरुंगात टाकेल. ही लोकशाही आहे यात न्यायालय निर्णय घेणार... आम्ही कायद्याला काम करू देतो. एखाद्याला जामीन मिळाला असेल तर त्यांनी मजा करावी. सुडाच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. पण, भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचा लढा असाच सुरू राहील.'' असेही मोदींनी ठणकावले आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींना एक प्रश्न केला होता. तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींना चोर म्हणता, मग ते तुरुंगाबाहेर कसे आहेत? अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यालाच मोदींनी हे उत्तर दिले आहे. देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळ्या दिनाला 44 वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणी एक असा डाग आहे जो कधीच पुसून काढता येणार नाही असे मोदींनी सांगितले आहे.

आणीबाणीचा डाग कधीच मिटणार नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले, ''25 जून ला काय घडले होते याची लोकांना माहिती आहे का? 25 जून च्या त्या रात्री देशाची आत्मा पायदळी तुडवण्यात आली होती. भारतात लोकशाही केवळ राज्यघटनेच्या पानांमधून जन्मलेली नाही. भारतात लोकशाही शतकांपासून आमचा आत्मा आहे. ती आत्माच पायदळी तुडवण्यात आली होती. मीडियावर नियंत्रण मिळवण्यात आले होते. महापुरुषांना तुरुंगात डांबण्यात आले होते. हिंदुस्थानाला तुरुंगात रुपांतरित करण्यात आले होते. केवळ सत्ता टिकवण्यासाठी... न्यायमंडळाचा अनादर कसा होतो त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. 25 जूनला आम्ही लोकशाहीच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. त्यावेळी जो कुणी या पापात सहभागी होता, त्याने लक्षात ठेवावे की तो डाग कधीच मिटणार नाही. हा डाग सदैव आठवणीत राहील. कारण, देशात अशा पापाची पुनरावृत्ती करणारा दुसरा कुणी जन्माला येऊ नये. कुणालाही वाइट म्हटल्याने काही साध्य होत नाही.''

X
COMMENT