आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमसी बँक संचालकाने धर्मांतर करून दुसरे लग्न केल्याचे उघडकीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एचडीआयएलला नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज देऊन सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाने दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे. जॉय थॉमस हा सध्या पोलिस कोठडीत असून पोलिस तपासात ही माहिती उघड झाली आहे. ६२ वर्षीय जॉय थॉमसने जुनेद नाव धारण करून दुसरे लग्न केले होते आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात नऊ फ्लॅट असून या फ्लॅटची किंमत चार कोटी रुपये असल्याचे समजते.

पोलिस तपासात जॉय थॉमस याने दिलेल्या माहितीनुसार २००५ मध्ये त्याने आपल्या खासगी सचिव तरुणीशी दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारून जुनेद नाव धारण केले आणि सचिव महिलेशी लग्न केले. विशेष म्हणजे जॉय थॉमस पूर्वीपासून विवाहित आहे. खासगी महिला सचिवाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या तरुणीने आपण लग्न करून दुबईला स्थायिक होत असल्याचे कारण देत पीएमसी बँकेचा राजीनामा दिला होता. मात्र, दुबईला न जाता ती पुण्यात स्थायिक झाली. लग्नानंतर जॉय मुंबई-पुणे सतत ये-जा करत असे. थॉमस आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला ११ वर्षांची एक दत्तक मुलगी आणि एक मुलगा आहे. थॉमसची दुसरी पत्नी पुण्यात चॉकलेटचे उत्पादन आणि विक्री करते, शिवाय तिच्या मालकीचे एक बुटिक असून पुण्यातील इतर फ्लॅट्सच्या भाड्यातून ती आपला उदरनिर्वाह करते. 
 

पहिल्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज
जॉय थॉमसच्या पहिल्या पत्नीला ही बाब कळल्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. थॉमसच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात एवढे फ्लॅट कसे, याचा तपास पोलिस करत असून घोटाळ्यातील पैशामधून हे फ्लॅट विकत घेतल्याचे आढळून आल्यास ते जप्त करण्यात येतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी थॉमसच्या नावावर मुंबई आणि ठाण्यात असलेले चार फ्लॅट्स जप्त केलेले आहेत. पोलिस तपासात जॉय थॉमसने आपण जुनेद नाव घेतले असले तरी या नावाने कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...