आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM's Advice On Constitution Day : Now Is The Time To Pay Special Attention To Duty: Modi

राज्यघटनादिनी पंतप्रधानांचा सल्ला, आता कर्तव्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशात मंगळवारी राज्यघटना दिन साजरा करण्यात आला. देशाने राज्यघटना स्वीकारली त्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी मार्गदर्शन केले, तर विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रातोरात उठवून राज्यपालांनी राज्यघटनेलाच फाटा दिल्याबद्दल या अधिवेशनावर बहिष्कार टाकला. या विरोधी पक्षांनी निदर्शनेही केली.

संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांनी आपल्या घटनात्मक नैतिकतेचे पालन केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यापूर्वीच्या काळात अधिकारांवर भर दिला जात होता. आता कर्तव्यावर भर दिला गेला पाहिजे. आणीबाणीचा उल्लेख करून मोदी म्हणाले, यानंतरच्या काळातही आपली लोकशाही कायम राहिली ही आपल्या राज्यघटनेची शक्ती आहे. २६ नोव्हेंबर हा राज्यघटना दिन म्हणून भारतात आनंदाचा दिवस आहे. मात्र, याच दिवशी २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपकडून विरोधी पक्षांचा निषेध


राज्यघटनादिनी आयोजित संसदेच्या संयुक्त अधिवेशनावर बहिष्कार टाकल्याबद्दल भाजप नेते व केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांचा निषेध केला. हा दिवस राजकीय मतभेदांपेक्षा मोठा आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी अनुपस्थिती म्हणजे डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा अपमान आहे.

अधिवेशनावर बहिष्कार हे राज्यघटनेचे उल्लंघन नाही : डॉ. सिंग
 
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनावर विरोधी पक्षांनी टाकलेला हा बहिष्कार राज्यघटनेचे उल्लंघन नसल्याचे स्पष्ट करून विद्यमान केंद्र सरकारच राज्यघटनेतील तत्त्वांचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. हे सतत होत असलेले उल्लंघन हा जनतेसाठी एक इशारा असल्याचे डॉ. सिंग यांनी नमूद केले.

शिवसेनेचा बहिष्कार
 
राज्यघटनादिनी आयोजित संयुक्त अधिवेशनावर शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करून विरोधी पक्षांनी निदर्शने केली.