London / PNB Fraud: नीरव मोदीचा जामीन अर्ज यूके हायकोर्टानेही फेटाळला, तीन महिन्यांपासून जेलमध्ये

जामीनावर सुटल्यानंतर पुराव्यांशी छेडछाड करू शकतो नीरव -कोर्ट

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 04:27:00 PM IST

लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा फरार आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज युनायटेड किंगडमच्या हायकोर्टाने देखील बुधवारी फेटाळून लावला आहे. नीरव मोदी आत्मसमर्पण करणार याची शक्यता कमी आहे. सोबतच, तो या प्रकरणातील साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो असे न्यायाधीश इनग्रिड सिमलर यांनी स्पष्ट केले. हायकोर्टापूर्वी वेस्टमिंस्टर कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुद्धा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वेस्टमिंस्टर कोर्टाने तीनदा अर्ज फेटाळल्यानंतर नीरवने 31 मे रोजी हायकोर्टात याचिका केली होती. या प्रकरणात हायकोर्टाने मंगळवारी सुनावणी घेतली आणि बुधवारी त्याचा जामीन फेटाळत असल्याचे स्पष्ट केले.


नीरव मोदी गेल्या 86 दिवसांपासून लंडनच्या वँड्सवर्थ जेलमध्ये कैद आहे. त्याला 19 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. नीरव मोदीची बाजू वकील क्लेअर मोन्टगोमेरी यांनी मांडली. त्यांनी न्यालयात नीरवच्या जामीनासाठी पुरेपूर प्रयत्न केला. नीरवला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या हालचालींवर इलेक्ट्रॉनिक चिप किंवा डिव्हाइसने लक्ष ठेवण्यात यावे अशीही विनंती वकिलांनी केली होती. नीरव मोदी ब्रिटनमध्ये कमवण्यासाठी आला आहे. त्याच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे असा युक्तीवाद देखील वकिलांनी मांडला होता. परंतु, सरकारी वकिलांनी बचावपक्षाचा दावा खोडून काढला. नीरव मोदी ब्रिटनला येणे हा एक योगायोग नाही. प्रत्यक्षात, त्याने कर्जाचा व्यवहार आणि डमी पार्टनर्स तयार करून फसवणूक केली असेही सरकारी वकिलांनी म्हटले. न्यायाधीशांच्या निदर्शनात नीरवचे व्यवहार आणल्यानंतर कोर्टाने तो बाहेर पडल्यानंतर पुराव्यांशी छेडछाड करू शकतो असा निष्कर्श काढला तसेच त्याला जामीन देता येणार नाही असे सांगितले.

X
COMMENT