आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक बंधनाबाहेरील कविता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

“परिघाबाहेर” कवितासंग्रह आशय, विषयाच्या बाबतीत वैशिष्टयपूर्ण ठरतो. डांगे यांचा पहिलाच कवितासंग्रह असला तरी नवखेपणाच्या खुणा संग्रहात दिसून येत नाहीत. संग्रहातील कविता अधिक प्रगल्भ व विचारप्रवर्तक असल्या तरी अगदी सहज व सोप्या भाषेतील मांडणीमुळे वाचकांना वाचिक आनंद न देता पारंपरिक बंधनाबाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करतात.

 

डोळ्यात पेरलेल्या स्वप्नांचा आधार घेत आणि पंखाना मिळालेल्या बळाच्या साहाय्याने पारंपरिक कवितेच्या साच्यातून स्वतःला बाहेर काढत परिघाबाहेर झेप घेण्याचा कवयित्रीचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. याचा प्रत्यय हा कवितासंग्रह वाचताना येतो. नात्यांची गुंतागुंत, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वातावरण या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेत जाणवतो. दुःखाला कवटाळून बसत आयुष्याचं रडगाणं  गाणं ही भावना कवयित्रीच्या मनाला संकुचित करते. आणि म्हणूनच परिघाबाहेर या काव्यसंग्रहातील कवितेत भेटणाऱ्‍या नायिका संकटांनी पराभूत होऊन संपत नाहीत तर डोळ्यात जिंकण्याचे स्वप्न पाहत परिघाबाहेर झेप घेण्याचा प्रयत्न करतात. ‘ती” ही कविता तीन भागात आपल्यासमोर येते. तीन नायिकांच्या स्वप्नाचा प्रवास व वर्तमानकाळात त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मूठमाती देऊन निमूटपणे जगण्याची अगतिकता या कवितेत प्रकर्षाने जाणवते. सामाजिक व कौटुंबिक बंधनांवर प्रहार करताना ही कविता वाचकांना अंतर्मुख करते. ‘स्त्रीधर्म’ या कवितेत महापुरुषांच्या विचारांचा आधार घेत स्त्री आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून स्त्रीधर्म कसा पाळते, याचे उपरोधिक वर्णन करण्यात व स्त्रीजीवनाची विफलता वाचकांसमोर माडंण्यात कवयित्रीने वापरलेले दाखले परिणामकारक ठरतात. ‘स्त्रीधर्म’मधे कवयित्री म्हणते,


“ती निरपेक्षपणे पाळते 
शिकवण बुद्धाची 
‘अपेक्षा दुःखाचे मूळ कारण आहे.’
 ती करतच नाही कोणतीच अपेक्षा
आणि ती सुखी असल्याचे भासत साऱ्यांनाच. 
श्रीकृष्णाची शिकवण नेहमीच ठेवते लक्षात ‘कर्म करा फळाची अपेक्षा करू नका’
 हे सारे भोगते, सोसते, जगते ती आयुष्यभर
कारण तिचा एक धर्म आहे स्त्रीधर्म.”


कवयित्री अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड यांना आपल्या कवितेतून नाकारते. संकटास भिडताना मनाची ताकदच प्रेरणा देते.‘जप थोडेसे” या कवितेत किशोरवयीन मुलींना समजावून सांगताना कवयित्री म्हणतात,


 “उन्हानं करपलंय रान सारे. 
 चटके तुला बसतील जरासे,
 स्वतःसाठी हिरवेपण जप थोडेसे.”


पाऊस, माती या  रूपकांचा छान वापर करत कवयित्रीने मानवी मनाचे कंगोरे “मग अवघड होते” या कवितेत समर्पकपणे मांडले आहेत. “मग अवघड होते” कवितेत कवयित्री म्हणतात,


“पावसाशी तसे माझे वैर नाही
 त्याच्या भरवशावर  माती प्रसवते
 कोंब आसुसतात 
तो मात्र दगा करतो 
मग अवघड होते.”


“माणुसकी हाच धर्म जाणू”, “नवभारत” या सामाजिक कविता आत्मभान जागृत करतात. सामाजिक मानसिकतेवर भाष्य करणारी “निर्भया” ही  कविता मन हेलावून सोडते. “माय माझी” या कवितेत आपल्या आईविषयी भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणतात, 


“चार घास प्रेमानं 
रोज खाती पोरंबाळं,
 माझ्या मायेच्या कष्टाने 
उभारलं घर सारं.”


“बेंचवरील उद्याचे भविष्य” या कवितेत कवयित्री शाळेतील बेंचवरील नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे भावविश्व आपल्यासमोर ठेवतात. उद्याच्या भविष्याची चिंता करताना काही निरागस बालकांचा वर्तमानकाळ निसटून जाऊ नये म्हणून कवयित्रीच्या मनाची तगमग या कवितेतून जाणवते. “परिघाबाहेर” या संग्रहातील कविता पारंपरिक चालीरीतींना धुडकावून अनेक विषयांना स्पर्श करतात. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय विषयांशी संबंधित कविता मानवी मनाचा वेध घेण्यात यशस्वी ठरतात.

> पुस्तकाचे नाव : परिघाबाहेर
> कवयित्री :  आशा अशोक डांगे 
> प्रकाशन : गोदा प्रकाशन औरंगाबाद
> पृष्ठ - ८० {मूल्य - १५० रुपये

 

बातम्या आणखी आहेत...