आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारे कवी मणि मोहन...!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरत यादव

हिंदी साहित्यातील परिचित आणि अपरिचित मान्यवर कवींच्या निवडक कवितांची ओळख या सदराच्या माध्यमातून करुन दिली जाणार आहे. हिंदी साहित्यामधून सामाजिक जाणिवा नेहमीच अधिक टोकदारपणे व्यक्त होत आल्या आहेत. श्रेष्ठ साहित्यिक मूल्ये जपण्याबरोबरच तळागाळातल्या शेवटच्या माणसाशी असलेले घटनादत्त नाते टिकवणे ही प्रत्येक भाषेमधील साहित्यकृतीचे आद्य कर्तव्यच ठरावे.भाषा कुठलीही असो,मानवतेचा कळवळा असणारे वाङ्मय सहजगत्या ओळखता येते. अशाच काही प्रतिभावंत कवींच्या विचारांचा परिचय त्यांच्या कवितांच्या मराठी अनुवादातून वाचकांपुढे ठेवण्याचा मानस आहे. ते एक प्रकारचे साहित्यिक-वैचारिक "अनु-बंध'च असणार आहे.

हिंदीतील प्रसिद्ध कवी मणी मोहन हे अल्पाक्षरी कवितेसाठी ओळखले जातात.कमी शब्दांमध्ये अर्थपूर्ण कविता लिहिण्याचे कसब साधलेले मणी मोहन मध्य प्रदेशच्या विदिशा येथील गंज बासौदा या ठिकाणी शासकीय स्नातकोत्तर महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करतात.

"कस्बे का कवि एवं अन्य कविताएं', "शायद',"दुर्दिनों की बारिश में रंग' आणि  "भेडियों ने कहा शुभरात्री' इत्यादी काव्यसंग्रह तसेच दोन अनुवादित कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय मणी मोहन यांची समीक्षापर लेखनाची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.

प्रस्तुत कविता "भेडियों ने कहा शुभरात्री' या त्यांच्या नव्याकोऱ्या काव्यसंग्रहामधून घेतल्या आहेत. आपल्या कवितांमधून मानवी भावभावनांचे तरल आणि सशक्त चित्रण करणाऱ्या मणी मोहन यांची काव्यप्रतिभा सामाजिक वैगुण्ये आणि त्रुटींवरही तितक्याच भेदकपणे भाष्य करते. समाजात घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांपासून स्वतःला दूर न ठेवता आपल्या साहित्यातून रस्त्यावरच्या लढाईचा,सामान्य जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्यांपैकी साहित्यिक म्हणून मणी मोहन ओळखले जातात. त्याचीच चुणूक त्यांच्या या कवितांमधूनही दिसून येते. 

लोकशाही
 

मतदान यंत्र पाहिल्यानंतर
 

त्या वृद्ध महिलेने
 

प्रचंड संतापाच्या भरात म्हटलं
 

की, या वेळेस ती कुणालाच मत देणार नाही
 

कारण तिचे “बीपीएल’चे
 

रेशन कार्ड नाही बनले
 

दुःख झाले ऐकून
 

आणि सुखद आश्चर्यसुद्धा
 

की, तिच्या तक्रारीत
 

मोठ्या चतुराईने अचानक निर्माण
 

करण्यात आलेले मुद्दे सामील नाहीत
 

आणि चुकीचाही नाही तिचा संताप
 

की, या लोकशाहीच्या तमाशात
 

भूक अजूनही
 

पहिल्याच क्रमांकावर आहे!

मिरवणूक
 

बलात्कारी आणि मारेकऱ्यांच्या 
 

समर्थनार्थ निघणाऱ्या मिरवणुकीत
 

सहभागी होण्यापूर्वी
 

थोडा विचार करावा
 

की, ही मिरवणूक 
 

तुमच्या घरासमोरूनही जाईल
 

थोडा विचार करावा
 

की, विचारू शकतात
 

तुमच्या आया, बहिणी 
 

वा मुली
 

की, कुठल्या कारणासाठी
 

निघाली आहे ही मिरवणूक?

एका तरुण मित्रासाठी
 

न घाबरता या..!
 

कवितेच्या दुनियेत
 

लिहिल्या गेलेल्या आणि
 

लिहिल्या जात असलेल्या कवितांच्या
 

गुरुत्वापासून मुक्त होऊन या..!
 

घराच्या बाहेर पडा
 

स्वतः शोधा
 

आपल्या कवितेची भाषा
 

पाहा..!
 

रेल्वेस्टेशन किंवा एखाद्या बागेतील
 

बाकावर जो बसला आहे
 

एक वृद्ध माणूस
 

खूपच एकाकी आणि गप्प
 

त्याच्याचजवळ मिळेल तुम्हाला
 

आपल्या कवितेची पहिली ओळ
 

त्याच्याजवळ जा.. त्याच्याशी बोला.

फरक
 

काय फरक पडणार आहे
 

जर बदलण्यात आले 
 

तुमच्या शहराचे नाव
 

{फरक पडत असतो
 

{उद्या तुमच्या शहराचेही 
 

नाव अशाच प्रकारे बदलले जाईल!
 

{आता म्हणा
 

काय फरक पडतो
 

{फरक पडला नसता
 

जर आपण असतो
 

कुत्री, मांजरं, उंदरं वा अन्य 
 

कुठले जीवजंतू 
 

{माणसे आहोत
 

शहराचे नाव एक अल्बम आहे
 

आमची चित्रं आहेत
 

या अल्बममध्ये
 

या नावाबरोबर जोडल्या गेलेल्या
 

आमच्या आठवणी आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...