आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्याचे कृत्य  : पत्नीच्या खुनात शिक्षा झाली, साक्षीदार मुलीस प्रेयसीच्या मदतीने पाजले विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर कासार - मुलींसमाेरच पत्नीला पेटवून देत तिचा खून करणाऱ्या पित्याला मुलीच्या साक्षीमुळे तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागली. याच रागातून पित्याने कारागृहातून सुटकेनंतर अापल्या प्रेयसीच्या मदतीने पाेटच्या मुलीस (साक्षीदार) मुलीस विष पाजल्याचा प्रकार शिरुर तालुक्यातील वारणी येथे घडला. रविवारी २१ जुलै रोजी घडलेल्या या प्रकारात गुरुवारी रात्री मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पित्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 


वारणी (ता.शिरूर कासार ) येथील भगवान जगन्नाथ केदार याने सन २०१२ मध्ये पत्नीस पेटवून दिले होते. यात गंभीर भाजल्याने पत्नीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, भगवान यास अनिता आणि पूजा अशा दोन मुली आहेत.  पत्नीला पेटवून देताना मोठी मुलगी अनिता हिने पाहिले होते. अनिताने या प्रकरणात वडील भगवान केदार विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने अनिताच्या साक्षीने या प्रकरणात भगवानला शिक्षा झाली होती. तीन वर्षे तो कारागृहात हाेता. दरम्यानच्या काळात आईचा मृत्यू तर वडील कारागृहात अशी स्थिती झाल्याने अनिता व पूजा या दोन्ही मुली घाटशिळ पारगाव येथील आपल्या मामाकडे वास्तव्यास होत्या. अधूनमधून त्या वारणी येथे येऊन आपल्या आजीला भेटत असत. दीड महिन्यांपूर्वी अनिता वडिलांकडे आली असताना घरात वडिलांबराेबर शीतल खेडकर (रा. जांभळी ता. पाथर्डी) ही महिला दिसून आली. अनिताने ही महिला कोण याची विचारणा वडील भगवान यांच्याकडे केली असता आम्ही लग्न करणार असल्याचे अनिताला सांगितले. यावेळी  शीतल व अनिता यांच्यात  वादही झाला होता. 


दरम्यान, अनिता पुन्हा मामाकडे गेली. काही दिवसांपूर्वी मामाने अनिताचे लग्न जमवले. लग्न जमल्याची माहिती देण्यासाठी २१ जुलै रोजी अनिता वारणी येथे वडिलांकडे आली होती. वडील शेतात असल्याची माहिती मिळाल्याने ती शेतात गेली.  तिथे वडील, आजीसाेबत वडिलांची प्रेयसी शीतलही दिसून आली. अनिताने शीतलला तू इथे कशी अाणि का येतेस अशी विचारणा केली. यात दोघींत वाद झाला. या वादात वडील भगवान याने शीतलच्या मदतीने अनिताला विष पाजले.


आजीने वाचवला जीव 
भगवान व शीतल हे अनिताला विष पाजत असताना आजी कांताबाईने पाहिले. तिने दोघांच्या तावडीतून अनिताची सुटका केली. यानंतर अनिताने आपल्या दुचाकीवरून शिरुर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र, तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने एका खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. गुरुवारी प्रकृती ठीक झाल्यानंतर अनिताने शिरुर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरून भगवान केदार व शीतल खेडकर यांच्या विरोधात मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.


तुझ्यामुळे शिक्षा झाली
शीतल व अनिता यांच्यात वाद झाल्याने भगवान केदार चिडला. तू नेहमीच माझ्या विरोधात बोलतेस, तू विरोधात साक्ष दिल्याने मला शिक्षा झाली असे म्हणत त्याने शेतातील गोठ्यात ठेवलेली कीटकनाशकाची बाटली आणली. शीतलने अनिताचे पाय धरले आणि भगवानने तिला विष पाजले.