आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरीवाल्याकडील भगरीच्या पिठामुळे 8 गावांमधील 110 जणांना विषबाधा 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- एकादशीच्या उपवासासाठी खाल्लेल्या भगरीच्या पिठामुळे माजलगाव तालुक्यातील कोथरूळ, उमरी, रोषणपुरी, छत्र बोरगाव, गंगामसला, नागडगाव, माळेवाडी, भाटवडगाव या गावांतील ११२ जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यात सध्या ग्रामस्थांवर उपचार करण्यात येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बीडच्या रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, किराणा दुकानावरील भगरीचे पीठ ग्रामस्थांनी खाऊ नये, अशी दवंडी तालुक्यातील गावागावांत देण्यात आली आहे. 

 

गुरुवारी एकादशी असल्याने ग्रामस्थांनी उपवास धरला होता. फराळासाठी गावातील किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले. दोन दिवसांपूर्वीच एका खासगी व्यक्तीकडून गावातील दुकानदारांनी भगरीचे पीठ विकत घेतले होते. हेच पीठ गुरुवारी गावातील नागरिकांना विक्री केले. ग्रामस्थांनी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्यानंतर दुपारी उमरीत चार, पाच जणांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर असा त्रास होणाऱ्यांची सख्या वाढू लागली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उमरी, रोषणपुरी, कोथरूळ येथील जवळपास ११२ रुग्ण दाखल झाले. यात ६५ महिला रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करण्यात येत असून अत्यवस्थ रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जागा अपुरी पडत असल्याने रुग्णालयातील एका खाटावर दोन रुग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयातील डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, डॉ. दत्तात्रय पारगावकर, डॉ. आनंद उघडे, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रसाद कुलकर्णी या डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांवर उपचार केले. 

 

रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे यातील काही अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला पाठवण्यात आले असून येथील रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे. -डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी. 

 

माहिती मिळताच अधिकारी, राजकीय नेत्यांच्या भेटी 
भगरीतून विषबाधा झाल्याची माहिती कळताच उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या लोकांची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार एन.जी.झंपलवाड, छत्रपती कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन जगताप, ज्ञानेश्वर मेंडके, अरुण राऊत, नितीन नाईकनवरे, बबनराव सोळंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली. 

 

भगर न खाण्याची दिली गावागावांमध्ये दवंडी 
उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांनी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयास पाच वाजल्यापासून तळ ठोकून असून तालुक्यातील प्रत्येक गावात दवंडी देण्याचे आदेश दिले असून भगरीच्या पिठाचे सेवन करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या नऊ गावासह तालुक्यातील अन्य गावातही दवंडी देण्यात आली. 

 

मंदिरातच उपचार 
आठ गावांत भगरीच्या पीठातून विषबाधा झालेले अद्यापपर्यंत शंभरहून अधिक रुग्ण समोर आले. यात कोथरूळ, उमरी, रोषणपुरी, छत्र बोरगाव, गंगामसला, नागडगाव, माळेवाडी, भाटवडगाव या गावांचा समावेश आहे.तालुक्यातील उमरी व बोरगाव येथे माजलगावची रुग्णवाहिका व औषध गोळ्या पाठवून याच गावांतील मंदिरात बाधितांवर उपचारही करण्यात येत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...