आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारू अड्ड्यावर धाड; चार महिलांना अटक, दहा जणांवर गुन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बुलडाणा : शहरातील भिलवाडा व कैकाडीपुऱ्यातील गावठी दारू अड्ड्यावर शनिवारी पोलिस व राज्य उत्पादन शुल्कच्या संयुक्त पथकाने धाडी टाकून २०५ लिटर गावठी दारू, ३ ८१९ लिटर रसायन व देशी दारूचे बॉक्स असा एक लाख रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून चार महिलांना अटक केली. या धडक कारवाईने गावठी दारूची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

 

शहरातील भिलवाडा व कैकाडीपुऱ्यात सर्रास गावठी दारूसह देशी दारूची विक्री करण्यात येत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांवर ख्रिसमस व थर्टीफर्स्ट येऊन ठेपला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी छापे टाकून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तसेच या वेळी २०५ लिटर गावठी दारू, ३८१९ लिटर रसायन व देशी दारूचे बॉक्स असा एकूण एक लाख सात हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून सुमन देवसिंग ठाकरे, चंदाबाई बबन माळे, प्रभा संतोष बरडे व सुशीला बाबुलाल गायकवाड या चार दारू विक्रेत्या महिलांना अटक केली आहे. तर ताईबाई अंबादास बरडे या महिला फरार झाली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे एस. डी. कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी महामुनी व शहर ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. आर. शेवाळे, भरारी पथकाचे वा. रा. बरडे, एस. डी. चव्हाण, ए. आर. अडाळकर, संतोष जंजाळ, महिला पोलिस कर्मचारी चंदा साठे, विलास पवार, रामेश्वर राठोड, पहाडे, देशमुख, तिवाणे, निकाळजे, चव्हाण, कुसळकर, सौभागे, मोरे, पाटील व सोनाली उबरहंडे यांनी केली. 

हिवरा खु.येथे दारू भट्टीवर कारवाई 

जानेफळ येथून जवळच असलेल्या हिवरा खुर्द येथील बाळलवण शिवारात गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता धाड टाकली. या कारवाईत २२५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी फरार झाला आहे. 


मिळालेल्या माहितीवरून जानेफळ पोलिस स्टेशनचे पोलस उपनिरीक्षक राजू राऊत, पो. कॉ. अमोल बोर्डे यांनी तालुक्यातील हिवरा खुर्द येथील बाळलवण शिवारातील टेकडीच्या खाली खोल दरीत अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकली. 


या वेळी बाबूसिंग सोमला राठोड रा. हिवरा खुर्द हा अवैधरीत्या दारूची विक्री करत असताना आढळून आला. मात्र पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहून बाबूसिंग राठोड याने त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष ९ टाक्या मोहा सडवा किंमत २२५०० रुपयांचा माल जप्त केला. पीएसआय राऊत यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबूसिंग सोमला राठोड वय ४२ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गौरीशंकर पाबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजू राऊत, पोलिस कॉन्स्टेबल अमोल बोर्डे करत आहे. 
 


 

बातम्या आणखी आहेत...