आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा प्रशासकीय निरीक्षक असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया प्रशासकीय अधिकाऱ्यास (आयएएस) अमरावती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. येथील व्हीएमव्ही रोडवरील प्रवीण नगर निवासी सुबोध दिपक खोब्रागडे (वय 19) असे ताब्यात घेतलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
जेल रोडवरील शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे फ्रेजरपुरा पोलिसांनी ही कारवाई 31 जानेवारीला केली. पोलिसांनी त्याच्याकडून अनेक बनावट कागदपत्रेही जप्त केले आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असल्याची बतावणी करून सरकारच्या विविध विभागाच्या कार्यक्रमात तोतया वावरत होता. महिन्यातून आठ ते दहा दिवस अमरावतीत राहणारा सुबोध ओला कंपनीची कार आरक्षित करीत होता.
सदर कारवर स्वत:जवळील अंबर दिवा लावून तो शासनाच्या विविध विभागाच्या कार्यक्रमात आयएएस अधिकारी म्हणून वावरत होता. एक दिवस ओला कारच्या चालकाला सुबोधजवळ आयएएस अधिकारी असल्याच्या ओळखपत्रासह अन्य काही दस्ताऐवज दिसून आले. ओळखपत्रावर राष्ट्रपती भवन, दिल्ली येथील पत्ता नमूद होता. त्यामुळे चालकाला सुबोधवर संशय आला. त्याने यासंदर्भात फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते.
कारागृह मार्गावरील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलनात सुबोध सहभागी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या कार्यक्रमाला येताच पोलिसांनी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातून तोतया आयएएस अधिकारी सुबोधला अटक केली. त्याच्याजवळून अंबर दिवा असलेली कार, वॉकीटॉकी, बनावट ओळखपत्र, राजमुद्रा असलेली केन व अन्य दस्ताऐवज जप्त करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती यांचे प्रशासकीय अधिकारी असा पदाचा उल्लेख असलेले तसेच राष्ट्रपतींचे मुख्य सचिव संजय कोठारी (आयएएस) यांची स्वाक्षरी असलेले बनावट ओळखपत्र सुबोधकडे आढळून आले. सुबोधकडे अनेक बनावट कागदपत्र, नियुक्तीपत्र आढळून आले आहे. पोलिस सुबोधची कसून चौकशी करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.