Police action / अवैध दारूविक्रीच्या विरोधात रास्ता रोको करणाऱ्या महिलांना पोलिसांची मारहाण

औसा तालुक्यातील तावशीगड येथील घटना

प्रतिनिधी

Jul 12,2019 08:52:00 AM IST

लातूर - गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी औसा तालुक्यातील तावशीगड येथे गुरुवारी दुपारी महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी दबाव टाकणाऱ्या पोलिसांसोबत महिलांची झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.


ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तावशीगड (ता. औसा) येथे अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे गावातील तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. हे गाव ज्या भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते तेथील पोलिस निरीक्षकांना तावशीगडच्या महिलांनी निवेदन देऊन दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. परंतु मागणी केल्यानंतर उलट विक्री करणाऱ्यांनी आणखी एक दुकान थाटले. त्यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी रास्ता रोको केला. या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली.


तरीही महिलांनी आंदोलन केले. पोलिसांनी हा रास्ता रोको मागे घेण्यासाठी बळाचा वापर केला. त्यामुळे महिला व पोलिसांत वाद झाला. त्याचे पर्यवसान झटापटीत झाले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून आंदोलन मोडून काढले. परंतु याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.

X
COMMENT