आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस : आम्ही पत्र मागितलेच नाही, नातेवाइक मिळेना अन् ओळख पटेना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- १२ दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वृद्धाच्या मृतदेहाची १२ दिवस उलटले तरी अद्याप ओळख पटली नसल्याने अंत्यसंस्कार तर दूरच राहिले आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो बीड जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. चकलांबा पोलिसांनी मात्र मृतदेह ठेवण्यायोग्य नाही, असे पत्र द्यावे, अशी मागणी जिल्हा रुग्णालयाकडे केली आहे. आम्ही उत्तरीय तपासणी केली असून मृतदेह ताब्यात देणे आमचे काम आहे, परंतु अशा प्रकारे पत्र देता येेणार नाही, असे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, तर आम्ही पत्राची मागणी केली नसून त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीवरील पोलिस ठाण्याशी संपर्क केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकंदर पोलिस आणि जिल्हा रुग्णालयाच्या वादात मागील १२ दिवसांपासून अनोळखी मृतदेह शवगृहात अंत्यसंस्काराविना पडून आहे. 


गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून पैठण ते माजलगाव उजवा कालवा जातो. सध्या या कालव्यातून माजलगावला पाणी सोडण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या कालव्यात ६२ वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. चकलांबा पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पैठणच्या आसपास भागातून हा मृतदेह वाहून आला असावा, असा पोलिसांना अंदाज आहे. पैठण पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवगृह नसल्याने १२ जानेवारी रोजी रात्री बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर १३ जानेवारीला जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ओळख पटण्यासाठी तो जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नातेवाइकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ओळख पटवण्यासाठी कोणीच पुढे आलेले नाही. 


हद्दीवरील अन्य पोलिस ठाण्याशीही संपर्क केला आहे. यातच मागील १२ दिवस निघून गेले आहेत. ओळख पटत नसल्याने मृतदेह बीडच्या शवगृहात कुजत पडला आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी alt147दैनिक दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता मृतदेह ठेवण्यायोग्य नाही, असे पत्र रुग्णालयाने द्यावे, अशी मागणी चकलांबा पोलिसांनी केली असल्याचे म्हटले आहे. पोलिस आणि जिल्हा रुग्णालयाच्या वादात मृतदेह मात्र मरणानंतरही यातना भोगत आहे. 


मृतदेह शवगृहात अंत्यसंस्काराविना पडून, शवविच्छेदन केंद्र अन्् शवगृह रामभेरोसे 
जिल्हा रुग्णालयातील शवगृहाला असे शटर असून कुलूप लावले आहे. इन्सेटमध्ये शवविच्छेदन केंद्र कुलूप बंद. 


मला माहिती नाही 
सदरील मृतदेहाच्या विषयी मला माहिती नाही. मी या संदर्भात चकलांबा ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांशी बोलून माहिती घेतो, असे बीडचे पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी दैनिक alt147दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


जिल्हा रुग्णालय : शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देऊ शकतो, पत्र नाही 
शवगृहात ना वॉचमन ना कर्मचारी 
बीड जिल्हा रुग्णालयातील शवगृहाला बाहेरून लॉक अाहे. या शवगृहाच्या ठिकाणी वॉचमन अथवा कोणीच कर्मचारी दिसून आला नाही. त्याचबरोबर फलकही नाही. केवळ त्याला शटर आहे. गोदामासारखी अवस्था शवगृहाची झाली आहे. 

 

असे पत्र देता येत नाही 
मृतदेह अनोळखी असल्याने ओळख पटत नाही. चकलांबा पोलिसांनी आमच्याकडे सदरील व्यक्तीचा मृतदेह शवगृहात ठेवणे योग्य नसल्याचे पत्र द्यावे, अशी मागणी केली आहे, परंतु अशा प्रकाराचे पत्र देता येत नाही. मृतदेहाची विल्हेवाट लावणे पोलिसांचे काम आहे. आमचे काम केवळ मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणे आणि मृतदेह पोलिसांकडे देणे हे आहे. - सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी, बीड 
नगरसह पाथर्डी, शेवगाव ठाण्याशी संपर्क केला 


बीड जिल्हा रुग्णालयातील शवगृहात मृतदेह ठेवण्यायोग्य नाही, असे पत्र जिल्हा रुग्णालयाने द्यावे, अशी मागणी आम्ही केलेली नाही. या मालेगाव कालव्यात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळखच पटत नाही. आम्ही नगरसह पाथर्डी, शेवगाव स्थानिक गुन्हा शाखा अशा हद्दीवरील पोलिस ठाण्याशी वायरलेसवरून संपर्क केला आहे. नातेवाईक सापडून येत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे संपर्क करून माहिती मागवली आहे. दोन चार दिवसांत शेवटी अंत्यसंस्कार करण्यात येतील. - नितीन पगार पोलिस निरीक्षक, चकलांबा 

बातम्या आणखी आहेत...