Maharashtra Crime / अकोल्यात अवैधरित्या 'स्टेरॉइड इंजेक्शन' विकणाऱ्या जीमचे पितळं उघडे, छापेमारीत 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

युवकांनीच जागृत होऊन खोटे प्रोटिन व स्टेरॉइडचे इंजेक्शन टाळण्याची गरज आहे

दिव्य मराठी

Aug 12,2019 04:17:00 PM IST

अकोला- शहरातील जीममध्ये अवैधरीत्या स्टेरॉइड इंजेक्शनची सर्रास विक्री सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्टेरॉइड इंजेक्शनची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या अकोला सिव्हील लाईन्स रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वरमधील निवासस्थानी जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाचे शनिवारी रात्री छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणावरुन लाखो रुपयांचा आरोग्यास घातक स्टेरॉइड इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे, स्वप्नील कैलास गाडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. अवैधरित्या स्टेरॉइड विक्री प्रकरणी अटक करण्यात आले आहे.


खोलेश्वरचा रहिवासी सचिन ओमप्रकाश शर्माच्या मालकीचे सिव्हिल लाईन्स रोडवर सनी हेल्थ एंटरप्रायजेस आहे. ते खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाऱ्या युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्या विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेउन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाचवेळी छापेमारी केली. या छापेमारीत एका ठिकाणावरुन 36 हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या ठिकाणावरुन 55 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

इंजेक्शनमुळे होतात हे गंभीर परिणाम
स्टेरॉइडचे दुष्परिणाम भयंकर असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येतात, तर युवकांचे हाड ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रिय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे युवकांनीच जागृत होऊन अशा प्रकारचे प्रोटिन व स्टेरॉइडचे इंजेक्शन टाळण्याची गरज आहे.

X