बनावट स्वाक्षरी / भाजप आमदार संगीता ठोंबरे, त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा; बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप

सूतगिरणी संचालकाची बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप 

Sep 12,2019 08:35:00 AM IST

केज - भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती व लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीचे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांनी बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी केजच्या न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणी न्यायालयाने ठोंबरे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. केज तालुक्यातील लाडेगाव येथील गणपती सैनाप्पा ऊर्फ सोनाप्पा कांबळे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीचे संचालक आहेत.


सूतगिरणीच्या झालेल्या आर्थिक व्यवहारात संचालक म्हणून घेतलेली स्वाक्षरी ही आपण केली नसून सूतगिरणीचे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे व आमदार संगीता ठोंबरे यांनीच आपली बनावट स्वाक्षरी केली आहे. या आर्थिक व्यवहारात आपला संबंध नसल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गणपती कांबळे यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचे फॉरेन्सिक तज्ञ आश्विनी पवार यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

X