आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात मंगळसूत्र चोरणारा निघाला एसआरपीएफचा जवान, जुगार, सट्ट्याच्या व्यसनाने कर्जबाजारी झाल्याने सुरू केली चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातारा परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून मंगळसूत्र, चेन चोरणारा अखेर पोलिसांच्या हाती लागला. हा चोरटा साधासुधा नसून बीड बायपासवरील बटालियनमधील राज्य राखीव दलाचा (एसआरपीएफ) जवान निघाला. योगेश सुरेश शिगनारे (३३, मूळ रा. तेल्हारा, अकोला) असे त्याचे नाव आहे. २४ ऑगस्ट रोजी त्याने एका महिलेचे मंगळसूत्र पळवले होते. गुरुवारी तो रेणुकामाता मंदिर परिसरात फिरत असताना त्या महिलेने त्याला ओळखले आणि परिचयाच्या पोलिस मुख्य हवालदाराला माहिती दिली. त्यावरून सूत्रे हलली आणि त्याला अटक केली. जानेवारी २०१८ पासून सातारा परिसरात भरदिवसा २५ पेक्षा अधिक मंगळसूत्रे, सोन्याची चेन पळवण्याचे प्रकार घडले. पण चोरटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. 

 

सुरेखा राजेंद्र थाले (३८, रा. रेणुकापुरम, बीड बायपास) २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास साताऱ्यातील टेलिफोन कार्यालयासमोरून जात असताना चोरट्याने त्यांचे १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. त्या वेळी त्यांनी चोरटा डिस्कव्हर दुचाकीवर होता आणि त्याने काळे हेल्मेट घातले होते. तसेच त्याची अंगकाठीही लक्षात ठेवली होती. त्या गुरुवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेणुकामाता मंदिर परिसरातून जात असताना चोरटा (योगेश) त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी तत्काळ सातारा पोलिस ठाण्यातील मुख्य हवालदार तसेच उपनिरीक्षक चेतन ओगले यांना माहिती दिली.

 
काही मिनिटांतच ओगलेंसह उपनिरीक्षक रतन डोईफोडे, सहायक फौजदार एस. बी. सानप, जमादार मोहन चव्हाण, प्रदीप ससाणे, आसाराम मरकड, गुन्हे शाखेचे पोलिस नाईक राजेंद्र सोळुंके मंदिराजवळ पोहोचले. तेव्हाही योगेशच्या फेऱ्या सुरूच होत्या. यापूर्वीच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दुचाकीची नंबर प्लेट उलटी होती. योगेशच्या दुचाकीचीही नंबर प्लेट उलटी असल्याने पोलिसांचा संशय बळावला. विचारपूस केल्यावर त्याने ओळखपत्र दाखवले. पण पथकाने त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले आणि पोलिसी खाक्यानुसार निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी चौकशी केली. तेव्हा त्याने तीन मंगळसूत्रे चोरीची कबुली दिली. इतर चोऱ्याही त्यानेच केल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 


बसवर ड्यूटी असल्याने परिसर कळाला : सातारा बटालियनमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या बसवर योगेश नियुक्त होता. त्यामुळे त्याला सर्व रस्ते, निर्मनुष्य परिसर, कार्यालय, मंदिरात ये-जा करणाऱ्या महिलांच्या वेळा माहिती झाल्या होत्या. 


जुगार, सट्टा आणि कर्जबाजारीपणा : बारावी उत्तीर्ण योगेश २००७ मध्ये राज्य राखीव दलात रुजू झाला. त्याचे वडील निवृत्त शिक्षक असून तो पत्नी, दोन मुलांसह बटालियनमधील निवासस्थानांत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी त्याला जुगार, सट्ट्याचा नाद लागला. तो झाल्टा फाटा तसेच सिटी चौक परिसरात जुगार खेळायला जात असे. 
एक-दीड वर्षापासून तो ऑनलाइन जुगारात एका आकड्यावर ५० ते ७० हजार रुपये लावत होता. त्यासाठी त्याने काही जणांकडून व्याजावर पैसे शिवाय बँकेतून ४ लाखांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्याने मंगळसूत्र चोऱ्यांचा सपाटा लावला होता. त्याने जवाहरनगर परिसरातील व्यापाऱ्यांना एक मंगळसूत्र विकल्याची कबुली दिली. शिवाय काही सोने गोल्ड कंपनीत गहाण ठेवून रक्कम घेतल्याची कबुली दिली. 

 

तो बटालियनमध्ये जायचा 

कोणत्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवायचे हे निश्चित केल्यावर साप्ताहिक सुटीच्या दिवशी तो हेल्मेट घालून दुचाकीवर निघायचा. मंगळसूत्र हिसकावून थेट बटालियन परिसरात यायचा आणि पोलिस इतर ठिकाणीच चोरट्याचा शोध घ्यायचे. 

 

बातम्या वाचून कल्पना सुचली 
मंगळसूत्र चोरांना पोलिस कोणत्या माहितीच्या आधारावर पकडतात याच्या बातम्या योगेशने वृत्तपत्रांमध्ये वाचल्या होत्या. त्याचा बारकाईने अभ्यास केल्यावरच त्याला मंगळसूत्र चोरीची कल्पना सुचली होती. 

 

२०१५ मध्ये पहिली चोरी 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये त्याने पहिल्यांदा सातारा परिसरातील किराणा दुकानावर उभ्या महिलेचे मंगळसूत्र पळवले होते. तेव्हा आपण पकडले जाणार अशी त्याला भीती होती. पण सहा महिने काहीच झाले नाही. त्याने त्याची हिंमत वाढली. 

 

ओळखपत्र दाखवले होते 
दीड महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला संशयावरून अडवले होते. पण त्याने मी एसआरपीएफचा जवान आहे, असे सांगत ओळखपत्रही दाखवल्याने त्याला सोडण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...