आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादातून पोलिस कर्मचारी बापाने केला दोन सावत्र मुलांचा खून, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडल्या दोघांवरही गोळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - संपत्तीच्या वादातून पोलिस कर्मचारी असलेल्या बापाने त्याच्या दोन सावत्र मुलांची हत्या केल्याची घटना नाशिक शहरातील अश्वमेधनगरात घडली. शुक्रवारी दाेन वाजेच्या सुमारास त्याने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरमधून दोन्ही मुलांवर गोळीबार केला. एक मुलगा जीव वाचवण्यासाठी बाथरूमच्या दिशेने पळाला असताना त्याच्या पाठीत गोळी घातली. सुदैवाने, या घटनेत पत्नी, मुलगी आणि लहान मुलगा बचावले. तर, दोघांचा जीव घेणारा पोलिस कर्मचारी संजय भोये हा स्वत:हून पोलिसांना शरण आला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भोये हे उपनगर पोलिस ठाण्यात बीट मार्शल आहेत. मनीषा यांनी त्यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. मनीषा यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून अभिषेक (२५) आणि शुभम (२२) ही दोन मुले होती. तर, संजय भोये यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना मुलगी राधिका (१८), मुलगा राजू (१३) ही अपत्ये झाली. हे सर्वजण अश्वमेधनगरातील सोसायटीत एकत्र राहत होते.  मनीषा यांचे पहिले पती नंदकिशोर यांच्या नावाने राजमंदिर को-ऑप सोसायटी कर्णनगर येथे फ्लॅट आहे. काही दिवसांपासून सावत्र मुले अाणि वडील संजय भोये यांच्यामध्ये या फ्लॅटवरून वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात या संपत्तीचा विषय निघाला आणि त्यावरून सावत्र मुलांसोबत वाद सुरू झाले. वादाचे रूपांतर हणामारीत झाले. दरम्यान, संतप्त झालेल्या भोये यांनी थेट सर्व्हिस पिस्तूल काढत दोघांवरही रोखले. यात शुभमने प्रतिकार केला असता भोये यांनी पहिली गोळी झाडली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. त्यास आई मनीषा दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघाल्या. तितक्यात, दुसरा मुलगा अभिषेक हा जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन लपला. परंतु, संजयने त्याचा पाठलाग करत अभिषेकच्या पाठीत गोळी घातली. इतक्यावरच न थांबता त्याच्या छातीतही एक गोळी घातली. दरम्यान, लहान मुलगा राजू आणि मुलगी राधिका जीव वाचवण्यासाठी तत्काळ घराबाहेर पळाल्याने वाचले.  घटनेनंतर संशयित भोये हा स्वत:हून पंचवटी पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली असता हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट केले.
 

 

आईच्या सल्ल्याकडे दोघांचे दुर्लक्ष, गमावला जीव
भोये आणि दोन्ही मुलांत काही दिवसांपासून वाद सुरू होते. सावत्र पित्याला शिवीगाळ करणे, धक्काबुक्की आदी प्रकार रोज घडत होते. कुटुंबामध्ये नेहमी वाद सुरू होते. आई मनीषाने दोघांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारीसुद्धा आईने त्यांना बजावले होते. शिवाय, वादादरम्यानही त्या दोघांनाही शांत राहण्यास सातत्याने सांगत होत्या. परंंतु, दोघांनही  ऐकले नाही आणि त्यांना जीव गमवावा लागला.

बातम्या आणखी आहेत...