आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपअधीक्षकांच्या छळामुळे शिपायाने पोलिस ठाण्यातच विष घेतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मुखेड पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शुक्रवारी पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळी साडे अकराच्या सुमारास विष प्राशन केल्याची घटना घडली. या कर्मचाऱ्याला नांदेडला हलवण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून विष प्राशन केल्याचे या कर्मचाऱ्याने केला अाहे. 
मुखेड पोलिस ठाण्यामध्ये वार्षिक तपासणी होती. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे हे आले होते. सकाळी तपासणी झाल्यानंतर पोलिस कर्मचारी चंद्रकांत अांबेवार यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन वरिष्ठ अधिकारी मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे सांगत काही वेळ आरडाओरड केली. नंतर सोबत आणलेले विषारी द्रव्य पिले.  मात्र वेळीच कर्मचाऱ्यांनी ते द्रव्य त्याच्या हातातून हिसकावून घेतले. काही प्रमाणात   द्रव्य अांबेवार यांच्या पोटात गेले. त्यांच्यावर तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नंतर पुढील उपचारांसाठी नांदेडला हलवण्यात आले. 


शुक्रवारी सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांनी पो.नि. नरसिंग आकुसकर यांच्या उपस्थितीत पोलिस नायक चंद्रकांत आंबेवार यांना कक्षात बोलावून घेतले. महिलांच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणात एका महिलेला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पूर्वीच्या गुन्ह्यातही त्या महिलेला चौकशीसाठी  का बोलावले नाही, असा जाब सरवदे यांनी विचारला. त्यानंतर आंबेवार यांनी विष प्राशन करण्याचे पाऊल उचलले. 


उपचारादरम्यान आंबेवार यांनी सांगितले की, मागील एक वर्षापासून उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहेत. तसेच वेळोवेळी अपमानित करून माझे खच्चीकरण करण्याचे काम  होत आहे.  या त्रासाला कंटाळूनच मी विष प्राशन केले असल्याचे सांगितले. 
 

चौकशी करून योग्य कारवाई करू
या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव म्हणाले की, पोलिस उपअधीक्षक सकाळी शिट लिहिण्याचे काम करीत होते. त्यावेळी त्यांच्यात आणि पोलिस कर्मचाऱ्यात वाद झाला. त्यातून हा प्रकार घडला. त्याने काही आरोपही केले. अपर पोलिस अधीक्षक तिकडे गेले आहेत. त्याच्या चौकशीनंतर योग्य कारवाई करू, असेही संजय जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...