Crime / रक्तरंजित बहिणीला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला युवक, पोलिसांनी तक्रार न घेताच हकलून लावले

रक्तात माखलेल्या या भाऊ-बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 06:28:00 PM IST

लखनऊ - रक्तात माखलेल्या भाऊ आणि बहिणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आपल्या बहिणीला घेऊन पोलिस स्टेशनला पोहोचला. त्याच्या घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला करण्यात आला होता. दोघेही गंभीर जखमी होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेणे तर दूरच उलट पोलिस स्टेशनच्या बाहेरूनच हकलून लावले. हात जोडून एफआयआर लिहिण्याची विनंती केली तेव्हा स्वतःच एफआयआर लिहून आण असे आदेश बजावले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या राजधानातील इटौंजा परिसरात घडली आहे.


व्हायरल व्हिडिओनंतर एसपी कार्यालयात गेले प्रकरण
लखनऊच्या इटौंजी येथे राहणारा मोहंमद शाहरुख नावाचा एक युवक अचानक पोलिस स्टेशनला पोहोचला. फेसबूकवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये युवकासोबत त्याची बहीण देखील होती. दोघांच्याही डोके, खांदे आणि गळ्यावरून रक्त वाहत होते. बहीणीला नीट उभे देखील राहता येत नव्हते. पोलिस स्टेशनला आलेला हा युवक वारंवार पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करत होता. एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, शाहरुखच्या घरावर अचानक एका टोळक्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याची बहीण, तो स्वतः आणि कुटुंबाचे इतर सदस्य जखमी झाले. कुणीतरी माझ्यासोबत घरी या आणि परिस्थिती पाहा, माझी तक्रार नोंदवून घ्या अशा विनवण्या तो करत होता. परंतु, पोलिस स्टेशनमध्ये तैनात कर्मचाऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेणे तर दूर त्यांना हातही लावला नाही. उलट आधी मेडिकल टेस्ट करून ये आणि स्वतः एफआयआर लिहून आण असे आदेश दिले. या प्रकरणाची पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली. तसेच संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारीविरुद्ध तत्काळ चौकशीचे आदेश दिले.

X
COMMENT