आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी शोधला वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा पॅटर्न, ठरावीक कंपन्याच टार्गेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद / वाळूज- मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी वाळूज एमआयडीसीत टोळक्यांनी केलेल्या तोडफोडीचा ठरावीक पॅटर्न पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या टोळक्यांनी ठरावीक कंपन्यांनाच टार्गेट केले. पोलिसांनी आतापर्यंत २८ कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्याचा अभ्यास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या ३६ संशयितांच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपवरील अकाउंटसह कौटुंबिक आणि मित्रपरिवाराचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. अटक केलेल्या तरुणांचा कुठल्या एका गटाशी संबंध आहे काय, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. 


अटकेतील सर्व संशयितांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस त्यांच्या चौकशीतून त्यांच्या साथीदाराची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. बंदच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिअो आणि एका काळ्या रंगाच्या बुलेटवरुन तोडफोड करणाऱ्या युवकांना चिथावणी देण्याचे काम सुरु होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन गाड्या कोणाच्या आहेत, त्या गाड्यांचे क्रमांक काय हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. तोडफोड करणाऱ्यांचे ठराविक गट असल्याचे समोर आले असून अनेक संशयित मुले पुन्हा पुन्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोटे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. 


३६ जणांना अटक : 
आतापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ३६ संशयितांना अटक केली. यातील २३ लोक मराठा समाजाचे आहेत तर १३ लोक इतर समाजाचे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. मदन कचरू गवळी (२४,रा.रांजणगाव शेणपुंजी),प्रभाकर विठ्ठल साळुंके (३८,रा.हनुमाननगर, कमळापूर), सोपान बबन बुरजे (२५,रा.दत्तनगर,रांजणगाव शेणपुंजी), निवृत्ती इलबा पवार (२९,रा.ठाकरे चौक, बजाजनगर), रवींद्र हरिभाऊ शेटे (२२, ठाकरे चौक, बजाजनगर), बाळू सुभाष पेंडगे (२५, बकवालनगर, वाळूज), सोमनाथ उत्तम सुरासे (२४, इंद्रप्रस्थ काॅलनी,बजाजनगर), निकेश परसराम बाबर (२२ रा.आरएक्स ४/८ बजाजनगर), सुदर्शन बिभीषण काळे (२५, रा. अयोध्यानगर,बजाजनगर), आनंद विजय हुडेकर (२५,रा.रोजबर्ड शाळेसमोर सिडको वाळूज महानगर-१) मंगेश बाळू उदार (२२,रा.एन-१२ टीव्ही सेंटर, हडको औरंगाबाद), बळीराम संतराम गायकवाड (४३,रा.आरएम ९३ बजाजनगर), सूरज आप्पासाहेब जाधव (२५,रा.आरएच ५६ बजाजनगर), गजानन माधवराव चोरमारे (३७, रा. इंद्रप्रस्थ काॅलनी बजाजनगर), रामेश्वर महादेव वानखेडे (२३ रा.जागृत हनुमान मंदिराच्या मागे, बजाजनगर), संतोष सुनील डुकरे (२५, रा. आरएच ११७/२ बजाजनगर), अक्षय कृष्णदेव गायकवाड (२२, रा. आरएम ९७/७ बजाजनगर), सूरज रामकृष्ण साळुंके (१७,रा. छत्रपतीनगर रांजणगाव), गोविंद भगवान देशमुख (२२, रा.मंगलमूर्ती काॅलनी, रांजणगाव), ओम माधवराव जाधव (१९, रा. गाडेकरनगर, रांजणगाव), रवी बाळू पठारे (१६, रा.शिवनेरी काॅलनी, रांजणगाव), रवी जगन्नाथ कानडे (१७, रा.भाजीमंडी मेनरोड, रांजणगाव), सतीश भाऊसाहेब शिंदे (२५,रा.आरएम-२३० जयभवानी चौक, बजाजनगर), सचिन शंकर सुकने (२३, रा.शिवनेरी काॅलनी, रांजणगाव), शंकर रामप्रसाद चरखा (१८, रा.छत्रपतीनगर, रांजणगाव), आदित्य देविदास लेगरे (१६, रा.छत्रपतीनगर, रांजणगाव), आदेश सुरेश धोंगडे (१९, रा.ऋषीकेशनगर, रांजणगाव), रंजीत संजय चव्हाण (१९, रा. दत्तनगर, रांजणगाव), गजानन राजाराम पाटील (२६, रा. लोकमान्य चौक, बजाजनगर), दत्तात्रय माणिकराव घायट (२०, रा.दत्तनगर, रांजणगाव), योगेश दीपक झोरेकर (२१, रा.नुराणी मशीदच्या बाजूला, रांजणगाव), गोविंद वीरभद्र जाधव (३९, रा.छत्रपतीनगर, वडगाव कोल्हाटी), विठ्ठल सुरेश मुळे (२१, रा.शक्ती हाॅटेल प्रताप चौक, बजाजनगर), गणेश भरत गायकवाड (१७, रा. शक्ती हाॅटेल प्रताप चौक, बजाजनगर), राहुल संजय पवार (१८, रा.छत्रपतीनगर, रांजणगाव), कल्याण कारभारी आग्रे (२२, रा.हाॅटेल ओमसाई वाळूज महानगर) 


तोडफोडीचे नेमके कारण काय? 
तोडफोड करणारे तरुण आंदोलनातील होते की आंदोलनाचा आधार घेत तोडफोड करण्याच्या उद्देशाने गर्दीत घुसले होते, याचा तपास पथके करीत आहेत. हा कट पूर्वनियोजित होता. दरम्यान, यामागे काही ठरावीक संघटना असल्याचा आरोप उद्योजकांच्या संघटनांनी केला आहे. तोडफोडीच्या पाठीमागचे नेमके कारण काय या निष्कर्षाप्रत अजून पोलिस पोहोचलेले नाहीत. मात्र तसे काही पुरावे पुढे आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार ४९ कंपन्यांचे ६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पंचनाम्याचे आणि गुन्हा नोंदवण्याचे काम अजून सुरू आहे. 


शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांना भेटले 
कंपन्यांमध्ये धुडगूस घालून नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करावी. या घटनेमुळे उद्योजक भयभीत झाले आहेत. त्यांना सुरक्षितता वाटण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शिष्टमंडळाने रविवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन केली. वाळूजच्या विविध चौकांतील वाइन शॉप, अवैध देशी दारू विक्रीमुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याची तक्रारही खैरेंनी केली. या वेळी आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, बाप्पा दळवी, संतोष माने, राजू वैद्य, विकास जैन यांची उपस्थिती होती. 


माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणार 
९ ऑगस्ट रोजीच्या तोडफोडीबाबत काहीही माहिती असल्यास ती पोलिसांपासून लपवू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. ९८२३५८६१९० या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही माहिती देता येईल, असे साबळे म्हणाले. 


अलाना आणि काॅस्मोवरही दगडफेक 
बंदच्या दिवशी पैठण रोडवरील फ्रिगोरी पिको अलाना ही कंपनी फोडण्याचाही प्रयत्न झाला. कंपनीच्या तीन नंबरच्या गेटवर सकाळी सातच्या सुमारास ३० ते ३५ लोक आले. त्यांनी दगडफेक करत लाइट आणि सिक्युरिटीची केबिन फोडल्याची फिर्याद सुरक्षा रक्षक सय्यद जावेद सय्यद चांद यांनी दिली आहे, तर शेंद्रा एमआयडीसीतील कॉस्मो फिल्मचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. कंपनीत कामगार असल्यामुळे जमावाला फारसा धुडगूस घालता आला नाही, असे कंपनीचे एचआर व्यवस्थापक अतुल चामणीकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. चिकलठाणा पोलिसांत अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...