आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पोलिसांचा गोळीबार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर- मंगळवारी सकाळी साडेअकराची वेळ... संपूर्ण शहर आपल्या कामात व्यस्त असताना माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिराजवळ काही तरुण आंदोलक शेतकरी जमले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत पोलिसांवर कांदे फेेकले.

 

पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला, त्यात एक आंदोलक गंभीर जखमी झाला. परंतु हे सर्व घडत असताना आजूबाजूचे लोक मात्र हसत होते. कारण ही काही खरीखुरी दंगल नव्हती, तर दंगल काबू पथकातील पोलिसांनी केलेले प्रात्यक्षिक होते. 


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सकाळी माळीवाडा व तेलीखुंट परिसरात दंगल काबू योजनेंतर्गत प्रात्यक्षिक सादर केले. कोतवालीचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे फौजफाट्यासह माळीवाड्यातील विशाल गणपती मंिदराजवळ दाखल झाले. या वेळी कांद्याला हमी भाव देण्याची मागणी करणारे तरुण शेतकरी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले होते. त्यात डीजेला परवानगी देण्याची मागणी करणारे तरुणही तेथे आले. आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

परंतु ते एेकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी घोषणाबाजी करत टायर जाळले. पोलिसांनी सुरुवातीला सौम्य लाठीमार केला. परंतु आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. घटनेची माहिती पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना देण्यात आली. ते देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

 

त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात एक आंदोलक जखमी झाला, त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गोळीबारानंतर मात्र जमाव पांगला, त्यानंतर जमावाने तेलीखुंट परिसरात दगडफेक सुरू केली. तेथेही तत्काळ अॅन्टी राॅईट सूट परिधान केलेले पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिसांनी लाठीमार करत तसेच हवेत गोळीबार करत आंदोलकांना ताब्यात घेतले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती. बघ्यांसह आंदोलकही हसत होते. कारण ही खरीखुरी दंगल नव्हती, तर ते दंगा काबू पथकाचे एक प्रात्यक्षिक होते. परंतु रंगीत तालीम असली तरी प्रथम दर्शनी हे खरेखरेच वाटत होते. 

 


शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोतवाली पोलिसांनी टायर जाळणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. 


'अन्टी राॅईट सूट'चा वापर 
दंगेखोरांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने हायटेक 'अॅन्टी रॉईट सूट'ची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे राज्य राखीव दलानंतर हे सूट राज्यात केवळ नगर पोलिसांकडेच आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या पुढाकारातून हे सूट खरेदी करण्यात आले आहेत. पॉलिफायबरपासून तयार केलेल्या या सूटवर दगड, काठी, अॅसिड, तसेच तलवार, चाकूसारख्या शस्त्रांनी वार केले, तरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास कोणतीच इजा होत नाही. दरम्यान, रंगीत तालमीतून त्याचे महत्त्व समजले. 


७५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा 
माळीवाडा व तेलीखुंट परिसरात दंगल काबू योजना राबवण्यात आली. सुमारे ७५ पोलिस कर्मचाऱ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दगंल नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, त्या सर्व आम्ही प्रात्यक्षिक सादर करताना केल्या. अशी घटना घडल्यास पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचवून दंगल नियंत्रणात आणतील.'' नितीनकुमार गोकावे, निरीक्षक, कोतवाली पोलिस स्टेशन

बातम्या आणखी आहेत...