आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सोमवार 25 मार्च रोजी बीड शहरात रॅली काढून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेसाठी बीडच्या जिल्हा पोलिस उपअधीक्षकांकडे आम्ही 19 मार्च रोजी अर्ज देऊन सभेची परवानगी मागितली होती. परंतु आम्हाला 21 मार्चला सभेची परवानगी देण्यात आली. पोलिस व जिल्हा प्रशासन भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे. तर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून 25 मार्च 2019 च्या रॅली व सभेसाठी परवानगी मागणारा अर्ज 19 मार्च रोजी आला होता. त्यामुळे त्यांना शहरातील बागलाने मैदान महिला महाविद्यालय येथे दुपारी 2 ते 5 या वेळेत सभा घेण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. परंतु त्यांना पारस मैदान ही जागा पाहिजे होती, असे जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. पोलिसांनी पाहिजे ते सभास्थळ दिले नसल्याने बीडमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसवर सभा पुढे ढकलण्याची वेळ आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ 25 मार्च 2019 रोजी दुपारी दोन वाजता बागलाने मैदान महिला महाविद्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यांची परवानगी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 19 मार्च 2019 रोजी पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्याकडे केला होता. परंतु सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 25 मार्च 2019 रोजी होणाऱ्या रॅली व सभेची परवानगी 21 मार्च रोजी दिली असा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमध्ये पत्रकार परिषदेत केला. एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी 10 ते 5 ही वेळ रॅली व सभेसाठी देण्यात आली असेल तर दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाला रॅली व सभेसाठी त्याच दिवशी कशी परवानगी देण्यात येते, असा सवाल उपस्थित करत मुंडे म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बशीरगंज रोड व माने कॉम्पलेक्स अशा दोन ठिकाणी सभेसाठी परवानगी मागितली होती. आमची रॅली सकाळी अकरा वाजता निघून दुपारी दोन वाजता सभा सुरू होऊन साडेतीन वाजता सभा संपणार होती. परंतु सदरील दोन ठिकाणी आम्हाला सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही. अगोदर आम्ही माने कॉम्पलेक्स पारस मैदानाची मागणी केली होती. ती पोलिसांनी दिली नाही. पोलिस अधीक्षक व प्रशासन सत्ता पक्षाचे जणू कार्यकर्ते आहेत, अशा दबावाखाली येऊन काम करत आहेत. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या सारख्या मोठ्या सभा भाजप घेऊ शकत नाही. कारण त्यांना तशा सभा घ्यायच्या असतील तर त्यांच्या 10 पिढ्या जातील, असेही मुंडे म्हणाले.
अचानक परवानगी दिली
आम्ही बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बशीरगंज रोड व माने कॉम्प्लेक्स मैदान या दोन ठिकाणी सभेची परवानगी मिळावी म्हणून पोलिसांकडे मागणी केली होती. परंतु आम्हाला बागलाने चौकात परवानगी देण्यात आली.आम्ही शेवटी उन्हामुळे ही सभा पुढे ढकलली आहे . हा प्रकार अन्यायकारक असून पोलिस प्रशासन मस्तीत वागत आहे. त्यामुळे आम्ही पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्याकडे सभेसाठी १९ मार्च २०१९ रोजी अर्ज आला होता. आम्ही २५ मार्च रोजी होणाऱ्या रॅली व सभेसाठी त्यांना त्याच दिवशी परवानगी दिली. त्यांना शहरातील माने कॉम्प्लेक्स हे सभास्थळ पाहिजे होते. त्यामुळे सभेची परवानगी दिली असताना ती नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जी.श्रीधर, पोलिस अधीक्षक बीड
सभास्थळे एकाच मार्गावर
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स आणि बागलाने मैदान ही दोन्ही सभास्थळे एकाच मार्गावर असून पोलिसांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला सभेच्या वेळा देताना त्या बदलल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला बागलाने मैदान महिला महाविद्यालय बीड येथे सभेसाठी दुपारी 2 ते 5 ची वेळ देण्यात आली हाेती तर भाजपला माने कॉम्प्लेक्स मैदानावर संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ ही वेळ देण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.