आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- शहरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात अंडापावच्या गाड्या, भररस्त्यावर दारू पित बसलेल्या सुमारे ६० तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली. यात बिअरशॉपीचा मालक असलेल्या एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. कारवाई करून पोलिसांनी या तळीरामांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता बदली झालेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे ड्यूटीवर येऊन यातील अनेक तळीरामांना 'नो अल्काेहोल'चे प्रमाणपत्र दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ राेहन यांच्या मार्गदर्शनात पांडे चौकातून कारवाईस सुरुवात करण्यात आली. रात्री ११ वाजेपर्यंत एकूण २८ तळीरामांना जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्यात आणले होते. यानंतर एमआयडीसी, रामानंदनगर पोलिसांनीदेखील कारवाई सुरू केली.
रात्रभरातून सुमारे ६० पेक्षा जास्त मद्यपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय अंडापावच्या हातगाड्याही जप्त केल्या. दारू पिऊन दुचाकी, चारचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. यातील काही तळीरामांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. याठिकाणी डॉ. दिनेश खेताडे यांनी तळीरामांची तपासणी करून अनेकांना 'नो अल्काेहोल'चे प्रमाणपत्र दिले. विशेष म्हणजे डॉ.खेताडे यांची यावल येथे बदली झाली असून त्यांना जळगावातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
तरीदेखील ते बेकायदेशीरपणे रुग्णालयात येऊन तपासणी करीत असल्याचा खळबळजनक प्रकार यातून समोर आला. सोमवारी रात्री डॉ.अजय सोनवणे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून ड्यूटी होती; परंतु डॉ.सोनवणे यांच्याऐवजी डॉ.खेताडे ड्यूटी करीत होते. पोलिसांनी तपासणीसाठी आणलेल्या अनेक मद्यपींशी डॉ.खेताडे यांची ओळख होती. काहीजणांना ते नावानिशी ओळखत होते. डॉ.खेताडे यांनी अर्ध्या, एका मिनिटांत एकेक तळीरामाची तपासणी करून त्यांना 'नो अल्काेहोल'चे प्रमाणपत्र दिले. त्यातील काहीजण दारू पिलेले असल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे असतानाही डॉ.खेताडे यांनी केलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनीदेखील नाराजी व्यक्त केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा भोंगळ कारभारदेखील चव्हाट्यावर आला. त्यामुळे मंगळवारी सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये डॉ.खेताडे यांनी केलेल्या प्रकाराची चर्चा झाली.
रात्र काढली पोलिस ठाण्यात : पोलिसांनी कारवाई करून पकडून आणलेल्या तळीरामांना संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आले. या तळीरामांना सोमवारची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागली. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्यांची मुक्तता करण्यात आली. माजी नगरसेवक अजय पाटील यांची बिअरशॉपीचे दुकान असून दुकानाबाहेर तळीराम उघड्यावर दारू पित असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाटील यांनादेखील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले होते. त्यांनी न्यायालयात गुन्हा अमान्य केल्यामुळे पुढील सुनावणी होणार आहे
मद्यपींच्या रक्ताचे नमुने घेतले
कारवाई केलेल्या मद्यपींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतून नमुने तपासून आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. मद्यपींकडून दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध धंद्यांवरील कारवाईची माेहीम अधिक तीव्र करण्यात येईल. -डाॅ. निलाभ रोहन, पोलिस उपअधीक्षक
अजिंठा चाैकात अंडापावच्या गाडीवर दारूविक्री, दाेघांवर गुन्हा दाखल
जळगाव । महामार्गावर अजिंठा चाैकातील अंडापावच्या गाडीवर विनापरवाना दारु बाळगणाऱ्या दाेघांवर पाेलिसांनी कारवाई केली. एमअायडीसी पाेलिस ठाण्यात त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नाेंदवण्यात अाला. सहायक पाेलिस अधीक्षक निलाभ राेहन हे शासकीय वाहनाने मंगळवारी रात्री अाठ वाजता शहरात पेट्राेलिंग करीत असताना त्यांना रस्त्यावर दारु विक्री हाेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी साेबत असलेल्या रवींद्र माेतीराया व सुनील पाटील या दाेघा पाेलिस काॅन्स्टेबलना एमअायडीसी पाेलिस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना अजिंठा चाैकात अवैध दारुबाबत कारवाईसाठी बाेलावून घेतले.
त्यांनी एमअायडीसी पाेलिस ठाण्याला फाेन केल्यानुसार अतुल वंजारी, मुदस्सर काझी व किशाेर पाटील हे तिघे कर्मचारी दाेन पंचांना साेबत घेऊन रात्री सव्वा अाठ वाजता अजिंठा चाैकात अाले. महाराजा हाॅटेल समाेरील एका अंडापावच्या गाडीजवळ मनाेज सुधाकर काळे व नितीन चंद्रकांत पाटील (दाेघे रा. विठ्ठलपेठ) या दाेघांजवळ विदेशी दारुच्या बाटल्या अाढळून अाल्या. त्यांना विचरणा केली असता त्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर पंचासमाेर या दारु बाटल्यांचा पंचनामा करून करून त्या दाेघांना एमअायडीसी पाेलिस ठाण्यात हजर करून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.