आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला तक्रार देण्यास विरोध करत पोलिसाचा चंदनझिरा पोलिस ठाण्यात गोंधळ; महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना  - जुन्या वादाच्या कारणावरून पोलिसाने इतर चार ते पाच जणांच्या मदतीने एका महिलेच्या घरावर पेट्राेल टाकून घर जाळत साडेचार लाख रुपयांचे नुकसान केले. यानंतर ती महिला तक्रार देण्यासाठी गेली असल्याचे समजताच त्या पोलिसासह त्याच्या सोबतच्या महिलेने ठाण्यात जाऊन खोटे गुन्हे दाखल करता, असे म्हणत गोंधळ घातल्याची घटना जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. संजय कटके असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बोंडले यांनी दिली. 


या घटनेची माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील पद्मावतीनगरमधील शिल्पा राधेशाम यादव यांची दुचाकी जुन्या कारणावरुन संजय कटके, शाम (पूर्ण नाव माहिती नाही) एक महिला व चार ते पाच जणांनी घरात कोणी येऊ नये या कारणावरुन धमक्या देऊन पेट्रोल टाकून घरास आग लावून नुकसान केले होते. या प्रकरणात ती महिला सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. ही महिला तक्रार देण्यासाठी आल्याची माहिती कटके याला मिळताच तो एका महिलेसह ठाण्यात आला. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करता का, असे म्हणत कटके याने मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ केली. यानंतर त्याच्यासोबतच्या महिलेने सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर मारोती भंडलकर यांच्या अंगावर धावून गेले. तिला समजावून सांगत असताना काही एक न एेकता पोलिस ठाण्यात गाेंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भंडलकर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बोंडले हे करीत आहेत. 


सीसीटीव्ही  जप्त : या प्रकरणाची चौकशी सुरू असून न्यायालयात पुरावे देण्यासाठी ठाण्यात सीसीटीव्ही जप्त करण्यात आले. त्याचे फुटेज तपासून न्यायालयात ते सादर केले जाणार आहेत.

 

दोन्ही आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी 
जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर तत्काळ दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
- श्यामसुंदर कोठाळे, पोलिस निरीक्षक, चंदनझिरा, जालना.