आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी वर्दीतील देव माणूस हरपला! पोलिस निरीक्षक गिरीश पाटील यांचे ‍नाशिक येथे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- शहर पोलिस स्टेशन येथून नुकतेच नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये बदली होऊन गेलेले पोलिस निरीक्षक गिरीश पाटील यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

 

मूळचे मारवाड (ता.अमळनेर) येथील रहिवासी पोलिस निरीक्षक गिरीश पाटील नंदुरबार येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांची बदली शहर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. गुन्हेगारांमध्ये त्यांच्या मोठा वचक होता. नंदुरबार जिल्ह्यात ज्या ज्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता त्याप्रसंगी गिरीश पाटील सर्वप्रथम फौजफाट्यासह पोहोचत होते. दोन ते अडीच वर्षापूर्वी नंदुरबारात दंगल झाली होती. त्या दंगलीत जखमी झालेले असतानाही जीवाची पर्वा न करता गिरीश पाटील यांनी दंगलखोरांना हुसकावून लावले होते. नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. त्यात गिरीश पाटील यांचाही समावेश होता. परंतु त्यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाल्याने त्यांना नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील काही दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर शुक्रवारी (ता.15) त्यांची प्राणज्योत मालविली.

 

गिरीश पाटील यांच्या अचानक जाण्याने खाकी वर्दीतील देव माणूस हरपल्याचे दुःख अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी चार वाजता अमळनेर तालुक्यातील मारवाड येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...