आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड रिंधाशी साटेलाेटे, मंगरूळपीरचा पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे याला बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनाेद दिघाेरे, पाेलिस निरीक्षक - Divya Marathi
विनाेद दिघाेरे, पाेलिस निरीक्षक

नांदेड : शहरात व्यापाऱ्यांकडून खंडणी गाेळा करण्यासाठी अापल्या टाेळीतील गुंडाकरवी गाेळीबार करत अनेकांना जखमी वा ठार करणारा कुख्यात गुंड रिंधा याच्याशी साटेलाेटे केल्याप्रकरणी नांदेड पाेलिसांनी मंगरूळपीर (जि. वाशिम) येथील पाेलिस निरीक्षक विनाेद दिघाेरे यास अटक केली अाहे. कुख्यात रिंधावर नांदेड-पंजाब पोलिसांनी ११ लाखाचे बक्षीस जाहीर केलेले अाहे. दिघोरे याच्या अटकेच्या वृत्तास जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीही दुजोरा दिला आहे.

आंतरराज्यीय कुख्यात गुंड म्हणून अाेळख असलेला हरविंदरसिंघ उर्फ रिंधा हा खंडणीसाठी व्यापारी व प्रतिष्ठितांचे खून, अपहरण करत हाेता. गेल्या अनेक वर्षापासून ताे पंजाब, हरियाणा अाणि महाराष्ट्र पोलिसांना हवा अाहे. रिंधाने नांदेडला बस्तान बसवले असून ताे सध्या फरार आहे. पंजाब पोलिसांत रिंधावर खून, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल अाहेत. रिंधाच्या डाेक्यावर पंजाब पोलिसांनी ११ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. नांदेडमधील अनेक ठाण्यात रिंधावर खून व खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद अाहे. त्याला माेक्काही लावण्यात अाला अाहे. मात्र ताे भूमिगत राहून अापल्या कारवाया करताे. व्यापारी, राजकारणी अाणि प्रतिष्ठित लाेकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवणे, अापल्या गुंडांमार्फत सुपारी घेणे असे प्रकार तो करतो. नांदेड येथील तांडा हॉटेलचे मालक सुरेश राठोड व व्यापारी पाटणी, काँग्रेसचे पदाधिकारी गोविंद कोकुलवार यांच्यावर खंडणीसाठी रिंधाच्या टोळीने गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील व्यापारी, डॉक्टरांत दहशत पसरली होती. जुन्या नांदेड इतवारा भागात राहणारे काँग्रेसचे पदाधिकारी गोविंद कोकूलवार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात रिंधा टोळीतील सहा जणांच्या नांदेड पोलिसांनी मुसक्याही आवळल्या आहेत. गोविंद कोकूलवार हल्ला प्रकरणात पोलिसांनी काँग्रेसचा कार्यकर्ता वीरेंद्र भंडारी यालाही अटक करून त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. भंडारी सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याने दिलेल्या कबुली जबाबावरून दिघोरे याच्याविरुद्ध कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

दिघोरेविरुद्ध धागेदोरे सापडले

कुख्यात गुंड रिंधा टोळीशी संबंध असलेल्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. नांदेड एलसीबीचा तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे याचेही रिंधा टोळीशी धागेदोरे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही पुरावे सापडल्यामुळे त्यांनी दिघोरेवर लक्ष केंद्रित केले होते. दिघोरे सध्या वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याला नांदेड पोलिसांनी मंगरूळपीरमधून ताब्यात घेतले. या वृत्ताला नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक मगर यांनी दुजोरा दिला आहे.

एलसीबीचा होता इन्चार्ज

विनोद दिघोरे हा आठ महिन्यांपूर्वी नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेत इन्चार्ज होता. त्याला सहायक पोलिस निरीक्षक पदावरून पदोन्नतीवर मंगरुळपीर पोलिस ठाण्याचा निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. कोकुलवार हल्ला प्रकरणात अटक झालेल्या वीरेंद्र भंडारी याच्यानंतर नांदेड पोलिसांनी पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यालाही अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक दिघोरला अटक

तत्कालीन नांदेड एलसीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि सध्या मंगरूळपीर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे याचा या प्रकरणाशी संबंध स्पष्ट झाला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या हाती काही पुरावे लागले आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का? याचा तपास सुरु आहे. शहरात दहशत माजवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. विजयकुमार मगर, जिल्हा पोलिस अधीक्षक

आणखीही काही अधिकारी, कर्मचारी रडावर

कुख्यात गुंड रिंधा टोळीला मदत करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच कांही व्यापाऱ्यांची नावे समोर आली असून यातील काही जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आणखीही काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. गेल्या कांही दिवसांत रिंधा टोळीने शहरात खंडणी वसुलीची मोहीम उघडून दहशत पसरवली आहे. कुख्यात गुंड रिंधा हा फरार असला तरी त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...