Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Police investigation is complete in Pratik Shivran Murder case in Mangalvedha

प्रतीकचे रक्त काढून सिद्धेश्वर मंदिरासमोरच दिला बळी; साेलापूरमध्ये झाले होते बालकाचे अपहरण 

प्रतिनिधी | Update - Jan 13, 2019, 09:18 AM IST

दीर्घकालीन आजारातून बरे व्हावे व धनप्राप्ती व्हावी या कारणासाठी आरोपीने बालकाचे अपहरण केले होते.

  • Police investigation is complete in Pratik Shivran Murder case in Mangalvedha

    सोलापूर- राज्यभर गाजलेल्या माचनूर (ता. मंगळवेढा) येथील प्रतीक मधुकर शिवशरण (९) या मुलाचा खून हा नरबळी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. प्रतीकचे रक्त काढून माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरच बळी दिला. पूजा केली. रेड्याचा बळी देणाऱ्यानेच हा नरबळीचा विधी पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. तसे पुरावे मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    या प्रकरणात दामाजी कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब पिराजी डोके याला शुक्रवारी अटक झाली होती. त्यास पॅरालिसिससारखा आजार आहे. त्याच्या कुटुंबीयांतील इतर सदस्यही या दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. धार्मिक विधीसाठी तो कोल्हापूर, अक्कलकोट, तुळजापूर, सांगली येथे जात होता. दीर्घकालीन आजारातून बरे व्हावे व धनप्राप्ती व्हावी या कारणासाठी मांत्रिक कामे करणाऱ्या भारत दगडू शिवशरण व त्याच्या अल्पवयीन मुलाद्वारे हा नरबळी देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. भारत शिवशरण आणि त्याच्या मुलास यापूर्वीच अटक झाली आहे.

    प्रतीकचे अपहरण झाल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसांत २८ ऑक्टोबर रोजी दाखल झाली होती. चार दिवसांनी माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी उसाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला होता, तर नदीपात्राकडे घाटाच्या पायरीवर जळालेले कापड, अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे सापडले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ते जाळल्याचे पोलिसांनी सांगितले होते. नरबळी व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.

Trending