आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी पोलिसांनी सुरू केले महाट्रॅफिक ॲप, आता नागरिकही चलन फाडू शकणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली - राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस विभागाने आता महा ट्रॅफिक ॲप सुरू केले आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांचे छायाचित्र काढून अपलोड केल्यास संबंधित वाहनचालकांना दंड ठोठावला जाणार आहे. पोलिस विभागाच्या या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नागरिकही आता मदत करू शकणार आहेत. राज्यांमध्ये बहुतांश शहरातून ट्रॅफिक जामचे प्रकार वाढत आहेत. शहरी भागांमधून दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्किंग झोन मध्ये वाहने उभी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठी आहे. या सोबतच तीन सिट बसवून दुचाकी चालवणे, चार चाकी वाहनांमध्ये बेल्ट न घालता वाहन चालवणे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक वेळा मोठे अपघातही होऊ लागले आहेत. त्यातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासोबतच वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी संबंधित शहरातील वाहतूक शाखेला मोठी धावाधाव करावी लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता पोलिस विभागाने महा ट्रॅफिक ॲप सुरू केले आहे. नागरिकांना त्यांच्या अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.  वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास  वाहनचालकाचे तसेच वाहनाचे छायाचित्र मोबाइलवर काढून अॅपवर अपलोड केल्यानंतर हे छायाचित्र थेट संबंधित जिल्ह्यातील वाहतूक शाखेच्या संगणकावर दिसणार आहे. त्यानंतर वाहतूक शाखेकडून वाहन चालकाने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले त्यासाठी किती रुपयांचा दंड आहे याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना टपालामार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंडाची नोटीस पाठवली जाणार आहे. पंधरा दिवसात वाहनचालकाने दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या यामुळे आता. नागरिक देखील या ॲपच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास हातभार लाऊ शकणार आहेत. त्यातून वाहतूक शाखेची धावाधाव ही थांबणार आहे. यासोबतच ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे व ज्या वाहनामुळे वाहतूक ठप्प झाली त्या वाहनाचे छायाचित्र या ॲपद्वारे पाठवल्यास तातडीने वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार आहेत. यामुळे पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

नागरिकांनी हे उपयुक्त अॅप डाऊनलोड करावे

लातूर - एखाद्या ठिकाणी अपघात झाला, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकलेले असेल, रस्त्यावर अपघाताला कारणीभूत  साहित्य टाकलेले असेल, रस्त्यावर झाडे पडलेले असेल, वाहतुकीची कोंडी झालेली असेल तर हे फोटो या अॅपवर टाकले तर त्यावर कारवाई होणार. नागरिकांनी या अॅप वर आपला वाहन क्रमांक नोंदवला तर त्यावर काही दंड आहे का याची माहिती मिळेल, दंड भरता येईल, मदत मागता येईल. त्यामुळे नागरिकांनी हे उपयुक्त अॅप डाऊनलोड करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांनी केले.

नागरिकांनी सहकार्य करावे 


राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या मोबाइलवर सदर ॲप डाऊनलोड करावे ज्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असेल असे आढळून आल्यास तातडीने छायाचित्र पाठवावीत. तसेच वाहतूक व्यवस्था ठप्प करणाऱ्या वाहनांचीही छायाचित्रे पाठवावीत त्यामुळे तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. - ओमकांत चिंचोलकर, सहायक पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा हिंगोली.

बातम्या आणखी आहेत...