आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळेश्वरच्या घाटात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पाेलिसांनी दिली चक्क खड्डे बुजवण्याची ‘शिक्षा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाबळेश्वर- पुणेमार्गे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या ३१ किलोमीटरच्या घाटात जागोजागी पडलेले खड्डे, चालकांकडून नियमांचे उल्लंघनामुळे अपघात, वाहतूक खोळंबणे असे प्रकार नियमित घडतात. चालकाचे थोडेही नियंत्रण सुटले तर वाहने ५०० ते ७०० फुटांच्या दरीत कोसळण्याची भीती असते. अशा अपघातात यापूर्वी अनेकांचे प्राण गेले अाहेत, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पाचगणी येथील राज्य महामार्ग पाेलिसांनी स्वातंत्र्यदिनापासून अनाेखी माेहीम हाती घेतली अाहे. यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना श्रमदानातून खड्डे बुजवण्याची ‘शिक्षा’ केली जात अाहे.  


थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीकडे जाताना ३१ किलोमीटरचा घाट लागतो. हा घाट अरुंद असल्याने धोकादायक अाहे. त्यातच या घाटातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवताना अनेकदा वाहनांमध्ये अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. वळण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुढच्या वाहनाने खड्डे बुजवताना हुलकावणी दिली तर मागचे आणि पुढून येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होतात. अपघातातून वाहने ७०० फुटांपर्यंत खोली असलेल्या घाटात पडून अनेकांचे बळीही गेले आहेत. हे प्रकार राेखण्यासाठी पाेलिसांनी ‘गांधीगिरी’चा मार्ग पत्करला अाहे. या मार्गावर वाहनचालकांनी सीटबेल्ट घातलेला नसल्यास, मद्य पिऊन वाहन चालवत असल्यास, वाहनातून कुणी हात-डोके बाहेर काढलेले अाढळल्यास पाेलिस त्या वाहनधारकांना रस्त्यात असलेले खड्डे बुजवण्याची ‘शिक्षा’ देतात. या उपक्रमामुळे घाटातील तात्पुरते का होईना खड्डे बुजवण्यासाठी मदत होत आहे. 


आठ जणांनी बुजवले १० खड्डे  
^घाटातील खड्डे चुकवताना समोरून व पाठीमागून येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होतात. याबाबत संबंधित विभागाला पत्र दिले, मात्र कायमस्वरूपी काम हाेत नाही अाणि अपघातांची संख्या वाढत जाते. त्यावर उपाय म्हणून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना अशी शिक्षा दिली जाते. १५ अाॅगस्ट राेजी दिवसभरात आठ जणांनी दहा ठिकाणी खड्डे बुजवले. या  रस्त्यावर जवळपास ९५० खड्डे आहेत.    
- प्रशांत मंडाले, पोलिस उपनिरीक्षक, हायवे पोलिस, पाचगणी 

बातम्या आणखी आहेत...