Home | Maharashtra | Pune | Police recruitment process: Pune Candidate's rally cancled by police

पुणे-मुंबई धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न हाणून पाडला

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 08:50 AM IST

पोलिस भरती प्रक्रियेत बदल केल्याने पुण्यात उमेदवारांचे आंदोलन 

  • Police recruitment process: Pune Candidate's rally cancled by police

    पुणे - पोलिस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात गुरुवारी पुण्यात उमेदवारांनी मोर्चा काढला. मुठा नदीच्या पात्रातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून हे उमेदवार ११ तारखेपर्यंत उपोषणाला बसणार आहेत. यातील ५० उमेदवार मुंबईपर्यंत धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकले. शिवाय तब्बल तीन तासांपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातच बसवून ठेवत नंतर सोडून दिले.


    पोलिस भरतीसाठी आधी १०० गुणांची मैदानी चाचणी व त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. परंतु आता राज्य सरकारने यात बदल केला असून लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मैदानी चाचणीचे गुण १०० वरून ५० करण्यात आले आहेत. या बदलांना पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो उमेदवारांनी विरोध केला आहे. ५ वर्षांपासून राज्यात फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. अद्याप नवीन भरती झाली नाही. त्यामुळे या भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात बदलामुळे उमेदवारांना नाहक भुर्दंड बसत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे.


    तरुण-तरुणींना धावत जाण्यास परवानगी नाकारली
    आंदोलन करणारे हे तरुण - तरुणी पुण्यातून मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र, पुणे-मुंबई महामार्गावरून धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. धावत निघालेल्या ५० तरुणांना पुणे पोलिसांनी खडकीत अडवले. २५० ते ३०० पोलिसांचा ताफा त्यासाठी तैनात करण्यात आला. या तरुणांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तब्बल तीन तास बसवून ठेवण्यात आले.

Trending